
- प्रथमेश डोळे
इंडोनेशियातील नुसादुआ येथे इंटरनॅशनल ग्लोबल नेटवर्क या संस्थेच्या वतीने 22 ते 25 मार्चदरम्यान ‘एशिया इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स’ भरवण्यात आले होते. ‘युनायटेड नेशन’च्या धर्तीवर त्याचे कामकाज चालते. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचारमंथन होणाऱया या कॉन्फरन्समध्ये जगभरातील 470 युवक, विद्यार्थी सहभागी होते. त्यात महाराष्ट्रातील एका मराठी विद्यार्थ्यालाही भाग घेण्याची संधी मिळाली. या परिषदेत आलेले अनुभव.
क्षितिजाच्या पल्याड काय असतं हे अद्याप फक्त कवितेतून वाचलं होतं किंवा आपला देश सोडून जगात अनेक प्रकारचे देश आहेत आणि त्यातही अनेक भाषा व संस्कृती. नुसत्या विचारानेच या जगाच्या अफाट विस्ताराचा अंदाज येतो. खरं तर देश म्हणजे काय तर काही हुशार माणसांनी एखाद्या केबिनमध्ये बसून ओढलेल्या रेषा, परंतु या सीमा फक्त आपल्यासाठी असतात. कवी द. भा. धामणस्कर यांनी एका कवितेत म्हटलंच आहे, ‘‘काही कविता ढगांवर ठेवाव्यात. म्हणजे देशांच्या सीमा ओलांडताना त्या आपोआपच रूपांतरित होतील’’ मीसुद्धा असाच फ्रेंच भाषा शिकलेला, साहित्य वाचायला घेतलेला एक प्रवासी. माझ्यासाठी या सीमा केव्हाच धुसर झाल्या होत्या. तरीही देश ओलांडून जायची वेळ मात्र ‘बाली एशिया इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स’ या एका अनोख्या स्पर्धेत निवड झाल्यामुळे आली.
देशविदेशातली अशी माणसं ज्यांच्याबद्दल फक्त वाचलं किंवा जी फक्त बातम्यांमधून भेटत राहिली ती माणसं आपापल्या देशाचं नाव उंचवायला बाली या इंडोनेशियातील लहानशा बेटावर जमणार होती. बालीला पोहोचल्यानंतर हार घालून आम्हा सगळ्या डेलिगेटस्चं स्वागत झालं. इंडोनेशियन भाषेमध्ये ‘पश्चिम’ दिशेला ‘बारत’ म्हणजेच ‘भारत’ असा शब्द आहे. कारण आपला देश त्यांच्या पश्चिमेला आहे. असे अनेक समान शब्द मला त्या काही तासांमध्येच समजले. कारण हिंदुस्थानबद्दल जगात प्रचंड कुतूहल आहे हे मला तेव्हा समजलं. फिलिपाईन्समधल्या मित्रांनी तर शाहरुख खान आणि आमीर खानचे सिनेमे दहा-बारा वेळा बघितल्याचं अगदी आवर्जून सांगितलं. यादरम्यान बालीच्या रस्त्यांवर हिंदुस्थानच्या खाणाखुणाही दिसत होत्या. मध्येच एखादी कृष्णाची मूर्ती, गणपतीचा फोटो दिसला. एका चौकात तर रथ दिसला, ज्यावर कृष्ण आणि अर्जुन विराजमान झाले होते. बाली या शहराला ‘दी आयलंड ऑफ थाऊजंड टेंपल्स’ असं म्हणतात ते उगाच नाही.
इक्वाडोरपासून ते ईस्ट तैमूर या देशापर्यंत सगळ्याच लहान लहान देशांतून 470 डेलिगेटस् आलेले होते. संस्कृती, भाषा, धर्म अशा सर्व अर्थांनी वेगळे असणारे अनेकजण इथे भेटले. आम्ही सगळे मागच्या बाकावर बसणाऱया विद्यार्थ्यांप्रमाणे तिथे गोंधळ घालत होतो, पण प्रत्येकाला आतून हे ठाऊक होतं की, उद्या मात्र आपण एकमेकांना भिडणार आणि भाषणं ठोकून कूटनीतीचा वापर करून इतरांना हरवायचा प्रयत्न करणार. खरं तर आम्ही सगळेच मुख्य डिबेट होण्याआधीच एकमेकांचे मित्र आणि शत्रू झालेलो होतो. प्रत्येक जण अगदी चाणाक्ष होता. हे देशोदेशीचे चाणक्य इथे येऊन आपल्या दिलेल्या देशाची बाजू लावून धरणार होते. अखेर तो दिवस आलाच. स्थळ होतं बालीमधील आयएमएफ कौन्सिल रूम, विषय होता ‘क्रिप्टो करन्सी.’ म्हणजेच आभासी चलन.
