
अर्णब गोस्वामीला पोलीस कोठडी द्यावी यासाठी रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर तसेच जामीन मिळावा म्हणून अर्णबने केलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी 12 नोव्हेंबर रोजी अलिबाग सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
रायगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्णब गोस्वामी याला पोलीस कोठडी मिळावी यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्याची गेल्या चार दिवसांपासून न्यायाधीश आर. जे. मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
पोलिसांची पुनर्विचार याचिका मेंटेनेबल आहे का, याबाबत आरोपी नितेश सारडा याने अर्ज केला होता. तो अर्ज सकाळच्या सत्रात न्यायमूर्ती मल्लशेट्टी यांनी फेटाळून लावला. त्यानंतर दिवसभर आरोपीच्या वकिलांनी पुनर्विचार याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण केला. त्यावर विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी आपले म्हणणे मांडले. त्यामुळे पुनर्विचार याचिकेवरील दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आज पूर्ण झाला.
अर्णबसह दोघांनाही पोलीस कोठडीच मिळावी
पुनर्विचार याचिकेवर उद्या सरकारी वकील पुन्हा आपले म्हणणे मांडणार आहेत. ते ऐकल्यानंतर गुरुवारी पुनर्विचार याचिका आणि अर्णबने दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती मल्लशेट्टी निकाल देणार आहेत. अर्णबच्या जामीन अर्जाला कडाडून विरोध करणार असून आरोपींना पोलीस कोठडीच मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सांगितले.



























































