
सामना प्रतिनिधी । मुंबई
शीना बोरा हत्याकांडप्रकरणी गेल्या तीन वर्षांपासून अटकेत असलेल्या इंद्राणी आणि पीटर मुखर्जी या दांपत्याने आता खऱ्या अर्थाने एकमेकांपासून विलग होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात प्रत्यक्ष हजेरी लावत घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला. त्याच्या या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शीना बोरा हत्याप्रकरणी अटक झाल्यापासून पीटर आणि इंद्राणीमधील संबंध विकोपाला गेले आहेत. त्याचमुळे त्याने 2016 साली इंद्राणीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत तसे सीबीआय कोर्टालाही कळविले होते. पीटर मुखर्जीने त्याचा निर्णय कोर्टाला कळविल्यानंतर तब्बल एक वर्षाने इंद्राणीने पीटरकडून घटस्फोट मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज करण्याची न्यायालयाकडे परवानगी मागितली.
या दोघांचे सीबीआय न्यायालयाकडे प्रलंबित असलेले ते अर्ज 14 सप्टेंबर रोजी सुनावणीस आले. त्यावेळी न्यायाधीशांनी या दोघांना घटस्फोटाचा अर्ज करण्याची परवानगी देत आज मंगळवारी त्यांना प्रत्यक्ष कुटुंब न्यायालयात हजर करण्याचे तुरुंग प्रशासनाला आदेश दिले. या आदेशानुसार पोलिसांनी दोघांना वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात हजर केले.
दरम्यान, इंद्राणीने हा घटस्फोट अर्ज सादर करताना पीटर मुखर्जीच्या तिच्या फ्लॅटमध्ये असलेल्या वस्तू तातडीने हटविण्याची मागणी केली आहे. माझ्या 19 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये तुझ्या ज्या काही वस्तू असतील त्या तू स्वतःच्या 18 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट कर असेही इंद्राणीने पीटरला म्हटले आहे.




























































