वेधक – बुद्धिबळाच्या मदतीने व्यक्तिमत्त्व विकास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

बुद्धिबळ हा केवळ स्पर्धात्मक खेळ नसून किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतो, असे महत्त्वपूर्ण निष्कर्ष डॉ. मकरंद वेलणकर यांच्या पीएचडी संशोधनातून समोर आले आहेत. विचारपूर्वक निर्णय घेणारी, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम पिढी घडविण्यासाठी ते संशोधन समाजापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

बुद्धिबळाच्या व्यक्तिमत्त्व विकासातील भूमिकेचा अधिक व्यापक अभ्यास करणारे पुण्यातील डॉ. मकरंद वेलणकर यांनी याबाबत महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. बुद्धिबळ हा केवळ स्पर्धात्मक खेळ नसून किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतो, असा निष्कर्ष त्यांच्या संशोधनातून समोर आला आहे. संशोधनामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या किशोरवयीन वयाच्या व्याख्येनुसार 10 ते 19 वर्षे वयोगटातील 612 विद्यार्थी आणि 478 पालकांचा सहभाग होता. पुणे जिह्यातील बुद्धिबळ खेळणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याकडून माहिती संकलित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अनुभवांबरोबरच पालकांच्या निरीक्षणांनाही संशोधनात महत्त्व देण्यात आले. संशोधनामध्ये विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती, बुद्धिबळ खेळण्याचा कालावधी आणि प्रशिक्षणाची पद्धत या घटकांचा सखोल अभ्यास करण्यात आला.

संशोधनातील निष्कर्षांनुसार, एक वर्षापेक्षा कमी काळ बुद्धिबळ खेळणाऱया विद्यार्थ्यांच्या तुलनेत एक ते तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ नियमित बुद्धिबळ खेळणाऱया विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक-भावनिक थकवा लक्षणीयरीत्या कमी असल्याचे दिसून आले. मित्र, नातेवाईक किंवा सामाजिक माध्यमांद्वारे अनौपचारिकरीत्या बुद्धिबळ शिकणाऱयांच्या तुलनेत प्रशिक्षित मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने बुद्धिबळ शिकणाऱया विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्थैर्य अधिक असल्याचेही अभ्यासातून स्पष्ट झाले.

पालकांच्या मतांच्या विश्लेषणातूनही महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले. नियमित आणि दीर्घकाळ बुद्धिबळ खेळणाऱया विद्यार्थ्यांमध्ये मानसिक अस्वस्थता कमी होत असून धोरणात्मक विचार, सारासार निर्णयक्षमता, नेतृत्वगुण, अंदाज बांधण्याची क्षमता आणि आत्मविश्वास अधिक प्रभावीपणे विकसित होत असल्याचे पालकांनी नमूद केले. विद्यार्थी जितका अधिक काळ बुद्धिबळाशी जोडला जातो, तितक्या प्रमाणात त्याच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक गुण वृद्धिंगत होत असल्याचे या अभ्यासातून अधोरेखित झाले.

डॉ. वेलणकर यांनी यापूर्वी एम फिल करताना `बुद्धिबळाचा कुटुंब आणि समाजावर होणारा परिणाम’ या विषयावर संशोधन केले होते. त्या संशोधनातील सकारात्मक निष्कर्षांमुळे बुद्धिबळाच्या व्यक्तिमत्त्व विकासातील भूमिकेचा अधिक व्यापक अभ्यास करण्यासाठी त्यांनी पीएचडीचा विषय निवडला. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रबंध मराठी भाषेत सादर करण्यात आला आहे.

डॉ. मकरंद वेलणकर म्हणाले, “आज बुद्धिबळाकडे प्रामुख्याने स्पर्धेचा खेळ म्हणून पाहिले जाते. मात्र माझ्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, योग्य प्रशिक्षणासह बुद्धिबळ आत्मसात केल्यास मुलांमध्ये आत्मविश्वास, सारासार विचार करण्याची क्षमता, नेतृत्वगुण आणि सकारात्मक निर्णयक्षमता विकसित होते. प्रत्येक मुलाच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी बुद्धिबळाचा उपयोग व्हावा, या उद्देशाने `आत्मविकासासाठी बुद्धिबळ’ हा अभ्यापाम, `चेस थेरपी’ आणि `बुद्धिबळ साक्षर अभियान’ यांसारखे उपाम राबविणार असून विचारपूर्वक निर्णय घेणारी, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम पिढी घडविण्यासाठी हे संशोधन समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे.”

डॉ. वेलणकर यांनी `आत्मविकासासाठी बुद्धिबळ’ हा स्वतंत्र अभ्यापाम तयार केला असून `चेस थेरपी’ ही अभिनव संकल्पनाही विकसित केली आहे. हट्टीपणा, नैराश्य, समस्या सोडविण्याची क्षमता, सकारात्मक विचारसरणी, एकाग्रता, स्लो लर्नर्सचा विकास, धांदरटपणा कमी करणे आणि `मी जिंकू शकतो’ हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होणार असल्याचा त्यांचा विश्वास आहे. याशिवाय `बुद्धिबळ साक्षर अभियान’, `चेस फॅमिली’, विविध सामाजिक संस्थांसाठी कार्यशाळा व व्याख्यानांचे आयोजन करण्याचाही त्यांचा मानस आहे.

डॉ. मकरंद वेलणकर हे पुण्यातील पहिले नॅशनल आर्बिटर असून बुद्धिबळ विषयावर पीएचडी करणारे पुण्यातील पहिले संशोधक आहेत. 1986 मध्ये स्थापन झालेल्या वेलणकर चेस इन्स्टिटय़ूटच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत 3,000 हून अधिक विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश मिळविले आहे. बुद्धिबळ प्रसारक मंडळाच्या माध्यमातून पहिल्या बुद्धिबळ जल्लोष चेस लीगचे आयोजन, आदिवासी मुलांसाठी बुद्धिबळ प्रशिक्षण, ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या शाळाभेटी, खेळाडूंसाठी मेडिकल कार्ड आदी विविध उपामही त्यांनी राबविले आहेत.

palkarmedha03.gmail.com