
मनी लॉण्डरिंगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी या याचिकेची आज दखल घेत अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) याप्रकरणी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
मनी लॉण्डरिंगच्या आरोपाअंतर्गत ईडीने अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 साली अटक केली. देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत असून ईडीने आपल्याला खोटय़ा प्रकरणात गोवल्याचा आरोप करत देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात ऍड. अनिकेत निकम व ऍड. इंदरपाल सिंग यांच्या वतीने याचिका दाखल केली आहे. देशमुखांच्या या अर्जावर आज न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी ऍड. निकम यांनी खंडपीठाला सांगितले की, ईडीने आपल्या अशिलावर केलेले आरोप खोटे आहेत. देशमुख हे 73 वर्षांचे असून त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तसेच त्यांचा खांदा सरकला असून त्यांच्या प्रतिकार शक्तीवर परिणाम झाला आहे. त्यांना दुसऱयाचा आधार घ्यावा लागतो त्यामुळे दया दाखवत न्यायालयाने त्यांना जामीन द्यावा. न्यायालयाने याची दखल घेत ईडीला याप्रकरणी उत्तर देण्याचे आदेश देत सुनावणी 8 एप्रिलपर्यंत तहकूब केली.




























































