
अमृता फडणवीस यांना खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला सोमवारी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायाधीश दीपक अलमाले यांनी अनिक्षाला 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडून देण्याचा आदेश दिला.
न्यायाधीश अलमाले यांच्यापुढे अनिक्षाच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. अनिक्षाच्या अर्जाला मुंबई पोलिसांतर्फे सरकारी वकील अजय मिसार यांनी विरोध केला, तर अनिक्षाच्या वतीने ऍड. मृगेंद्र सिंह यांनी जामिनासाठी विनंती केली. एफआयआर दाखल केल्यानंतर अमृता फडणवीस या अनिक्षाला तीन वेळा भेटल्या. त्यानंतर एफआयआरमध्ये खंडणीचे कलम जोडण्यात आले. हा अमृता यांच्या पतीच्या राजकीय प्रभावाचा दुरुपयोग आहे, असा आरोप ऍड. सिंह यांनी केला. तसेच चौकशी पूर्ण झाली असून घरातील लहान भावाची काळजी घेण्यासाठी अनिक्षाला जामीन देण्याची विनंती केली. त्याची दखल घेत न्यायाधीश अलमाले यांनी अनिक्षाला जामीन मंजूर केला.





























































