
केरळ येथे घडलेल्या नरबळीच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. परंतु आता मुंबईत देखील काळी जादू केल्याच्या संशयातून नरबळी दिल्याची घटना समोर आली आहे. मुंबईत घडलेले हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा काळी जादू आणि नरबळीचे जुने प्रकरण समोर आले आहे. आपल्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे असा संशय आफ्रिकेतील एका व्यक्तीला आला. त्यानंतर हा व्यक्ती नरबळी देण्याच्या उद्देशाने थेट मुंबईत आला. आणि त्याने एका चिमुरड्या मुलीचा बळी दिला.
आफ्रिकेच्या मोरोक्को या देशात अनिल चुगानी नावाचा व्यक्ती राहत होता. पूर्वी तो मुंबईतील कुलाबा येथे राहत होता. मोरोक्कोमध्ये त्याचा एक व्यवसाय होता वर्षातून दोन महिने तो मुंबईत येत असे. 2019 मध्ये जेव्हा तो मुंबईत आला तेव्हा तो त्याचा मित्र प्रेम लाल याला भेटला. त्याने प्रेमलाल याला सांगितले की मी इथे एकटा आहे. मला मुलांची आठवण येते, मग तू तुझ्या मुलांना माझ्या घरी खेळायला पाठवू शकतोस का? मैत्री जुनी होती त्यामुळे प्रेम कुमार देखील त्याला नकार देऊ शकले नाहीत. त्यांनी आपल्या दोन जुळ्या मुलांना (एक 3 वर्षांची मुलगी आणि एक 6 वर्षांचा मुलगा) चुगानीकडे पाठवले. यावेळी प्रेम कुमारने मुलांसह मोलकरणीला देखील चुगानी यांच्या घरी पाठवले.
संध्याकाळी चुगानी याने मुलांसाठी चॉकलेट आणले. यावेळी ते खाताना मुलीच्या हाताला थोडं चॉकलेट लागलं. चुगानी याने मोलकरणीला सांगितले की, तुम्ही मुलाला दुसऱ्या खोलीत घेऊन जा, मी मुलीला हात धुवून घेऊन येतो. मात्र काही वेळाने चुगणी राहत असलेल्या कॉलनीत एकच गोंधळ उडाला. सर्व लोक इमारतीखाली जमले होते. यावेळी मोलकरीण बेडरूमच्या दिशेने धावली, पण तिला दरवाजा काही उघडत नव्हता. मोलकरणीने खाली बघितले तर लोक एका दिशेला बोट दाखवत होते. त्यानंतर एक मुलगी सातव्या मजल्यावरून खाली पडल्याचे तिला समजले. लोकांनी या मुलीला उचलून रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि दरवाजा तोडल्यानंतर अनिल चुगानी याला अटक करण्यात आली. मात्र, त्यावेळी पोलिसांसमोर अपघाती मृत्यू आणि खुनाचा शोध घेण्याचे आव्हान होते. मुलगी खाली कशी पडली याचा तपास पोलिसांनी सुरू केला असता मुलीला इमारतीमधून फेकून दिल्याचे समोर आले. यामागे दोन कारणे होती, त्यात पहिले कारण म्हणजे ज्या खिडकीतून मुलगी पडली तिची उंची इतकी होती की ती मुलगी तिथे चढू शकत नव्हती. यासोबतच मुलगी काही कारणाने खाली पडली असती तर ती इमारतीला लागूनच पडली असती, मात्र इमारतीपासून सुमारे 20 फूट अंतरावर एका कारवर ती पडली होती.
त्यावेळी पोलिसांना तपासात एक चिठ्ठी मिळाली, ज्यामध्ये ही काळी जादू टाळायची असेल तर जुळ्या मुलांचा बळी द्यावा लागेल, असे लिहिले होते. या चिठ्ठीवरून पोलिसांना ही हत्या चुगानीनेच केल्याचे समोर आले. काळी जादू टाळण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुलीही चौकशीदरम्यान चुगानीने दिली. त्याने एका मुलीला मारले आणि त्याला दुसऱ्या मुलालाही मारायचे होते, पण तो घाबरला. तो प्रत्येक वेळी फक्त 2 महिन्यांसाठी भारतात येत असे, परंतु यावेळी तो 6 महिने मुंबईत राहिला. त्याला कळले होते की त्याच्या मित्राला दोन जुळी मुले आहेत, त्यानंतर त्याने त्यांना मारण्याची योजना आखली.

























































