
>> उदय पिंगळे
मान्यताप्राप्त शेअर बाजारात व्यवहार होऊ न शकणारे म्हणजे सूचीबाह्य शेअर्स. भविष्यात या बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता असलेल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या जाहिराती अलीकडे विविध समाजमाध्यमांवर आपण पाहिल्या असतील. सूचीबाह्य शेअर्समध्ये खरेदी-विक्री व्यवहार होऊ शकतो. त्यासाठी विक्रेता आणि खरेदीदार समोरासमोर येणे आवश्यक आहे, त्यासाठी विविध मंच आहेत. सूचीबाह्य शेअर्स सामान्यत त्या कंपन्यांचे प्रवर्तक, त्यांचे नातेवाईक, धनको (कर्ज देणारे), धाडसी गुंतवणूकदार, काही प्रमाणात म्युच्युअल फंड योजना, गुंतवणूक संच व्यवस्थापन कंपन्यांच्या योजना, पर्यायी गुंतवणूक फंड, संबंधित कंपन्यांतील कामगार, हितचिंतक आणि काही प्रमाणात वेगळ्या गुंतवणूक पर्यायांचा शोध घेणारे सामान्य गुंतवणूकदार असू शकतात. या आणि अशा अनेक कंपन्यांमधील शेअर्सचे व्यवहार विविध मंचांवर होत असले तरी गुंतवणूकदारांनी आपल्या सल्लागाराशी चर्चा करून मगच निर्णय घ्यावा.
सूचीबद्ध शेअर्सना बऱ्यापैकी तरलता असते. त्याचे बाजारभाव मागणी-पुरवठा तत्त्वानुसार कमी-अधिक होऊन शेवटी कंपनीची कामगिरी आणि सर्वसाधारण बाजार कल यावर कुठेतरी स्थिरावतात. शेअर बाजारात व्यवहार केलेल्या शेअर्सच्या व्यवहारपूर्ततेची बाजाराची हमी असते म्हणजे विकलेल्या शेअर्सचे पैसे अथवा खरेदी केलेले शेअर्स निश्चित कालावधीत आपल्या डी-मॅट खात्यात येतात. काही तांत्रिक अडचणींमुळे व्यवहार पुरा न झाल्यास बाजार नियमानुसार त्याची पैशांत भरपाई केली जाते.
सूचीबाह्य शेअर्समध्ये खरेदी-विक्री व्यवहार होऊ शकतो. त्यासाठी विक्रेता आणि खरेदीदार समोरासमोर येणे आवश्यक आहे, त्यासाठी विविध मंच आहेत. या शेअर्समध्ये तरलता नसल्याने त्याची योग्य किंमत शोध या मंचावर होईलच असे नाही. त्याचप्रमाणे या शेअर्सचे व्यवहार प्रत्येक वेळी अधिक शेअर्सच्या पटीत करावे लागतात. त्यामुळे अनेकदा ते विक्रेता आणि खरेदीदार या दोघांच्या दृष्टीने अडचणीचे असू शकते. याशिवाय या शेअर्सच्या गुंतवणूकदारांना सूचीबद्ध शेअर्सवर मिळणारे भांडवली नफ्याचे विशेष फायदे मिळत नाहीत. शेअर्स सूचीबद्ध करायला हवेत असे कंपनीवर कोणतेही बंधन नाही. त्याप्रमाणे ते सूचीबद्ध करताना त्यावर किती अधिमूल्य आकारावे याचेही बंधन नाही. त्यामुळे अधिक भाव मिळावा या हेतूने बाजार चढा असतानाच सर्वसाधारणपणे ते सर्वांना उपलब्ध करून दिले जातात. ज्यांचे शेअर्स सूचीबद्ध असतील त्या भांडवल बाजारातील कंपन्यांना अनेक करविषयक सोयी-सवलती प्रवर्तक आणि गुंतवणूकदार या दोघांनाही आहेत. त्यांना भांडवल बाजार आणि सेबी यांचे नियम पाळून मोठय़ा प्रमाणात भांडवल (भागभांडवल आणि कर्ज या दोन्ही स्वरूपात) उभे करता येते.
सूचीबाह्य शेअर्स सामान्यत त्या कंपन्यांचे प्रवर्तक, त्यांचे नातेवाईक, त्याचे धनको (कर्ज देणारे), धाडसी गुंतवणूकदार, काही प्रमाणात म्युच्युअल फंड योजना, गुंतवणूक संच व्यवस्थापन कंपन्यांच्या योजना, पर्यायी गुंतवणूक फंड, संबंधित कंपन्यांतील कामगार, हितचिंतक आणि काही प्रमाणात वेगळ्या गुंतवणूक पर्यायांचा शोध घेणारे सामान्य गुंतवणूकदार असू शकतात.
सूचीबाह्य शेअर्स हे सूचीबद्ध शेअर्सपेक्षा वेगळे कसे?
