
>> कर्नल अभय बा. पटवर्धन
बैरुत स्फोटाचे व्हिडीओ पाहिल्यानंतर रॉबर्ट रेडफोर्ड आणि ब्रॅड पिट्सच्या 2001 मधील ‘स्पाय गेम’ या चित्रपटाची आठवण होते. त्यात एका आतंकवादी म्होरक्याला मारण्यासाठी सीआयएचे दोन हस्तक बैरुतमध्येच एका संपूर्ण विभागाला अशाच प्रकारच्या स्फोटांनी उडवून लावताना दाखवले आहे. बैरुत स्फोटानंतर आता आपल्या देशातही चेन्नई येथे याच पद्धतीने जप्त करून पाच वर्षांपासून गोदामात पडून असलेल्या अमोनियम नायट्रेटच्या मोठय़ा साठय़ाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा, कायदा पालनाची सर्व पातळ्यांवरील बेफिकिरी आणि ‘सब चलता है’ ही मनोवृत्ती अशा कारणांमुळे काल जे बैरुतमध्ये घडले तशी वेळ हिंदुस्थानवर न येवो हीच प्रार्थना!
मध्यपूर्वेतील लेबनॉनच्या बैरुत बंदरात 4 ऑगस्ट, 2020 रोजी एका मागोमाग एक असे दोन भयंकर स्फोट झाले. या स्फोटात बैरुत विमानतळाचा मोठा भाग आणि नॉर्वे, जर्मनी, अमेरिका आणि हिंदुस्थान यांच्या परराष्ट्र कार्यालयांची मोठी हानी झाली. स्फोटात अंदाजे 190 लोक मरण पावले, सहा हजारांपेक्षा जास्त जखमी झाले. तीन लाख लोकांचे स्थलांतर करावे लागले आणि 90 हजार घरांसहित 1500 दशलक्ष डॉलर्सची स्थावर मालमत्ता नष्ट झाली. गृहयुद्ध, इस्रायलची आक्रमणे आणि जिहादी तसेच ख्रिश्चन दहशतवादाने 1975 ते 90 या काळात लेबनॉनला ग्रासले होते. परिणामस्वरूप आधीच भीषण आर्थिक संकट, चलन टंचाई, दुष्काळ, राजकीय अस्थिरता, बेरोजगारीने लेबनॉन हैराण आहे. त्यात सध्या कोरोना विषाणूच्या जबरदस्त संकटाने हा देश अधिकच बेजार झाला आहे. त्यामुळे 4 ऑगस्टचा भयंकर स्फोट लेबनॉनसाठी मोठेच संकट ठरला आहे. खरं तर हा स्फोट लेबनॉनसाठी काळाने घेतलेला सूड आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. बैरुत बंदर ध्वस्त झाल्यामुळे आता लेबनॉनला सर्व आयात-निर्यात त्रिपोली किंवा तायरे बंदरांमधून करावी लागते आहे.
स्फोटाचा जोर 3.4 श्रेणीच्या भूकंपाएवढा होता. स्फोटामुळे 270 किलोमीटर दूर असलेल्या सायप्रसमधील इमारतींनादेखील इजा पोचली. फ्रेंच वृत्तपत्रांनी याला ‘द अपोकॅलिप्स’ म्हणजे पूर्ण विनाशक घटना म्हटले आहे.
बैरुतमधील वॉटर फ्रंट वेअर हाऊसमध्ये 2013 पासून अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या 2500 टन अमोनियम नायट्रेट आणि इतर ज्वालाग्राही पदार्थांच्या साठवणुकीबाबतचा निष्काळजीपणा तसेच औदासिन्य यामुळे हा स्फोट झाला असावा असे मानले जात आहे. एका युक्रेनियन मालवाहू जहाजावरून जप्त केलेला अमोनियम नायट्रेटचा हा तरल स्फोटक साठा बैरुत पोर्ट ऍथॉरिटींनी, ‘ऑक्शनिंग अँड ऑर प्रॉपर डिस्पोजल’ करण्यासाठी आपल्या गोदामामध्ये ठेवला आणि नंतर तो विस्मरणात गेला. तसाच पडून राहिला. अमोनियम नायट्रेटमध्ये खनिज तेल किंवा इतर पदार्थ मिसळल्यास अत्यंत ज्वालाग्राही मिश्रण तयार होते. बैरुतमधील अमोनियम नायट्रेटदेखील सात वर्षं गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्याबाबतही ही प्रक्रिया आपोआप झाली असण्याची शंका नाकारता येत नाही. जगभरात, खत, स्फोटक बनवण्यासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर केला जातो. ओक्लाहोमा या अमेरिकेतील शहरात 1995मध्ये केल्या गेलेल्या स्फोटात याचा सढळ वापर केला होता. त्या स्फोटात 178 लोक मृत्युमुखी पडले होते.
