दिल्ली डायरी – आसाममध्ये विधानसभेसाठी घमासान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>नीलेश कुलकर्णी [email protected]

आसामची विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तसतसे तेथील राजकीय तापमान वाढू लागले आहे. भाजपचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा ही निवडणूकहिंदू विरुद्ध मुस्लिमया ध्रुवीकरणाच्या भरवशावर जिंकण्याची स्वप्ने पाहत आहेत. मात्र त्यामुळे सगळा 38 टक्क्यांच्या आसपास असलेला मुस्लिम समाज एकगठ्ठा काँग्रेसच्या बाजूने झुकला तर सरमा यांना गाशा गुंडाळावा लागेल. त्यामुळे भाजपच्या धुरिणांनी बोलबच्चन सरमा यांना ‘‘हिंदूमुस्लिमऐवजी ‘‘हिंदू विरुद्ध घुसखोरअसे नरेटिव्ह सेट करण्याचा शहाणपणाचा सल्ला दिला.

कीकडे भाजप आसाममधील आपली सत्ता वाचविण्यासाठी धडपडत असला तरी हाती आलेली सत्ता पुन्हा भाजपला बहाल करण्यासाठी काँग्रेस नेते आसुसले आहेत की काय, अशी शंका येण्याइतपत स्थिती आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी काँगेसची साथ सोडली आहे. ‘बोराजी काँग्रेस नही छोडेंगे, राहुलजीने उनसे बात की है.’ असे काँग्रेसचे आसाम प्रभारी भंवर जितेंद्रसिंग हे जेव्हा टीव्हीपुढे सांगत होते तेव्हा बोरांच्या घरी हेमंत बिस्वा सरमा यांचे जंगी स्वागत केले जात होते. काँगेसमध्ये त्याच त्याच नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देणे व त्यानंतर पक्षाचे हसू करून घेणे हे नित्याचेच झाले आहे. भंवर जितेंद्र हे असेच काँगेसमधले सरंजामदार. त्यामुळे जिंकू शकेल अशी आसामची मॅच काँग्रेस हरली तर आश्चर्य वाटायला नको.

गुवाहाटीच्या पवित्र कामाख्या मंदिरात दर्शन घेऊन आसामच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्याचा निर्धार काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी व्यक्त केला आहे. तो चांगलाच आहे. मात्र प्रियंका यांच्या मार्गात काँग्रेसजनांनी काटे पेरले नाही तरच त्यांचा आसाम जिंकण्याचा संकल्प तडीस जाऊ शकतो. आसाममध्ये भाजप व विशेषत्वाने मुख्यमंत्री सरमा हे हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी जंग लावून त्यात मुस्लिम मतांची फाटाफूट करून हिंदू ध्रुवीकरणावर भर देत आहेत. एआययूडीएचे बद्रुद्दीन अजमल हे देशातलेच नव्हे तर जगातील अत्तराचे मोठे व्यापारी आहेत. अजमल यांच्या पक्षाला ‘बी टीम’ बनवून आसाममध्ये सत्तेचा सुगंध निर्माण करण्याचे डावपेच सरमांनी आखले आहेत. आसाममधील मुस्लिम मतदारांचा कल सध्यातरी काँग्रेसकडे आहे. मात्र तो मतदान होईपर्यंत तसाच राहील, या गैरसमजात काँगेसजन वावरत आहेत. त्याचबरोबर काँगेसमधून भूपेन बोरांसारख्या मोठय़ा नेत्यांनी बाहेर पडण्याने हिंदू मतदारांवरही प्रभाव पडणार आहे. ‘काँगेस से आखिरी मान्यताप्राप्त हिंदू नेता बाहर हो गये,’ ही मुख्यमंत्री सरमा यांची त्यावरील प्रतिक्रिया बोलकीच नाही तर खिजवणारी आहे. मुस्लिम ध्रुवीकरणाच्या नादात काँगेसजनांनी हिंदू समाजातील समाजघटकांकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण हिंदू भाजपच्या बाजूने एकगठ्ठा उभा राहू शकतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगई व त्यांचे सहकारी कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जातात, यावर बरीच समीकरणे अवलंबून असतील. हिंदू-मुस्लिम या ध्रुवीकरणाची कल्पना असल्यानेच प्रियंका यांनी कामाख्या मातेचे आशीर्वाद घेण्याचे ठरविले आहे. हे आशीर्वाद काँग्रेसच्या किती कामाला येतात ते यथावकाश कळेलच.

