सराफाकडे 20 लाखांची खंडणी मागणाऱ्याला अटक, कोरेगाव पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलाला जीवे मारण्याची धमकी देत सराफाकडे 20 लाखांची खंडणी मागणाऱयाला कोरेगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्तीच्या नावे सीमकार्ड ऍक्टिव्हेट करुन, त्याद्वारे खंडणी मागण्यात आली होती. पोलिसांनी वेषांतर करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या साथीदाराचा शोध सुरु आहे.

राजेंद्र भगवान मोहिते (रा. लक्ष्मीनगर, कोरेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. राजेंद्र मोहिते याने सराफाकडून खंडणी उकळण्याचा कट आपल्या साथीदारांसह रचला. त्याने नव्याने कोल्हापूर जिह्यातील व्यक्तीच्या नावे मोबाईल व सीमकार्ड खरेदी केले. या कार्डवरुन त्याने संबंधित सराफाला फोन करुन तुझ्या मुलाला जीवंत ठेवत नाही, जिवंत रहायचे असेल तर 20 लाख रुपयांची खंडणी दे, अशी मागणी करत होता. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मोबाईल क्रमांकाच्या आधारे शोधमोहीम सुरु केल्यावर प्रथमदर्शनी कोल्हापूर जिह्यातील व्यक्तीचा सहभाग दिसून आला, मात्र त्यानंतर तो क्रमांक सातारा जिह्यातच वापरात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पुसेगाव, भुईंजसह कोरेगाव परिसरात मोबाईल शॉपींमध्ये शोधमोहीम हाती घेतली. एकीकडे पोलीस संशयिताच्या जवळपास पोहोचत असतानाच, खंडणीखोराने सोनाराला खंडणीचे पैसे घेऊन त्रिपुटी खिंड परिसरात बोलावले, पोलिसांनी तातडीने वेषांतर केले आणि खावली, त्रिपुटी व भिवडी परिसरात सापळा रचला. मात्र, पोलिसांचा संशय आल्याने खंडणीखोराने पुन्हा फोन करुन धमकी दिली. त्यानंतर त्याने मोबाईल बंद ठेवला.

पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु केला. त्यानंतर लक्ष्मीनगर परिसरात एकजण स्वतःची ओळख लपवून राहत असल्याची माहिती दिली. या माहितीची पडताळणी करत असतानाच तो निसटण्याचा प्रयत्नात होता. मात्र, सहायक निरीक्षक अर्चना शिंदे व पथकाने पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.