1947 मध्ये टेक्सास बंदरातही 2300 टन केमिकलचा असाच स्फोट होऊन 300 लोक मृत्युमुखी पडले होते आणि समुद्रात 15 फूट उंचीच्या लाटा निर्माण झाल्यामुळे बंदर पाण्याखाली गेले होते. 2015 मध्ये चीनच्या तियानजिन बंदरात 1500 टन अमोनियम नायट्रेटमुळे असाच स्फोट झाला होता. ज्यात 178 लोक ठार झाले होते. दुसऱ्य़ा महायुद्धात जपानमधील हिरोशिमा शहरावर झालेल्या अमेरिकन अणुहल्ल्याला 75 वर्षे पूर्ण व्हायला केवळ दोन दिवस उरले असताना इतिहासातील सर्वात मोठ्ठा ‘नॉनन्यूक्लियर ब्लास्ट’ बैरुतमध्ये व्हावा हे धक्कादायक आहे. सुपरसॉनिक ब्लास्ट वेव्ह्ज निर्माण होऊन समुद्रातील एक जहाज बंदरात येऊन पडण्याएवढा भीषण असा हा विध्वंस झाला.
बैरुतसारखी दुर्घटना होऊ नयेत म्हणून पुढीलप्रमाणे खबरदारी घ्यावी लागेल : 1) प्रत्येक बंदरात किती प्रकारची स्फोटके किंवा रसायने कोठून, किती प्रमाणात येतात आणि ती सुरक्षा नियमांनुसार ठेवली आणि साठवली जातात की नाही याची नियमित तपासणी झाली पाहिजे. 2) ठेवण्यात आलेली स्फोटके आणि रसायने, कुठलाही ज्वालाग्राही पदार्थ एकमेकांमध्ये मिसळू नयेत म्हणून त्यांना केल्या गेलेल्या वर्गीकरणानुसार वेगवेगळ्या जागेत (कम्पार्टमेंटलाईझ्ड लोकेशन्स) ठेवले पाहिजे. 3) कुठल्याही प्रकारची वस्तू एक वर्षानंतर ‘ओव्हरटाइम कार्गो’ या वर्गात बदलण्यात आली पाहिजे. अशा वस्तू कार्गो बंदरातील 30-40 टक्के जागा व्यापतात. या वर्गात चार वर्ष ठेवण्यात आल्यानंतर त्यांची योग्य प्रकारे निविदा काढून खुल्या बाजारात विक्री करण्यात आली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत बंदरात माल ठेवण्यासाठी अशी कोणत्याही प्रकारची कालमर्यादा आखून दिलेली नाही आणि ते धोकादायक आहे. 4) सध्या प्रत्येक बंदरात विविध प्रकारच्या वस्तू येतात व ठेवल्या जातात. जर डायनामिक्स ऑफ कार्गोनुसार ऑइल अँड गॅस पोर्ट, कृषी उत्पादन पोर्ट, फिशिंग पोर्ट, केमिकल पोर्ट अशी वेगवेगळी वर्गवारी केली तर वेगवेगळ्या कॅटॅगरीचे सामान एकमेकांमध्ये मिसळण्याला वावच राहणार नाही. 5) बंदरांच्या वर्गीकरणामुळे बंदर प्रशासनात, कार्गो प्रोसेसिंग, फास्ट ट्रक क्लियरन्स आणि रिडय़ुस्ड कॉम्प्लेक्सिटीचा अंतर्भाव सहज होऊ शकेल. 6) सध्या समुद्र आणि बंदरातील वस्तूंची आवक-जावक (कॅरेज ऑफ डेंजरस गुड्स अँड हझार्डस मटेरियल ऑन वॉटर अँड इन द पोर्ट) ही इंटरनॅशनल मेरीटाईम डेंजरस गुड्स कोडखाली, ‘सेक्शन 322-326 ऑफ मर्चंट शिपिंग ऍक्ट, 2007, पार्ट20’ अंतर्गत केले जाते. यापुढे हिंदुस्थानच्या बंदरांमधील सामानाची आवक आणि जावक, साठवण आणि देखभालीसाठी या कायद्याचे शब्दशः पालन करणे अनिवार्य करणे आवश्यक आहे. 7) या कारणांशिवाय भ्रष्टाचार, पोर्ट युनियन्सची मनमानी, हडेलहप्पी, व्यक्तिगत लाभासाठी सुरक्षा नियमांची पायमल्ली, शिस्तबद्ध व वक्तशीर तपासण्यांचा अभाव आणि अधिकाऱ्य़ांमधील औदासिन्य व हलगर्जीपणा हीदेखील अशा स्फोटांसाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. त्यामुळे यावर त्वरित पर्याय शोधणे अत्यंत गरजेचे आहे.
