आमचे दिवाळे निघाले आहे, जाहीर करा! अनिल अंबानींच्या कंपनीची विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडने अधिकृतपणे त्यांच्या कंपनीचे दिवाळे वाजले असल्याचे जाहीर करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या कंपनीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकामध्ये या कंपनीने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या नियमांअंतर्गत कर्ज परतफेड योजना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदेशीर अडचणींमुळे रिलायन्स कम्युनिकेशनला कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येत आहेत. नवे कर्ज मिळवण्यातही त्यांना अडचणी येत आहे.

अनिल अंबानी यांची ही कंपनी पूर्णपणे कर्जाच्या भयंकर मोठ्या बोज्याखाली दबली गेली आहे. आरकॉमच्या संचालकांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आरकॉमच्याकडे असलेली संपत्ती विकूनही कर्जदारांची पूर्णपणे परतफेड करता आलेली नाहीये. त्यामुळे त्यांना त्यांचा पैसा परत मिळावा यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या नियमांअंतर्गत कर्ज परतफेड योजना तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या लवादामार्फत सगळ्या कर्जदारांचे पैसे पारदर्शी पद्धतीने 270 दिवसांच्या आत परत केले जाऊ शकतील असा विश्वास कंपनीच्या संचालकांनी व्यक्त केला आहे.