
परमबीर सिंह यांची बदली रुटीन नाही. चौकशीत काही गोष्टी समोर आल्या. मुंबई पोलीस प्रमुख म्हणून त्यांच्या कार्यालयातून त्यांच्या सहकाऱयांच्या मार्फत अक्षम्य चुका झाल्या. त्या माफ करण्यासारख्या नाहीत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका मुलाखतीत हे स्पष्ट केले.
अनिल देशमुख म्हणाले की, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्फोटके सापडली त्याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहे. जिथे स्फोटके येतात तेथे एनआयए तपास करते. जशी केंद्राची यंत्रणा आहे तसे राज्याचे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आहे. एनआयए असो की एटीएस या दोन्ही संस्था प्रोफेशनल आहेत. त्या चांगला तपास करतील आणि दोषींना शोधून काढतील. तपासात सर्व गोष्टी समोर येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. गृहमंत्र्यांसह दोन- तीन मंत्र्यांची विकेट पडणार असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केल्याबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले की, प्रदेश भाजप नेते नैराश्यात आहेत. चंद्रकांतदादा कसले तरी चमेलीचे तेल लावून येतात आणि काहीही वक्तव्य करतात.
अंतर्गत गटबाजीतून माहिती लीक केली जाते
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्र्यांच्या आधी माहिती कशी मिळते? यावर बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, सर्वच क्षेत्रांत गटबाजी असते. आयएएस, आयपीएस अधिकाऱयांचेही गटतट असतात. अंतर्गत स्पर्धा व हेव्यादाव्यातून अशा माहिती लीक केल्या जातात. सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय गृहमंत्री म्हणून मी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला नाही. त्यांना प़ुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय पोलीस अधिकाऱयांच्या समितीने घेतला असे ते म्हणाले.






























































