
सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे बिल काढण्यासाठी लाच घेणार्या व लाचेची मागणी करणार्या जालना जिल्ह्यातील भोकरदन पंचायत समितीतील 2 कंत्राटी कर्मचार्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने कारवाई केली. यापैकी एका कर्मचार्याने 7 हजार रुपयांची लाच घेतली, तर दुसर्याने 3 हजार रुपयांची लाच मागितल्याचे कारवाईत समोर आले. ही कारवाई 17 जुलै रोजी सोमवारी भोकरदन पंचायत समिती कार्यालयात करण्यात आली.
पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक (पीटीओ) प्रशांत रामेश्वर दहातोंडे व संगणक परिचालक सतिश रामचंद्र बुरंगे, असे कारवाई झालेल्या कंत्राटी कर्मचार्याचे नाव आहे. तालुक्यातील दावतपूर येथील महाराष्ट्र रोजगार हमी योजना मनरेगाअंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर मंजूर करण्यात आली होती. विहिरीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचे बिल मस्टर काढण्यासाठी पिटीओ प्रशांत दहातोंडे व मनरेगा कर्मचारी सतिश बुरंगे यांनी पैशाची मागणी केली. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, कर्मचारी शिवाजी जमधडे, कृष्णा देठे यांनी सोमवारी भोकरदन पंचायत समिती परिसरात सापळा लावला. त्यावेळी प्रशांत दहातोंडे व कंत्राटी मनरेगा कर्मचारी सतिष बुरंगे यांनी मनरेगाअंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे 1 लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी 9 हजारांची मागणी केली. तडजोडीअंती 7 हजार रुपये स्वीकारले, तर मनरेगा कर्मचारी सतिष बुरंगे यांनी अंतिम बिलावर सही घेण्यासाठी 3 हजार रुपयांची मागणी केली. परंतु, ते स्वीकारले नाहीत. एकाने पैसे स्वीकारताच पथकाने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.































