पुरी, मालवीय विरुद्ध महुआ

तृणमूल काँगेसच्या फायरब्रँड खासदार महुआ मोइत्रा सध्या जोरदार चर्चेत आहेत. त्या अशासाठी की महुआ यांनी एपस्टीन फाईल्स प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या नाकात दम केला आहे. महुआ या वेगवेगळ्या मुद्दय़ांवर सरकारशी संघर्ष करत असतात. त्यामुळे भाजप व सरकारमधील धुरिणांनी त्यांच्या व्यक्तिगत चारित्र्यावर चिखलफेक करण्यापर्यंत घृणास्पद राजकारण केले. आता भाजपच्या आयटी सेलने महुआ यांचे प्रशांत किशोर यांच्याशी असलेले कथित व्हॉटस्अॅप चॅट व्हायरल केले. मात्र हे चॅट खोटे असल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले, त्यामुळे महुआ यांच्या चारित्र्यहननाचा आणखी एक कट धुळीस मिळाला. या बनावट चॅटप्रकरणी आरोपींना पकडण्यासाठी बंगालचे पोलीस नोएडात दाखल झाल्यावर भाजपच्या आयटी सेलप्रमुख अमित मालवीय यांची चांगलीच पळापळ उडाली. आरोपीला वाचविण्यासाठी त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घ्यावी लागली. मात्र महुआ थांबल्या नाहीत की घाबरल्या नाहीत. हरदीप पुरी यांनी एपस्टीन प्रकरणात जितक्या वेळा स्पष्टीकरण दिले तितक्या वेळा महुआ यांनी एपस्टीन फाईल्समधील नवा ई-मेल टाकून त्यावर कमेंट करून हरदीप पुरी हे एपस्टीनशी कसे जोडलेले आहेत, हे सोदाहरण सिद्ध करून दाखविले आहे. महुआ यांच्या एकाही ई-मेल किंवा कमेंटला उत्तर देण्याचे धाडस हरदीप दाखवू शकलेले नाहीत. 

राहुल गांधींचा जलवा

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत जोरदार भाषण ठोकल्याने राहुल गांधी विलक्षण चर्चेत आहेत. राहुल यांचे हे भाषण केवळ देशातच नाही तर विदेशातही चर्चेचा विषय बनले आहे. तसेच पंतप्रधानांनी लोकसभेत भाषण न करणे हादेखील आंतरराष्ट्रीय चर्चेचा मुद्दा बनला आहे. राहुल गांधी यांची एकेकाळी भाजपची नेतेमंडळी यथेच्छ टिंगलटवाळी करायची. पंतप्रधान नरेंद्र मोदी तर त्यांना हेटाळणीयुक्त स्वरांत ‘शहजादे’ म्हणायचे. राहुल यांच्यावर भाजपमधील निशिकांत दुबे, गिरिराज सिंग ही दुय्यम नेतेमंडळी टीका करायची. राहुल गांधींचेही ‘अच्छे दिन’ येऊ लागलेत. त्यामुळे एरवी राहुल यांना कुत्सितपणे ‘राहुलबाबा’ म्हणणारे अमित शहा ‘राहुल… राहुलजी’ म्हणायला लागले आहेत. भाजपने आता त्यांना पप्पू म्हणण्याऐवजी ‘देशविरोधी’ अशी उपमा द्यायला सुरुवात केली आहे. ज्या राहुल गांधींना भाजप खिजगणतीत धरत नव्हती त्या राहुल गांधींचे भाषण रोखण्यासाठी देशाचे गृहमंत्री व संरक्षणमंत्री लोकसभेत सातत्याने उभे राहताना दिसले. राजनाथ यांनी अकरा तर अमित शहा यांनी सात वेळा राहुल गांधींचे भाषण रोखले. राहुल हे आमच्यासाठी ‘यूएसपी’ आहेत. तेच ‘आमचे स्टार प्रचारक’ आहेत, अशी कुचेष्टा करणाऱ्यांना आता ‘इस राहुल को पैसे रोके?’ असा यक्षप्रश्न पडला आहे. दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केलेली टीका प्रभावी होत नाही. सोशल मीडिया व मीडियात राहुल यांची हवा बनत आहे, असा फिडबॅक भाजप नेतृत्वाला मिळाल्यानंतर नेतृत्व अधिकच जागरुक झाले आहे. त्यांनी राहुल गांधी यांना सिरियसली घ्यायला सुरुवात केली आहे. राहुल यांनी आपल्या कामगिरीत सुधारणा नक्कीच केली आहे. मात्र त्यात सातत्य राखणे तितकेच गरजेचे आहे.