लोडशेडिंगविरोधात अमरावतीत शिवसेनेचे धडक आंदोलन, आठ दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे असह्य उकाड्याने नागरिक हैराण होत असताना अमरावतीमध्ये ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात वारंवार होत असलेल्या लोडशेडिंगमुळे घामटा निघत आहे. याबाबत वीज वितरण विभागाला वारंवार माहिती देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने आज शिवसेनेने विद्युत विभाग कार्यालयात घुसून अभियंत्याची अक्षरशः पूजा केली. शिवाय आठवडाभरात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अमरावतील लोडशेडिंगविरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयात घुसून तक्रारीचा पाढा वाचण्यात आला. परिस्थिती तत्काळ सुधारली गेली नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन होणार, असा इशाराही अधिकाऱ्यांना देण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे, सुधीर सूर्यवंशी, मनोज कडू, प्रदीप बाजड, पंजाबराव तायवाडे, बाळासाहेब राणे, विनोद मंडळकर, नितीन तारेकर, जयश्री पुऱहेकर, सागर ढोके यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.