पुलवामामधील शहीदांना श्रद्धांजली
डिबेट सुरू होण्यापूर्वी मी स्टेट ऑफ इस्रायलचा डेलिगेट या नात्याने एक श्रद्धांजली प्रस्ताव मांडला. पुलवामामधील हिंदुस्थानी शहीदांकरिता तो बिनविरोध मंजूर झाला आणि पाकिस्तानवरून आलेल्या एका डेलिगेटलासुद्धा श्रद्धांजली म्हणून उभं राहावं लागलं. एका पाकिस्तानी व्यक्तीला हिंदुस्थानी जवानांना श्रद्धांजली वाहताना पाहून ऊर भरून आला. युनायटेड नेशन्समध्ये डिबेट फार वेगळी होते. त्यात सुरुवातीला प्रत्येकाला एक मिनिट दिला जातो.
तेवढय़ातच देशाचा मुद्दा मांडायचा. त्याच वेळी मी इतरत्र मैत्री प्रस्तावाच्या चिठ्ठय़ा पाठवायला लागलो. बघता बघता इस्रायल, टर्की, मॉरिशस आणि अमेरिका हे देश एकत्र लढून आणि एकमेकांच्या प्रस्तावाला मतदान करून पाठिंबा द्यायला लागले. बघता बघता डिबेट रंगात आली आणि दोन मुख्य गट पडले. विकसित आणि विकसनशील देशांचे. केनिया या देशाची डेलिगेट मात्र विकसनशील देशांच्या हक्कांसाठी लढत होती. त्यात आभासी चलन हे फक्त विकसित देशांसाठी आहे आणि विकसनशील राष्ट्रांना त्याचा फारसा उपयोग नाही असा मुद्दा सारखा उपस्थित होत राहिला, परंतु मी आणि टर्कीच्या डेलिगेटने या दोन गटांत समेट घडवायला केली. त्यात यश आले. सरतेशेवटी आम्ही एक ड्राफ्ट रेझ्युलेशन दोन्ही गटांच्या संमतीने पारित केलं. आम्ही दोन गट एकत्र येऊ शकलो म्हणून सगळय़ाचं कौतुक झालं. रेझ्युलेशनच्या वतीने बोलायला मी आणि टर्कीचा डेलिगेट एलांग अध्यक्ष (आमच्या भाषेत अध्यक्ष म्हणजे प्रेसिडेंट हे सांगितल्यावर तो भलताच खूश झाला होता) या दोघांनी आभासी चलन हे नियंत्रित करण्याकरिता एका जागतिक संस्थेची गरज आहे असेही सांगितले. टाळय़ांच्या कडकडाटात रेझ्युलेशन पारित केलं गेलं. संयुक्त राष्ट्रात खरे डेलिगेट कसं काम करतात याचा एक वेगळाच अनुभव तिथे आला.
देशांच्या सीमा पुसल्या
मला ‘मोस्ट आऊटस्टँडिंग डेलिगेट’ असा पुरस्कार मिळाला आणि कमालीच्या आनंदात मी स्टेजवरून “भारतमाता की जय’’ म्हणालो. त्याच दिवशी बसमध्ये राष्ट्रगीत गाताना माझा ऊर भरून आला होता. अनेकांनी मला गिफ्टस् दिल्या. माझ्या फिलिपिनो रूममेटने त्याच्या देशातली एक नोट मला आठवण म्हणून दिली. मीही तेच केले. परतीच्या वाटेवर निघताना मेक्सिको, कॅनडा, फिलिपाईन्स, अर्थात इंडोनेशिया या देशांमध्ये आता माझे मित्र आहेत या कल्पनेनेच खूप श्रीमंत झाल्यासारखं वाटलं. परत निघालो तेव्हा यातील दिवसात तीनपेक्षा जास्त खंडांतली माणसं मला भेटली होती. त्यांची भाषा कळत नसली तरी त्यांच्याशी मी आपसूक जोडलो गेला होतो. देशोदेशीचे चाणक्य, त्यांचे युक्तिवाद आणि बालीचं निसर्गसौंदर्य हे सगळं मनात साठवत साठवत मुंबई विमानतळावर पाऊल ठेवलं आणि जाणीव झाली की आता देशांच्या सीमा माझ्यासाठी नाहीत.























































