उपोषण न करण्याचा अण्णा हजारेंचा निर्णय, गिरीश महाजनांनी केली मनधरणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, राळेगणसिद्दी

गांधी जयंती म्हणजे आजपासून उपोषण, आंदोलनाचा इशारा देणाऱ्या अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्दीमध्ये एक पत्रकार परिषद घेत आपण उपोषण करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. यापूर्वी त्यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन त्यांनी उपोषण करू नये अशी विनंती केली होती. या भेटीनंतर अण्णा हजारे यांनी बोलताना सांगितले की अजून लोकपाल लोकायुक्त नेमण्यात आलेला नाही, कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी असे प्रश्न प्रलंबित असल्याचं म्हटलं आहे. ठिबक सिंचनावर १८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे , तो कमी केला पाहीजे अशी मागणीही अण्णांनी केली आहे.  राज्यामध्ये लोकपालाला मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत अशी मागणीही अण्णांनी केली आहे. या सगळ्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन मिळाल्याने आपण तूर्तास उपोषण न करण्याचा निर्णय घेतल्याचं अण्णांनी सांगितलं आहे.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की सरकारने अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्याने अण्णांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती महाजन यांनी केली होती.