परमबीर-वाझे यांच्या आरोपांची चौकशी हे क्लेशदायक; अनिल देशमुख यांची व्हिडीओ प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीसमोर हजेरी लावली, मात्र जाण्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ ट्विटवरून एकूण प्रकरणावर आपली प्रतिक्रियाही दिली. परमबीर सिंह देश सोडून गेले आणि सचिन वाझे हा खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. या दोघांच्या आरोपावरून माझी चौकशी होणे हे क्लेशदायक असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

मला जेव्हा ईडीचे समन्स आले तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या, मात्र जेव्हा जेव्हा मला ईडीचे समन्स आले तेव्हा मी ईडीला कळवले की, माझी याचिका हायकोर्टात आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आला की मी ईडीच्या कार्यालयात हजर होईन. ईडीने जेव्हा आमच्या सर्व घरांवर छापे टाकले तेव्हा मी, माझ्या कुटुंबाने, सहकाऱयांनी त्यांना सहकार्य केले. सीबीआयची दोनदा समन्स आली तेव्हा मी स्वतः सीबीआयच्या कार्यालयात गेलो आणि जबाब नोंदवला, असे देशमुख यांनी सांगितले.

अजूनही माझा खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, मात्र आज मी स्वतः ईडीच्या कार्यालयात आलो आहे. परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले ते परमबीर सिंह आज कुठे आहेत? याबाबतच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. त्या बातम्यांनुसार परमबीर सिंह परदेशात पळून गेले आहेत. म्हणजे ज्यांनी अनिल देशमुखांवर आरोप केला ते आरोप करणारे पळून गेले. आज परमबीर सिंह यांच्याविरोधात त्यांच्या खात्यातील पोलीस अधिकारी आणि व्यावसायिकांनी गुन्हे दाखल केलेले आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले.

तसेच परमबीर सिंह यांचा सहकारी असलेल्या सचिन वाझे यानेसुद्धा त्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले होते. आज सचिन वाझे हा खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. सचिन वाझे हा त्याआधीही अनेकदा तुरुंगात होता. मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला पोलीस खात्यातून काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मी त्याला सरकारी नोकरीतून काढल्यानंतर त्याने माझ्यावर आरोप केले. अशा या परमबीर सिंह आणि सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांवरून माझी जी चौकशी होत आहे, माझ्या कुटुंबाला जो त्रास दिला जात आहे त्याच्याबद्दल मला अतिशय दुःख होत आहे. मी सरळ मार्गाने, नैतिकतेने चालणारा माणूस, 30 वर्षांच्या कारकीर्दीत माझ्यावर एकही आरोप झाला नव्हता, पण आज जे देश सोडून पळून गेले त्या परमबीर सिंह आणि तुरुंगात असलेल्या सचिन वाझे यांनी आज माझ्यावर केलेल्या आरोपांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी होत आहे याचं मला अतिशय दुःख आहे, अशी खंतही अनिल देशमुख यांनी या वेळी व्यक्त केली.