
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार विद्यमान खासदार अनंत गीते याची निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेली मुलाखत. यामध्ये त्यांनी ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर व भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत असून आघाडीच्या उमेदवारांची चिंता नसल्याचे सांगून रायगडात उद्योग आणण्याच्या दृष्टीने आगामी काळात वाटचाल करणार असल्याचे सांगितले.
2019 ची लोकसभा निवडणूक कोणत्या मुद्यावर लढविणार याबाबत गीतेंना विचारले असता, शिवसेना व भाजप हे नेहमी विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवीत आले आहेत. मी सहा वेळा लोकसभा निवडणुकीत निवडून आलो असून चार वेळा रत्नागिरी तर दोन वेळा रायगडातून असे सहा वेळा कोकणातून विजयी झालो आहे. गेल्या पाच वर्षात देशात व राज्यात शिवसेना भाजप युतीने अनेक विकासाची कामे केली आहेत. 2014 ची निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढलो असलो तरी मागची निवडणूक भ्रष्टाचार विरोधात लढलो आहे. 2014 ची निवडणूक ज्या प्रतिस्पर्धी बरोबर लढलो होतो तोच प्रतिस्पर्धी यावेळी माझ्यासमोर असण्याची शक्यता आहे असून भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी निवडणूक होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप अशी आघाडी यावेळी तुमच्या समोर उभी असताना तसेच अलिबागचे काँग्रेसचे माजी आमदार हे सुद्धा तटकरेच्या सोबत आहे. याचा फटका आपल्याला होऊ शकतो का याबाबत गीते म्हणाले की, ही आघाडी नेत्यांची झालेली आहे. कार्यकर्ते वा मतदारांची झालेली नाही. मतदार व कार्यकर्ते हे माझ्याबरोबर असून या आघाडीची मला चिंता नाही. दर निवडणुकीत विरोधी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मला मदत करतात तसे यावेळीही करतील. शासनाची जशी तंटामुक्त गाव योजना आहे तसा मी तंटामुक्त खासदार आहे. त्यामुळे या आघाडीबाबत मला कोणतीच चिंता नाही आहे. अशी प्रतिक्रिया गीतेंनी दिली.
कोकणात उद्योग आणण्याबाबत आपले प्रयत्न होते त्याबाबत सद्यस्थिती काय आहे असा प्रश्न विचारला असता, मी कोकणात उद्योग आणण्याचा प्रयत्न केला होता. पण सरकारचे धोरण असल्याने खाजगी उद्योग क्षेत्रात पडायचे नाही कारण खाजगी उद्योग क्षेत्रात प्रचंड वाढ याठिकाणी झाली आहे. त्यामुळे सरकारचे धोरण असल्यामुळे मला कोणताही शासकीय उद्योग आणता आला नाही. किंबहुना देशातच कुठे शासकीय उद्योग उभा राहिलेला नाही आहे. मात्र असे असतानाही लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात रेल्वेचा कारखाना आणला आहे त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. अलिबागमधील उसर येथे गेलचा बोटलींग प्लांट आहे. सध्या हा प्लांट बंद आहे, त्यामुळे येथील जागा पडून आहे. तेथेही एक कारखाना आणण्याचा प्रयत्न सुरू असून अंतिम टप्यात आहे. गेलने या ठिकाणी पुन्हा सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर नव्या सरकारात अलिबागमध्ये नव्याने गेलचा उद्योग सुरू होईल असा विश्वास अनंत गीते यांनी बोलून दाखविला.





























