कमी तरलता,ह कमी पारदर्शकता, कमी नियमन, योग्य मूल्यांकन अशक्य, कमी व्यवहार सुलभ
सूचीबद्ध शेअर्समध्ये गुंतवणूक करताना विचारात घ्यायचे घटक
गुंतवणूकदाराची जोखीम क्षमता, गुंतवणुकीमागील हेतू, तरलतेचा अभाव, गुंतवणूक संच विविधता, नियामक अनुपलब्धता
सूचीबद्ध कंपन्यांत गुंतवणूक कशी करायची?
थेट गुंतवणूक : कंपनी अथवा त्याच्या मध्यस्थ. गुंतवणूक मंच, फिनटेक कंपन्या, दलाल या संबंधात कार्यरत आहेत.
इसॉपच्या माध्यमातून : तुम्ही अशा कंपनीचे कामगार असाल आणि तुमच्या मालकाकडून हे शेअर्स तुम्हाला मिळत असतील तर ते त्याची प्राक्रिया पूर्ण करून घेऊ शकता.
खासगी फंड आणि व्हेंचर कॅपिटल फंड यांची गुंतवणूक : हे लोक अशी गुंतवणूक करतात आणि त्याची पुनविक्री करतात. त्याच्या मार्फत सर्वसाधारण लोक अशी गुंतवणूक करू शकतात.
कर आकारणी : या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक 2 वर्षांच्या आत अल्पकालीन गुंतवणूक समजली जाऊन त्यातून होणारा नफा नियमित उत्पन्नात मिळवून त्यावर नियमित दराने कर आकारणी केली जाते, तर दोन वर्षांनंतर विक्री केली असता होणारा नफा दीर्घ मुदतीचा समजून त्यावर 12.5 टक्के दराने कर आकारणी होईल.
नियामक बंधने : अशा कंपनीचा पब्लिक इश्यू जाहीर झाल्यावर शेअर्सची नोंदणी झाल्यापासून किमान 6 महिने ते शेअर्स गुंतवणूकदार बाजारात विकू शकत नाही.
सूचीबद्ध नसलेले, पण पुढे बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता असलेले शेअर्स योग्य वेळी योग्य किमतीस घेतल्यास दीर्घकाळात मोठा लाभ होऊ शकतो. यावर नियामक बंधने कमी असल्याने व्यवहारात अधिक जोखीम असते. आता अनेक मध्यस्थ, मान्यताप्राप्त ब्रोकर्स, फिनटेक कंपन्या, खासगी कंपन्या यातील व्यवहार खात्रीपूर्वक करून देतात. हे व्यवहार 24 ते 48 तासांत पूर्ण होतात. ते करणाऱ्या काही काही कंपन्या अथवा मंच असे – अनलिस्टेड झोन, आर्म्स सिक्युरिटीज, प्लानिफाय, 3i ग्रुप पीएलसी, एनरीच अॅडव्हरटायजर, वेल्थ विस्डम, इंक्रेड मनी, शेअरकार्ट, स्टोकिफाय, कुबेरग्रोव इत्यादी आणि यासारखे अनेक मंच अशा शेअर्सची खरेदी-पी करण्यात कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी काही कंपन्यांचे उपलब्ध असलेले शेअर्स, त्याचा बाजारभाव, खरेदी-पी संच अशी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या संकेतस्थळासह ग्राहकस्नेही आप्स उपलब्ध असून त्यात दाखवलेले भाव, नक्की किती गुंतवणूक करणार यावर कमी-अधिक होऊ शकतात. मोठय़ा प्रमाणात व्यवहार करायचा असेल तर इच्छुक व्यक्तींशी विशिष्ट दराबाबत वाटाघाटी करता येणे तेथे शक्य आहे.
