आनंदाच्या शिध्याला संपाची गडद किनार, शिधा वाटपाच्या वितरणावर परिणाम

गुढीपाडव्यानिमित्त राज्यातल्या शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याची योजना राज्य सरकारने जाहीर केली आहे, पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका शिधावाटपाला बसणार आहे. कारण राज्यातल्या किमान चारशे सरकारी गोदामात शिध्याची पाकिटे ठेवण्यासाठी सध्या कर्मचारी नसल्याने पुढे शिधा वितरणावरही परिणाम होऊ शकतो. परिणामी दिवाळीचीच पुनरावृत्ती गुढीपाडव्याला होण्याची चिन्हे आहेत.

गुढीपाडवा तसेच डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.

शिध्यामध्ये काय आहे?
राज्यातल्या 1 कोटी 60 लाख कुटुंबांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर, एक लिटर पामतेल असा शिधा 100 रुपयांत देण्यात येणार आहे.

संपाचा फटका
आनंदाचा शिधा हा जिल्हा पातळीवरून तालुका पातळीवर वितरित केला जाईल. राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात एक सरकारी गोदाम आहे. कंत्राटदाराने वितरित केलेली आनंदाच्या शिध्याची पाकिटे तालुक्यातल्या चारशे सरकारी गोदामांमध्ये पोहोचतील, पण संपामुळे गोदामांमध्ये ही पाकिटे घेण्यासाठी कर्मचारी नाहीत. त्यामुळे पुढे वितरणावरही मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. परिणामी गुढीपाडव्यापासून आनंदाच्या शिध्याचे वितरण होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीमध्येही आनंदाचा शिधावाटपाची घोषणा करण्यात आली होती, पण दिवाळी आनंदाचा शिधा गरजूंच्या घरी पोहोचलाच नव्हता.

किती बोजा पडणार?
यासाठी सुमारे 473 कोटी 58 लाख रुपयांच्या खर्चास सरकारने मान्यता दिली आहे. एका पाकिटासाठी सरकार 287 रुपये खर्च करणार आहे.

परिणाम होणार नाही
पण राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संपामुळे या वितरणावर कोणताही परिणाम होणार नाही. खासगी वितरण व्यवस्थेमार्फत कंत्राटदार व स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत हा शिधा वितरित होणार आहे. यामध्ये माथाडी मंडळाच्या हमालांचीही मदत घेण्यात येते. त्यामुळे गुढीपाडव्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत आनंदाच्या शिध्याचे व्यवस्थित वितरण होईल, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला.