Video – अंधश्रध्दा टाळा, चंद्रपुरात गणेश मंडळात झळकले बॅनर

चंद्रपूर  जिल्ह्यात जादुटोणा केल्याचा संशयावरून अमानुष मारहाण झाल्याच्या चार घटना घडल्या. या घटनांनी जिल्हा हादरला आहे. मानवी मेंदूत भिनलेली अंधश्रध्दा दुर करण्यासाठी गणेश मंडळे सरसावली आहेत. अंधश्रध्दा निर्मुलन कायद्याची माहीती देणारे बॅनर गणेश मंडळानी लावले. कार्टून चित्राचे वापर करीत तयार केलेले बॅनर भक्तांचे लक्ष वेधत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादुटोण्याचा संशयावरून अमानुष मारहाणीचा प्रकार पुढे आला. या प्रकाराने पुरोगामी महाराष्ट्र हादरला. हे प्रकरण ताजे असतांनाच नागभीड तालुक्यात दोन घटना जादूटोणा केल्याचा संशय घेत मारहाण झाली. त्यानंतर चंद्रपूर शहरातील भिवापूर परिसरात घडली, एकविसाव्या शतकातही मानवी मेंदुत अंधश्रध्दा भिनली असल्याचा प्रत्यय या चार घटनांनी घडवून दिला.

ग्रामीण,शहरी भागात बुवाबाजी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सन 2013 मध्ये शासनाने अंधश्रध्दा निर्मूलन कायदा अमलात आणला. मात्र या कायद्याची माहीती नसल्याने बुवाबाजीचा नादी सर्वसामान्य माणूस लागत आहे. अशात धाबा उप पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील गणेश मंडळानी अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याची माहीती देणारे बॅनर झळकवले आहेत.

राजूरा आणि गडचांदूर या दोन्ही उपविभागातील गणेश मंडळाची अध्यक्ष,पोलीस पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीत अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याबाबत चर्चा झाली. अंधश्रध्दा निर्मूलन होईल असे देखावे सादर करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी केले. त्यानुसार धाबा उपपोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील गणेश मंडळानी ठाणेदार सूशिल धोकटे यांची भेट घेतली. अंधश्रध्दा निर्मूलन कायदा जानून घेतला आणि कार्टून चित्राचा माध्यमातून अंधश्रध्दा निर्मूलन कायदा दर्शविणारे बॅनर झडकविले. हे बॅनर भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या