सध्या अशा गुंतवणूक मंचांवर उपलब्ध असलेले काही शेअर्स असे
एनएसई इंडिया लिमिटेड : सन 1992 मध्ये सरकारच्या पुढाकाराने स्थापन झालेले राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) हे जगातील आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहे ज्यामध्ये सुमारे 2300 कंपन्या सूचीबद्ध आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ, भारतीय स्टेट बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन त्याचे महत्त्वाचे भागधारक आहेत. सन 1994 मध्ये NSE ने इलेक्ट्रॉनिक पीन-आधारित ट्रेडिंग आणि इंटरनेट ट्रेडिंग सुरू केले व भारतीय शेअर बाजारात क्रांती केली. NSE चा प्रमुख निर्देशांक निफ्टी 50 भारतीय भांडवली बाजारांसाठी जागतिक बेंचमार्क म्हणून काम करतो. NSE हे जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे, ज्याचा जागतिक डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रक्ट ट्रेडिंगमध्ये 21 टक्के वाटा आहे. चलनातील फ्युचर्स ट्रेडिंगसाठी ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजदेखील आहे. NSE चे भांडवली बाजार व्यवसाय मॉडेल प्रामुख्याने ट्रेडिंग सेवा, एक्सचेंज लिस्टिंग, मार्केट डेटा फीड, निर्देशांक आणि तंत्रज्ञान उपाय प्रदान करते. त्याचे रोख बाजार इक्विटी शेअर्स, म्युच्युअल फंड, ईटीएफ, आरईआयटी, सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स, सरकारी सिक्युरिटीज, टी-बिल इत्यादींच्या व्यापारासाठी एक व्यासपीठ देते. कर्ज बाजार सरकारी, कॉर्पोरेट बाँड, व्यावसायिक कागदपत्रे आणि इतर कर्ज साधने उपलब्ध करून देते. एनएसई इक्विटी निर्देशांक, हायब्रिड निर्देशांक आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या, विमा कंपन्या, गुंतवणूक बँका, पीएमएस आणि स्टॉक एक्सचेंजसाठी कस्टमाइज्ड निर्देशांकांसाठी निर्देशांक व्यवस्थापन सेवादेखील प्रदान देत आहे. गेल्या तीन वर्षांत कंपनीने 35 टक्क्यांच्या सीएजीआरवर कामगिरी केली आहे. एनएसईचा आर्थिक वर्ष 2024 अखेरचा महसूल रुपये 15640 कोटी, तर निव्वळ नफा रुपये 8327 कोटींवर पोहोचला आहे. प्रति शेअर कमाई रुपये 33.47 आहे. एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/पी किंमत रुपये 1700/- च्या आसपास असून व्यवहार किमान 50 शेअर्सच्या पटीत करावा लागतो. मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत रुपये 1560 / रुपये 8160 या मर्यादेत होती. को लोकेशन घोटाळ्यानंतर काही अंतर्गत चौकशींमुळे त्याचा पब्लिक इश्यू लांबला तो लवकरच येण्याची शक्यता आहे.
टाटा कॅपिटल लिमिटेड : ही टाटा सन्सची उपकंपनी असून भारतीय रिझर्व बँकेकडे ठेवी स्वीकारत नसलेली एनबीएफसी म्हणून नोंदणीकृत आहे. तिच्या उपकंपन्यांसह टाटा कॅपिटल कॉर्पोरेट, रिटेल आणि संस्थात्मक ग्राहकांना वित्तीय सेवा देते. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये विविध प्रकारची कर्जे, गुंतवणूक सल्लागार, क्लीनटेक फायनान्स, खासगी इक्विटी, संपत्ती उत्पादने, व्यावसायिक आणि एसएमई फायनान्स, लीजिंग सोल्युशन्स आणि टाटा कार्ड यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये उलाढाल रुपये 8630/- कोटींवर पोहोचली. प्रति शेअर कमाई रुपये 8.57 आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/पी किंमत रुपये 915 /- च्या आसपास असून व्यवहार 50 शेअर्सच्या पटीत करावा लागतो.
पाम सोलर लिमिटेड : सन 2006 मध्ये स्थापित, पाम सोलर ही भारतातील आघाडीच्या सोलर पीव्ही मॉडय़ूल उत्पादकांपैकी एक आहे. सध्या 3.5 गिगावॅट क्षमतेसह कंपनी एकात्मिक सौर ऊर्जा उपाय, अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) सेवा व ऑपरेशन्स, देखभालदेखील प्रदान करते. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सचे व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत रुपये 402 च्या आसपास होऊ शकतात.
अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड : शाश्वत ऊर्जा क्षेत्रात प्रगती करण्याचे उद्दिष्ट ठेवून अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ही भारतातील उगवत्या कंपन्यांपैकी एक आहे. सन 1994 मध्ये स्थापन झाली असून ती अपोलो ग्रुपची मालकीची आहे. अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लागणाऱ्या सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करते. त्यांची खासियत सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोमास आणि ऊर्जा साठवणूक उपायांना अनुकूलित करणे यामध्ये आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हरित ऊर्जा संसाधनांकडे वळण्यासाठी उद्योग आणि समुदायांना सोबत घेऊन कार्बन फूट प्रिंट कमी करणे हे त्यांचे ध्येय आहे. ही कंपनी नफ्यात असून प्रति समभाग रुपये 16 कमाई करीत आहे. सध्या कंपनी विविध प्रकल्पांवर काम करत आहेत. अंमलबजावणी अंतर्गत प्रकल्पांची एकूण किंमत अंदाजे 1375 कोटी आहे. आशादायक वाढीसह अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक बनली आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/पी किंमत रुपये 210/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो.
या आणि अशा अनेक कंपन्यांमधील शेअर्सचे व्यवहार विविध मंचावर होत असले तरी गुंतवणूकदारांनी आपल्या सल्लागाराशी चर्चा करूनच मगच निर्णय घ्यावा. यात सुचवलेले मंच आणि शेअर्स ही शिफारस समजू नये.
(लेखक अर्थ अभ्यासक आहेत.)