अमोनियम नायट्रेटचा वापर साधारणतः खत निर्मितीसाठी होत असला तरी त्यात इंधन आणि प्राणवायू निर्माण करण्याची क्षमता असते. शिवाय तो अतिशय ज्वालाग्राही असल्यामुळे दहशतवादी त्याचा उपयोग स्फोटके तयार करण्यासाठीही करतात. मात्र त्याच्या या गुणधर्मांमुळे याचा वापर साठवणूक, खरेदी आणि विक्री, आरोग्य व सुरक्षा प्रणालींवर कडक निर्बंध घालणे आवश्यक आहेत. अमोनियम नायट्रेट स्वतःहून जळू शकत नाही. त्याचा स्फोटकासारखा वापर होण्यासाठी त्याला डेटोनेटरने इग्नाइट करावे लागते. डेटोनेट झाल्यावर तो स्वतःहून प्राणवायू निर्माण करत असल्यामुळे डेटोनेटरची आग क्षणात विक्राळ रूप धारण करते. बैरुत स्फोटाच्या पहिल्या व्हिडीयोमध्ये आधी लहान आग आणि ठिणग्या दिसतात. नंतरच्या व्हिडीयोमध्ये मोठी आग, धूर दिसतो. शेवटच्या व्हिडीओमध्ये लाल किनार असलेला अळंबी आकाराचा ढग दिसतो. याचे कारण अमोनियम नायट्रेटचा आता जो गुणधर्म सांगितला तेच आहे.
चेन्नईतील साठा ‘रडार’वर
हिंदुस्थानच्या चेन्नई बंदरातदेखील अवैध परवान्यावर आणण्यात आल्यामुळे जप्त केलेल्या कंटेनर्समधील काही टन अमोनियम नायट्रेट डिसेंबर,2015पासून चेन्नई कस्टमच्या गोडाऊनमध्ये पडून होते. बैरुत स्फोटानंतर तामीळनाडूच्या पट्टली मक्कल काटची (पीएमके) या पक्षाचे अध्यक्ष एस. रामदोस यांनी 7 ऑगस्टला ही बाब सरकारच्या नजरेस आणून दिली. त्या पैकी 700 टन मुसळधार पावसामुळे खराब झाले आणि उर्वरित 690टनांसाठी ई – निविदा मागवण्यात आल्या आहेत असा खुलासा आता चेन्नई पोर्टच्या अधिकाऱ्य़ांनी केला आहे. त्यावर आता कारवाई सुरू आहे. बैरुत स्फोटानंतर देशातील सर्व बंदरांमधील गोदामांतील प्रत्येक प्रकारची स्फोटके आणि विनाशक, घातक रसायने तसेच वस्तूंचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यांची साठवणूक आणि रखवाली सुरक्षेच्या सर्व नियमाने, योग्य पद्धतीने होत आहे, झाली आहे का, याची खातरजमा करावी असे आदेश सेंट्रल बोर्ड ऑफ इंडायरेक्ट टॅक्सेस ऍण्ड कस्टम्स विभागाने जारी केले आहेत.
बैरुत स्फोटाचे व्हिडीयो पाहिल्यानंतर रॉबर्ट रेडफोर्ड आणि ब्रॅड पिट्सच्या 2001 मधील ‘स्पाय गेम’ या चित्रपटाची आठवण होते. त्यात, एका आतंकवादी म्होरक्याला मारण्यासाठी सीआयएचे दोन हस्तक बैरुतमध्येच एका संपूर्ण विभागाला अशाच प्रकारच्या स्फोटांनी उडवून लावताना दाखवले आहे. बैरुत स्फोटानंतर आता आपल्या देशातही चेन्नई येथे याच पद्धतीने जप्त करून पाच वर्षांपासून गोदामात पडून असलेल्या अमोनियम नायर्ट्रेटच्या मोठय़ा साठय़ाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा, कायदा पालनाची सर्व पातळ्यांवरील बेफिकिरी आणि ‘सब चलता है’ ही मनोवृत्ती अशा कारणांमुळे काल जे बैरुतमध्ये घडले तशी वेळ हिंदुस्थानवर न येवो हीच प्रार्थना.



























































