एसटीचे साडेचार हजार कोटी रुपये कसे वितरित करणार? अनिल परब यांचा विधानपरिषदेत सवाल

विधानपरिषदेत आज एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या बजेटातील आकडे चुकीचे असल्याचा आरोप करत माहिती दुरुस्त करण्याची मागणी केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सांगण्यात आलेले 4,500 कोटींचे बजेट सहा महिन्यांत कसे वितरित होणार, याचे स्पष्ट स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

परब यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाबाबतही प्रश्न उपस्थित केला. एसटी महामंडळावर पीएफचे नेमके किती देणे बाकी आहे, याची माहिती अद्याप स्पष्ट नसल्याचा आरोप त्यांनी केला. पीएफ कपात केली असेल तर ते गंभीर प्रकरण असून, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकावर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

तसेच, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेत विलिनीकरणाच्या मागणीवरही परब यांनी सरकारला जाब विचारला. एसटी कर्मचार्‍यांना सरकारी कर्मचारी म्हणून सामील करून घेण्याबाबत सरकारची भूमिका नेमकी काय आहे, हे स्पष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रश्नांमुळे सभागृहात एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर पुन्हा एकदा चर्चा रंगली.