
नागालॅण्ड गोळीबारासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सोमवारी निवेदन दिले आहे. हे ‘ओळख चुकल्याचे’ प्रकरण असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. ‘नागालॅण्डमधील दुर्दैवी घटनेबद्दल भारत सरकार तीव्र दु:ख व्यक्त करते आणि शोकसंतप्त कुटुंबांप्रति तीव्र संवेदनाही व्यक्त करते’, असेही शहा यावेळी म्हणाले.
जवानांच्या समोर आलेली गाडी आणि त्यामधील लोकांची हालचाल संशयास्पद वाटल्याने लष्कराने गोळीबार केला होता. या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला होता. लोकसभेत अमित शाह म्हणाले की, लष्कराच्या 21 पॅरा कमांड्सना मोन जिल्ह्यातील तिरू भागात संशयित बंडखोरांच्या हालचाली असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर लष्कराने तेथे सापळा रचला. शनिवारी सायंकाळी एक कार तेथून जात असताना लष्कराने गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र ही गाडी थांबण्याऐवजी तेथून वेगाने पुढे जाऊ लागली. यानंतर वाहनात संशयित असल्याच्या भीतीने लष्कराने गोळीबार केला. या गाडीत 8 जण होते. या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला होता. अमित शाह म्हणाले की, नंतर हे चुकीच्या ओळखीचे प्रकरण असल्याचे सिद्ध झाले.
Army received information on movement of extremists in Nagaland’s Mon, ’21 Para Commando’ unit laid ambush: Home Minister Amit Shah in LS
— Press Trust of India (@PTI_News) December 6, 2021
मोन जिल्ह्यातील वातावरण हे गंभीर असले तरी परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याचेही सांगण्यात आले आहे. 5 डिसेंबर म्हणजेच रविवारी राज्याचे पोलीस महासंचालक आणि आयुक्तांनी या भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्य पोलिसांच्या गुन्हे विभागाकडे देण्यात आला आहे. तसेच चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच त्यांना सर्व चौकशी महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही अमित शहा म्हणाले.
Current situation is tense but under control. On 5th Dec, #Nagaland DGP & Commissioner visited the site. FIR registered & keeping the seriousness in mind, probe handed over to State Crime Police Station. SIT formed, it has been directed to complete probe within a month: HM in LS pic.twitter.com/R8ao2xnTia
— ANI (@ANI) December 6, 2021
म्यानमार सीमेवरील नागालॅण्डमध्ये सुरक्षा दलांच्या गोळीबारात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. दहशतवादी असल्याच्या संशयावरून जवानांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या संतापाचा प्रचंड भडका उडाला. त्यांनी सुरक्षा दलांच्या तीन गाड्या पेटवून दिल्या. या हिंसाचारात काही जवानांनाही दुखापत झाली असून त्यातील एका गंभीर जखमी जवानाचा मृत्यू झाला. गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून लष्कराने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले आहेत.
मोन जिह्यातील ओटींग गावात शनिवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी तिरु-ओटींग रस्त्यावर दहशतवाद्यांवर हल्ला करण्याची तयारी केली होती. या ऑपरेशनदरम्यान जवानांनी ‘एनएससीएन’ ग्रुपचे दहशतवादी असल्याच्या संशयातून स्थानिक नागरिकांवर गोळीबार केला. यात 6 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी सुरक्षा दलांना घेरले. यावेळी जवानांनी स्वसंरक्षणार्थ स्थानिकांच्या जमावावर गोळ्या झाडल्या, यामध्ये आणखी काही नागरिकांचा मृत्यू झाला. तर संतप्त जमावाने सुरक्षा दलांच्या तीन गाडया जाळल्या. या हिंसाचारात 13 नागरिकांचा आणि एका जवानाचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांना मिळालेल्या ‘इनपुट’मध्ये ज्या रंगाच्या गाडीचे वर्णन केले होते, ती गाडी त्या परिसरातून गेली. जवानांनी गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र गाडी थांबवली गेली नाही. त्यानंतर जवानांनी गोळीबार केला. गोळीबारात ठार झालेले सर्व मजूर होते. ते पिक अप व्हॅनमधून घरी चालले होते. या घटनेनंतर नागालॅण्डमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून खबरदारी म्हणून मोन जिह्यातील इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आली आहे.



























































