
तमिळनाडूच्या एन्नोर येथील एका खासगी कंपनीच्या पाइपलाइनमधून अमोनिया गॅस गळतीमुळे 12 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती तमिळनाडू पोलिसांनी दिली आहे.
कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये ही घटना घडली आहे. ही कंपनी खतं निर्मिती करते. त्यामुळे या कंपनीमध्ये अमोनिया कच्चा माल म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
पाइपलाइनच्या प्री-कूलिंग ऑपरेशन दरम्यान कथितरित्या झालेल्या अमोनिया वायूच्या गळतीबाबत अधिकाऱ्यांना कंपनीकडून सकाळी 12.45 वाजता माहिती मिळाली.
गॅस गळतीमुळे पेरियाकुप्पम, चिन्नाकुप्पम सारख्या गावांमधील स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून त्यांनी उग्र वास, श्वास घेण्यास त्रास आणि अस्वस्थतेच्या तक्रारी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने रहिवाशांना तातडीने इतर ठिकाणी हलवण्यासाठी रुग्णवाहिका आणि सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था केली.
पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस गळतीनंतर 12 गावकऱ्यांना स्टॅनले रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर अनेकांना मध्यरात्री कम्युनिटी हॉल आणि इतर ठिकाणी हलवण्यात आले.
ही गॅस गळती कंपनीने रात्रीच आटोक्यात आणली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तमिळनाडू प्रदूषण मंडळ नियंत्रण पथकाने केलेल्या तपासणीदरम्यान, मटेरियल गेटजवळ पहाटे 3.30 वाजता सभोवतालच्या हवेतील अमोनिया पातळीचे निरीक्षण केले गेले आणि 3ppm (24 तास सरासरी 400 मायक्रोग्राम/m3 विरुद्ध 2090 मायक्रोग्राम/m3) असल्याचे आढळले.
























































