धर्मपीठावर बसणे हा औचित्यभंग आहे. धर्मपीठावर कुणाचे पीठाधीपती म्हणून नियुक्ती होत असताना त्या ठिकाणी माझे काम नाही. मंदिराच्या आत आमचे काही काम नसून मंदिराच्या बाहेर दंडा घेऊन रखवाली करण्याचे आमचे काम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी अमरावती येथे एका कार्यक्रमादरम्यान केले.
मी संघाचा सरसंघचालक आहे. मी सरकारमध्ये जात नाही. सरकारने एकच गोष्ट माझ्यावर थोपवली ती म्हणजे सरकारने दिलेली सिक्युरिटी. परंतु जेव्हा मी समाजात जातो आणि काही लोक माझ्याकडे काही मागणी करतात तेव्हा मी ती मागणी सरकारकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. सरकारवर समाजाचा दबाव असेल तर सरकार त्या गोष्टी करते. समाज ठरवेल तेच होते आणि तोपर्यंतच सरकार राहू शकते असे सांगून संपूर्ण समाजाने एकत्र येऊन चांगला विचार करणे गरजेचे आहे, असे डॉ. भागवत म्हणाले.
































































