
सामना ऑनलाईन । अलिबाग
70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळय़ाप्रकरणी ईडीने सुनील तटकरे यांना काही दिवसांपूर्वीच समन्स बजावला आहे. या प्रकरणात तटकरेंना लवकरच अटक होऊन त्यांचा छगन भुजबळ होईल, अशी जोरदार टीका शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केली. सिंचनाचा पैसा योग्य ठिकाणी मार्गी लागला असता तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या, असेही गीते म्हणाले.
म्हसळा येथे शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीची सभा झाली. यावेळी गीते यांनी तटकरें यांच्या भ्रष्टाचारावरून जोरदार हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले, सिंचन घोटाळा झाला नसता तर शेतीला पाणी मिळून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला असता. मात्र या घोटाळ्यामुळे देशातील सर्वात जास्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या आकडेवारीने आमची मान शरमेने खाली जाते. शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा शाप तटकरे यांना लागल्याशिवाय राहणार नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
या सभेत नाविद अंतुले म्हणाले, काँगेसमध्ये मी कधीच प्रवेश केला नसून शिवसेना हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष आहे. ही लढाई आता गीतेंची नसून तटकरेंविरोधात माझी स्वतःची आहे. या मेळाव्याला जिल्हाप्रमुख रवी मुंडे, भाजपचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, संजय कोनकर, उदय आंबोनकर, महादेव पाटील, मंगेश म्हशीलकर, नंदू शिर्के, शैलेश पटेल, उस्मान रोहेकर, सुलतान मुकादम, अनिकेत पानसरे, अमित महामूणकर, अभय कलमकर, सुजित बोरकर, प्रसन्ना निजामपूरकर, कौस्तुभ करडे, कल्पेश जैन, मंगेश मुंडे आदी उपस्थित होते.




























































