आभाळमाया – परप्रकाशाचे चांदणे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठवडय़ात अवकाशातील दूरस्थ क्वेझार किंवा ‘किंताऱ्यां’ची माहिती घेताना या वेळी पल्सार म्हणजे स्पंदक ताऱ्यांबद्दल लिहावं असं ठरवलं होतं, पण परवा कोजागिरी पौर्णिमा झाली आणि लक्षात आलं की, चंद्राच्या शीतल प्रकाशाविषयी आधी लिहावं. पल्सार पुढच्या आठवडय़ात. आपल्या सांस्कृतिक चांद्रवर्षात चंद्राला आणि त्याच्या तिथींना खूप महत्त्व आहे. पृथ्वीचा हा नैसर्गिक उपग्रह अवघ्या सूर्यमालेतील एकमेवाद्वितीय असा आहे. त्याचा आकार, पृथ्वीपासूनचं अंतर आणि सूर्य-पृथ्वी-चंद्र यांच्या आकाराचं व अंतराचं वैश्विक योगायोगाने जुळलेलं गणित या सगळय़ाच्या अभ्यासात ज्ञान तर आहेच, पण गंमतही आहे. सूर्य-पृथ्वी अंतर हे पृथ्वी-चंद्र अंतराच्या चारशे पट असून सूर्य चंद्रापेक्षा आकाराने चारशे पट मोठा आहे. या किमयेमुळे आपल्याला विलक्षण असं खग्रास सूर्यग्रहण अनुभवता येतं. ते नेहमी अमावास्येलाच घडतं.

म्हणजे चंद्राची एखादी अमावास्या आपल्याला सूर्याच्या प्रभामंडलाचं तेज दाखवते तर अनेक पौर्णिमा रात्री पृथ्वीवर शीतल वाटणारा चंदेरी प्रकाश पसरतात. सूर्यमालेतील प्रत्येक गोष्ट आपल्याला दिसते ती सूर्याच्या परावर्तित प्रकाशातच! दिवसा पृथ्वीवरचा आपला वावर परावर्तित सूर्यप्रकाशांमुळेच सहज शक्य होतो. रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे सर्व ग्रह सूर्यप्रकाश परावर्तित करतात म्हणूनच आपल्याला दिसतात. एवढंच कशाला, अंतराळात माणसाने धाडलेले कृत्रिम उपग्रह तसंच ‘स्पेस स्टेशन’ सूर्यप्रकाश त्यावर पडत असतो तेवढा वेळच आपल्याला पाहता येतात. असे उपग्रह सूर्यास्तानंतर त्यांच्या पृथ्वीपासून तीनशे ते आठशे कि.मी.च्या उंचीवर असल्याने त्यांच्यावर पडत असलेल्या सूर्यप्रकाशामुळे काही काळ चमकतात.

चंद्राची तीच कथा. चंद्राचं पृथ्वीपासूनचं सरासरी अंतर तीन लाख चौऱ्याएWशी हजार कि.मी. एवढं आहे. ते त्याच्या निवृत्ताकार (एलिव्हिकल) कक्षेमुळे थोडं कमी-जास्त होत असतं. कधी ते तीन लाख शेहेचाळीस हजार कि.मी. एवढं कमी होतं तर जास्तीत जास्त अंतर चार लाख सहा हजार कि.मी.पर्यंत जातं. आता एखाद्या पौर्णिमेला चंद्र योगायोगाने पृथ्वीच्या खूप जवळ म्हणजे ‘उपभू’ स्थानी असेल तो ‘सुपरमून’ ठरून त्याचा प्रकाश थोडासा अधिक जाणवतो.

आपल्या पृथ्वीचाही असाच परावर्तित प्रकाश अंतराळातून पृथ्वीकडे पाहणाऱ्याला जाणवतो. किंबहुना त्यामुळेच पृथ्वी अंतराळवीरांना दिसते. तसेच आपल्याला ग्रहसुद्धा दिसतात. तारे मात्र सूर्यासारखे स्वयंप्रकाशी असतात हा महत्त्वाचा फरक. पृथ्वीवर स्वयंप्रकाशी असणारे काजव्यासारखे सूक्ष्म सजीव किंवा काही सागरी मासे आणि रेडियमचा अंश असलेली काही झाडांची खोडं याशिवाय सारी सारी सृष्टी परप्रकाशित असते. म्हणून रात्री आपल्याला कृत्रिम प्रकाश निर्माण करावा लागतो. त्यासाठी दिवटय़ा, मशाली, पणत्यांपासून रॉकेल, गॅस आणि विजेचे दिवे टप्प्याटप्प्याने माणसाने (चांगल्या अर्थाने) लावले! एडिसनने विजेच्या बल्बचा शोध लावून रात्रीचा अंधार बराच घालवला.

परंतु चंद्राच्या चांदण्यांचा अनुभव घ्यायचा तर कृत्रिम दिवे नसलेल्या ठिकाणीच जायला हवं. प्रत्येक ग्रहाचं सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचं ठरावीक प्रमाण आहे. बुध ग्रह 0.12, शुक्र 0.59, पृथ्वी 0.31, चंद्र 0.11, मंगळ 0.15, गुरू 0.44 आणि शनि 0.46 टक्के सूर्यप्रकाश परावर्तित करतो. आकडय़ाच्या खेळात चंद्र परावर्तित करत असलेल्या प्रकाशाचं प्रमाण सर्वात जास्त असलं तरी बुधाचंही जवळपास तेवढंच आहे. मग गुरू, शुक्र आणि चंद्र क्रमाने अधिकाधिक तेजस्वी का दिसतात याचं उत्तर त्यांचा आकार आणि त्यावरचं वातावरण तसंच त्यांचं पृथ्वीपासूनचं अंतर यांच्या गणितात दडलेलं आहे. शुक्रावर कार्बन सल्फरच्या ढगांचं दाट आवरण असल्याने प्रकाशाचं जास्त विकिरण (रिफ्रॅक्शन) होतं. गुरू दूर असला तरी आकाराने प्रचंड मोठा आणि वायुरूप पृष्ठभागाचा ग्रह आहे. आणि चंद्र लहान असला तरी तो आपल्या परसात (बॅकयार्ड) असल्याइतका जवळ आहे. जवळचा मंद दिवाही प्रखर वाटतो तसंच. त्यामुळे पूर्ण चंद्र देत असलेलं चांदणं शीतल, प्रकाशदायी वाटतं. पौर्णिमेच्या प्रकाशात आपण प्रवासही करू शकतो. त्याला चंद्राचा ‘आल्बिडी’ म्हणतात. आल्बिडी म्हणजे प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता.