
सामना ऑनलाईन। इंडोनेशिया
इंडोनेशियामध्ये एका मगरीने गावातील तरुणाची शिकार केल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी सूड म्हणून सरोवरातील ३०० मगरींची शिकार केली. यात अगदी नुकत्याच अंड्यातून बाहेर आलेल्या मगरींच्या पिल्लांचाही समावेश आहे. ही घटना पापुआ प्रांतात शनिवारी घडली. सुगिटो असं मृत तरुणाचं नाव आहे.
सुगिटो शनिवारी जनावरांचा चारा शोधण्यासाठी पापुआ प्रांतातील एका फार्म हाऊसजवळील सरोवराजवळ गेला होता. पण त्याच पाय घसरला व तो सरोवरात पडला. सुगिटो पाण्यात पडताच एका मगरीने त्याच्यावर हल्ला केला व त्याचा पाय खाल्ला. पण तरीही हिंमत न हारता सुगिटो मगरीशी लढत होता. पण या झटापटीत मगरीच्या शेपटाचा फटका बसल्याने सुगिटोचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा अनेकजण आपली जनावरे चारण्यासाठी सरोवराजवळ आले होते. त्यांनी सुगिटो पाण्यात पडल्याचे बघून एकच आरडाओरड केला व त्याला मगरीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्नही केला. पण तोपर्यंत सुगिटोचा मृत्यू झाला होता. सुगिटोला मगरीने ठार केल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर सगळ्या गावानेच सरोवराकडे धाव घेतली. त्यानंतर सुगिटोवर दफनविधी करण्यात आला.
पण त्याचवेळी या घटनेचा सूड घेण्याचा निर्णय अख्ख्या गावाने घेतला. त्यानंतर चाकू, सुऱ्या, कोयते, विळा, कुऱ्हाड अशी हातात मिळेल ती शस्त्र घेऊन गावकरी सरोवराकडे निघाले. शेकडोंच्या संख्येने आलेला हा जमाव बघून पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रक्षुब्ध झालेला जमाव काहीही ऐकण्यास तयार नव्हता. सगळ्यांनी सरोवरात उड्या घेतल्या. एवढ्या मोठ्या संख्येने माणसं सरोवरात उड्या घेत असल्याचे बघून अनेक मगरींनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. पण गावकऱ्यांनी मगरींचीची कत्तल करण्यास सुरूवात केली. यात मगरींच्या नुकत्याच जन्मलेल्या पिल्लांचाही समावेश होता. गावकऱ्यांनी तब्बल ३०० मगरींची शिकार केली व एकच जल्लोष केला. दरम्यान गावकऱ्यांवर वन्यप्राण्याची हत्या केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे.
























































