पंढरपूर कॉरिडॉरबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार, भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

वाराणसी, उत्तराखंड येथील हिंदूंची धार्मिक स्थळे पाडल्यानंतर, मोदी सरकार तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील मठ, मंदिरे आदी धार्मिक स्थळांवर हातोडा चालविण्याच्या तयारीत आहे. मोदींची हिंदूविरोधी ही कृती रावणाप्रमाणे असल्याचे ट्विट भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केले आहे. दरम्यान, पंढरपूर कॉरिडॉरबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.

पंढरपूर कॉरिडॉर जाहीर झाल्यापासून बाधित नागरिकांसह, व्यापारी व वारकरी संप्रदायानेही याला विरोध सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर वीर महाराज यांनी माजी खासदार स्वामी यांची भेट घेऊन देशातील इतर तीर्थक्षेत्रे व पंढरपूर यामध्ये मोठा फरक असल्याची माहिती दिली. येथे भजन, कीर्तनाची परंपरा असून, विविध संतांचे मठ, पारंपरिक वास्तू यांना महत्त्व आहे. कॉरिडॉरमध्ये हे मठ, मंदिरे, वाडे बाधित झाल्यास वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेला धक्का पोहचणार आहे. वारकऱयांसाठी हा कॉरिडॉर होणार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी महाराज मंडळी व वारकऱयांचाच यास विरोध असल्याचे वीर महाराज यांनी निदर्शनास आणले.

यावर सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पंढरपूरला भेट देणार असून, श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणार असल्याचे सांगितले. यावेळी येथील परिसराची पाहणी करून स्थानिकांची बैठकदेखील घेणार आहे. शिवाय पंढरपूर कॉरिडॉरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, वारकरी शिष्टमंडळाच्या भेटीनंतर स्वामी यांनी तीव्र शब्दांत ट्विट केले असून, यामध्ये मोदी रावणासारखे कृती करीत असल्याचे माजी खासदार स्वामी यांनी म्हटले आहे.