
हिंदुस्थानचे माजी महान फलंदाज राहुल द्रविड यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आपण तयार असल्याचे बीसीसीआयला सांगितले असले तरी बीसीसीआयकडून रविवारी मुख्य प्रशिक्षकांसह फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक व राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमी क्रीडा विज्ञान व मेडीसीन प्रमुख या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. राजेंद्र लोढा समितीच्या शिफारसीनुसार बीसीसीआयचा आपले कामकाज चालवत असून राहुल द्रविड यांना थेट नियुक्त करण्याआधी बीसीसीआयकडून अर्ज मागवून औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे.
सपोर्ट स्टाफसाठी 10 कसोटी किंवा 25 वन डेंचा अनुभव
बीसीसीआयकडून सपोर्ट स्टाफमधील पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱया व्यक्तीकडे किमान 10 कसोटी किंवा 25 वन डेंचा अनुभव असणे अनिवार्य असणार आहे. तसेच राज्य असोसिएशन किंवा आयपीएलमधील संघांचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे.
मुख्य प्रशिक्षकासाठीच्या अटी अन् शर्ती
- दोन वर्षांचा करार होणार
- 14 ते 16 जणांच्या स्टाफवर देखरेख ठेवावी लागणार
- किमान 30 कसोटी किंवा 50 वन डे खेळण्याचा अनुभव अनिवार्य
- कसोटी खेळलेल्या देशाला दोन वर्षे मार्गदर्शन करण्याचा अनुभव
- आयपीएल, प्रथम श्रेणी संघाला मार्गदर्शन करण्याचा अनुभव
- बीसीसीआयचे लेव्हल थ्रीचे सर्टिफिकेट असणे अनिवार्य
- नियुक्तीच्या वेळी 60 वर्षांपेक्षा कमी वय असणे अनिवार्य
क्रीडा विज्ञान व मेडिसीन प्रमुख पदासाठी अर्ज
राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीतील क्रीडा विज्ञान व मेडिसीन या प्रमुख पदासाठीही अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीकडे क्रीडा व मेडिसीनचा अनुभव असणे आवश्यक आहे. चीफ मेडिकल ऑफिसर किंवा मेडिकल संचालक या पदांचा अनुभव असलेला व्यक्तीही या पदासाठी अर्ज करू शकणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा मेडिसीन प्रमुख म्हणून काम केलेल्यांनाही या पदासाठी अर्ज करता येणार आहे.




























































