मुस्लिमांच्या धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या 10 जणांचा कोरोनाने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात थैमान घालणारा कोरोना व्हायरस आता देशातही पसरत असल्याचं चित्र आहे. दिल्ली येथील मुस्लिमांच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अंदमानातल्या 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. तर याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या अन्य 10 जणांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

अंदमानातील कोरोनाबाधित असलेले  10 जण दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातून अंदमानात परतले होते, त्यानंतर यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, या 10 पैकी 9 जण 24 मार्च रोजी वेगवेगळ्या फ्लाईट्सने निजामुद्दीनहून अंदमानात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वैद्यकीय अहवालात निष्पन्न झालं. यांपैकी 10वा रुग्ण महिला असून ती उर्वरित रुग्णांपैकी एकाची पत्नी आहे. हे सर्वजण निजामुद्दीन इथल्या तबलीगी समाजाचं केंद्र असलेल्या मरकज परिसरात वास्तव्य करून होते, अशी माहिती उघड होत आहे.

corona-andaman-1

मरकज येथे मुस्लीम समाजाचा धार्मिक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात तब्बल 1900 ते 2000 लोक सामील झाले होते. हे सर्व देशाच्या निरनिराळ्या भागांमधून दिल्ली येथे आले होते. या कार्यक्रमात काही परदेशी नागरिकही सहभागी होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे तेलंगाणा इथले होते. तर उर्वरित तमीळनाडू, कर्नाटक आणि जम्मू-कश्मीर इथले होते. या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर आपापल्या घरी परतलेल्या या 10 जणांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला.

या प्रकरणानंतर मरकज येथील मौलानाविरोधात दिल्ली राज्य सरकार गुन्हा नोंदवणार असल्याचं वृत्त आहे. कारण, या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी 200 जणांना कोरोनाची लागण झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. तसेच याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या 34 जणांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिल्ली सरकारने जारी केलेल्या लॉकडाऊनचे आदेश धुडकावून गर्दी केल्याबद्दल आणि अनेकांचे जीव धोक्यात घालण्यासाठी हा गुन्हा नोंदवण्यात येणार आहे.