
राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना क्लीन चिट दिली आहे. सिंह यांच्यावरील सर्व आरोप तसेच त्यांचे निलंबनही मागे घेण्यात आले आहे. बरोबरच त्यांचा निलंबन कालावधी हा ऑन डय़ुटी मानला जावा असेही सरकारी आदेशात म्हटले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर समितीच्या बैठकीपूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मला फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर करण्यात आला. त्याबदल्यात बक्षीस म्हणून आमच्या सरकारने केलेले त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. याबाबत मी आमच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सविस्तरपणे बोलणार आहे. या बैठकीनंतरच मी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी बोलेन.
मला फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर करण्यात आला, अनिल देशमुखांचा आरोप pic.twitter.com/N9gnzXTUMJ
— Saamana (@SaamanaOnline) May 17, 2023
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्या आरोपावरून अनिल देशमुख यांना तुरुंगवास झाला होता. तसेच परमबीर यांच्यावरही अनेक आरोप झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. ऑण्टिलिया बॉम्ब अफवा प्रकरणात त्यांना आयुक्तपद गमवावे लागले होते.
परमबीर सिंह यांच्यावरील या आरोपांची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने पाच स्वतंत्र गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे यापूर्वी मुंबई पोलिसांनी नोंदवले होते. परमबीर यांच्यावर 2 डिसेंबर 2021 रोजी आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. आज ते मागे घेऊन हे प्रकरणच बंद करण्यात आले. शासनाचे संयुक्त सचिव वेंकटेश भट यांनी या आदेश जारी केला.
परमबीर सिंहांनी सरकार पाडण्यासाठी केलेल्या मदतीची शिंदे फडणवीसांनी परतफेड केली: नाना पटोले
























































