सावध बोली

>> विद्या कुलकर्णी

काही इवलेसे पक्षी उगाचच अशुभाचा शिक्का माथी वागवत राहतात. टिटवी तिचा टिवटिवाट इतर पक्ष्यांना येणाऱया संकटांपासून सावध करतो.

रात्रीच्या नीरव शांततेचे गूढ वाढविण्याचं सामर्थ्य टिटवीच्या निसर्गदत्त आवाजात आहे. हा इवलासा पक्षी त्याच्या ओरडण्याने माणसाच्या उरात धडकी भरवतो. खरं तर टिटवी भक्षकांपासून ‘टिट्-टिट्-टय़ुटिट’ असा आवाज करून आपल्या पिलांचे रक्षण करत असते.

टिटवी हे कॅराड्रिडी (charadriidae) या कुळातील असून हे हिंदुस्थानसह काही आशियाई देशांमध्ये आढळतात. या पक्ष्यांच्या प्रामुख्याने तीन प्रजाती आहेत – रक्तमुखी टिटवी , माळ टिटवी, नदी टिटवी. पायांच्या विशिष्ट रचनेमुळे टिटवीला झाडावर बसता येत नाही. ती जमिनीवरच तुरुतुरु चालते.

रक्तमुखी टिटवी / Red Wattled Lapwing
रक्तमुखी टिटवी पक्ष्याचे फोटो मी सासन गीर, ताडोबा जंगल, हिमालयात अनेक ठिकाणी काढले आहेत. हे पक्षी सुमारे 33 सें. मी. लांबीचे असून त्यांची चोच लाल, डोके, गळा, छाती काळ्या रंगाची, त्याखाली पोटाकडे पांढरा रंग तर पाठीकडून पंखांपर्यंतचा भाग तपकिरी रंगाचा असतो. पाय लांबट पिवळ्या रंगाचे असतात आणि त्यांची मुख्य ओळख म्हणजे दोन्ही डोळ्यांजवळ असणारे लाल रंगाचे कल्ले. नर-मादी दिसायला सारखेच असतात.

हे पक्षी हिमालयात 1800 मी. उंचीपर्यंत व संपूर्ण हिंदुस्थानभर आढळणारे असून ते बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, इराण, इराक वगैरे देशांमध्येही आढळतात. शेतीचे प्रदेश, मोकळे माळरान प्रदेश, उंच जंगलांच्या किनाऱयांजवळ, पाण्याच्या साठय़ाजवळ, टिटवी हे पक्षी हमखास दिसून येतात. लहानमोठे कीटक, शंख-शिंपल्यातील जीव हे टिटवी पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. या पक्ष्यांच्या प्रजननाचा काळ साधारणपणे मार्च ते ऑगस्ट असा असून मादी एकावेळी 3 ते 4 राखाडी, किंवा राखाडी-तपकिरी रंगाची त्यावर काळे ठिपके असलेली अंडी घालते. हे पक्षी घरटे न बांधता तलावांच्या, नदीच्या किनाऱयाजवळील मोकळ्या मैदानात अंडी घालतात. अंडय़ांजवळचा भाग सहसा खोलगट असतो. अंडय़ांजवळ ‘माणूस किंवा जनावर’ यांनी जायचा प्रयत्न केल्यास नर-मादी मोठय़ाने आवाज करून त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधून घेतात.

माळ टिटवी (Yellow Wattled Lapwing)
माळ टिटवी पक्ष्याचे फोटो मी सासन गीर येथे काढले आहेत. हे पक्षी हिंदुस्थानात हरयाणा आणि पश्चिम बंगाल, दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत आढळतात. तसेच पश्चिम बांगलादेश, पाकिस्तान, सिंध आणि श्रीलंका या देशांमध्ये आढळतात. ते धान्यांची कापलेली शेते व पडिक शेतीचा प्रदेश अशा ठिकाणी वास्तव्य करतात. आकाराने हे पक्षी रक्तमुखी टिटवीपेक्षा थोडे लहान असतात. यांच्या पंखांचा आणि पाठीचा रंग मातकट तपकिरी असून पोट पांढरेशुभ्र असते. पाय पिवळे असून लांब असतात. डोके काळे असते. उडताना काळ्या पंखांवरील पांढरे पट्टे ठळक दिसतात. नर आणि मादी दिसायला सारखे असतात. त्यांच्या डोळ्यापासून चोचीवरून लोंबणाऱया पिवळ्याधमक कल्ल्यामुळे त्यांना दुरूनही सहज ओळखता येते.

माळ टिटवी हे पक्षी एकेकटे किंवा जोडीने दिसतात. क्वचित प्रसंगी 4/6 टिटव्यासुद्धा एकत्र उडताना दिसतात. हे पक्षी स्थानिक असून एकाच जागी कायम राहतात. त्यांना त्यांची हद्द अतिशय प्रिय असते आणि त्यासाठी ते टिटव्यांबरोबरच इतर मोठय़ा पक्ष्यांनाही सहज हुसकावून लावतात. हे पक्षी नेहमी जमिनीवरच आढळतात. मातीतील किंवा पानांखाली दडलेले कीटक पकडून खातात. माळ टिटवीचा प्रजननाचा हंगाम उन्हाळ्यात असतो. नर-मादीची जोडी जमल्यावर मादी घरटय़ात 4 अंडी घालते.

नदी टिटवी / River Lapwing
या पक्ष्याचे फोटो मी राजाजी जंगलामध्ये फिरत असताना नदीकाठी काढले आहेत नदी टिटवी या पक्ष्यांचे प्रजनन हिंदुस्थानी उपमहाद्वीपपासून पूर्वेकडे दक्षिण-पूर्व आशिया ते व्हिएतनाममध्ये होते. या पक्ष्याचा तुरा, मुकुट, चेहरा व गळ्याचा मध्यभाग काळ्या रंगाचा असतो. मानेचा मागील व कडेचा भाग राखाडी पांढऱया रंगाचा असतो. छातीवर राखाडी  तपकिरी रंगाचा पट्टा असतो. खालील भाग पांढऱया रंगाचा असून पोटावर काळ्या रंगाचा पट्टा असतो. पाठ तपकिरी रंगाची असून पार्श्वभाग पांढऱया रंगाचा व शेपटी काळ्या रंगाची असते. हे पक्षी त्यांच्या पंखांतील काळ्या, पांढऱया, तपकिरी रंगांमुळे लक्ष वेधून घेतात. या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ मार्च ते जून असतो. कीटक, अळ्या, कठीण कवचाचे जलचर प्राणी हे या पक्ष्यांचे खाद्य असते.  टिटवीला ‘बिनतारी धोक्याची सूचना देणारी यंत्रणा’ म्हणतात. कारण धोका वाटल्यास ती ‘टीटी।़।़व टी’ असा आवाज काढत धोक्याची सूचना देऊन आजूबाजूच्या सर्व पशुपक्ष्यांना सावध करते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या