अँडी मरेतला “जोश” संपलेला नाही -फेडरर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लंडन

दोन वेळा विम्बल्डन जेतेपद पटकावणाऱ्या अँडी मरेची या स्पर्धेतील यंदाची माघार दुःखदच आहे. अर्थात कंबरेचे दुखणे वाढू नये म्हणून मरेने यंदा घेतलेला माघारीचा निर्णय योग्यच आहे असे असले तरी मरेच्या खेळातला “जोश” अद्याप संपलेला नाही. भविष्यातही त्याचा खेळ पूर्वीसारखाच जोशपूर्ण होईल, असा विश्वास मरेचा परंपरागत प्रतिस्पर्धी आणि ८ वेळा विम्बल्डन जिंकणारा स्वित्झरलंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याने व्यक्त केला आहे. कंबरेचे दुखणे पुन्हा डोके वर काढू नये म्हणून २४ तासांपूर्वी विम्बल्डनमधून माघार घेतली. त्याच्या माघारीच्या निर्णयावर फेडरर बोलत होता.

अँडी मरे खरेच प्रतिभावंत आणि जिगरबाज टेनिसपटू आहे. त्याच्या विम्बल्डनमधील माघारीच्या निर्णयाने मला दुःख झालेय. मात्र त्याच्या भविष्यासाठी त्याने घेतलेला निर्णय समर्थनीयच आहे. टेनिसकोर्टवर उतरल्यावर अँडी स्वतःला झोकून देऊन खेळतो. त्याची दुखापत पाहता आता त्याने विश्रांती घेणेच योग्य ठरेल. अँडीतला जोश यापुढेही कायम राहील यात शंकाच नाही ,असेही फेडरर पुढे म्हणाला.