
सामना प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरालगत असलेल्या पावना शेतशिवारात एक शृंगी किंवा हुमा जातीचा मोठा घुबड जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळताच वन्यजीवप्रेमींनी घटनास्थळी पोहचत घुबडाला जीवदान देत उपचार सुरू केले. गरुडाच्या आकाराचा हा दुर्मिळ घुबड आता वनविभागाच्या देखरेखीत उपचार घेत आहे.
वरोरा शहराच्या 10 किमी अंतरावर असलेल्या पावना शेतशिवारात एक घुबड जखमी अवस्थेत असल्याचे समजताच APPAS या वन्यजीवसंस्थेच्या पदाधिकारी विशाल मोरे व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हुमा किंवा शृंगी जातीचा मोठा घुबड असून एखाद्या तारेच्या फाशात अडकल्याने तो जायबंदी झाला असावा अशी शक्यता होती. त्याच्यावर उपचार करण्यासाठी आपास संस्थेतील विशाल मोरे यांनी वनविभागात उपचाराकरिता आणला असता वरोरा येथील वनविभागामध्ये बघ्यांची गर्दी जमली. तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्याच्यावर उपचार करण्यात येत असून हे घुबड भारतीय उपखंडात आढळते. त्याचा आकार एखाद्या गरुडासारखा मोठा असल्याने त्याचे नाव हुमा घुबड ठेवले गेले.
वन्यजीव आणि पक्ष्यांचे जीव वाचविण्यासाठी वनविभाग करत असलेल्या जागृती मोहिमेमुळे अनेक जीव वाचविण्यासाठी वन्यजीवप्रेमी पुढाकार घेत आहेत. अशाच एका प्रयत्नाने शृंगी किंवा हुमा या जातीच्या मोठा घुबडाला पुन्हा एकदा आकाशात भरारी घेता येणार आहे. वनविभागाच्या मदतीने गेल्या दोन दिवसापासून हे घुबड प्राणी प्रेमी व डॉक्टर यांच्या निगराणीत असून घुबडाच्या दोन्ही पायांना जखमा झालेल्या आहेत. त्या जखमा जोपर्यंत दुरुस्त होणार नाहीत तोपर्यंत वनविभागाने या घुबडाला उपचार देण्याचे ठरविले आहे.
या घुबडाला टायगर घुबड असे सुद्धा संबोधण्यात येते. या घुबडाची उंची दोन फूट असून एक मीटर रुंदीचे पंख पसरून हे भलेमोठे घुबड वन विभागात उपचार घेत आहे. यासाठी वन विभागाचे सहायक वन अधिकारी संजय झाडे, सिडाम वनरक्षक, अप्पास संस्थेतील विशाल मोरे, पंकज खाजोने, वैभव मोरे, प्रणय मोटके आदींनी परिश्रम घेतले.

























































