
>> हर्षवर्धन दातार
कुठलाही चित्रपट हा एखाद्या घटनेवर किंवा कथेवर आधारित असतो. त्या कथेचा अथवा घटनेचा कालखंड अनेक वर्षांचा, दशकांचा आणि काही वेळा अनेक पिढय़ांचा असतो. इतक्या मोठय़ा कालखंडात घडलेली गोष्ट किंवा अनेक घटना चित्रपटाच्या मर्यादित वेळेत दाखविणे आणि तेही प्रेक्षक कंटाळणार नाहीत अशा तऱहेने मांडणे हे त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे कसब असते. या प्रक्रियेत संकलकाचा मोठा भाग असतो. कथेतील घटना नियोजित वेगाने दाखवण्याचे काम संकलकाचे असते. या प्रक्रियेत आणखी एका तंत्राची मदत होते ते म्हणजे अतीतावलोकन अर्थात फ्लॅशबॅक किंवा पूर्वदृश्य. पूर्वी घडलेल्या घटना ज्यांचा संबंध मूळ कथेशी आहे, त्या संक्षिप्त स्वरूपात दाखवणे याला फ्लॅशबॅक म्हणतात.
अनेकदा हा फ्लॅशबॅक गाण्यातून दर्शविला जातो. यातून प्रेक्षकांना पूर्वी घडलेल्या घटनांचा वर्तमान काळाशी संदर्भ जोडणे सोपे जाते तसेच कथेचा ओघही तर्कशुद्ध राहतो. कथा व्यवस्थित पुढे सरकते. पी. सी. बरुआ दिग्दर्शित बंगाली चित्रपट ‘रूपलेखा’ (1934) फ्लॅशबॅक तंत्रनिर्मित प्रथम चित्रपट होता आणि जो नंतर हिंदीमध्ये ‘मोहबत की कसोटी’ नावानं झळकला. आज फ्लॅशबॅक तंत्र सर्रास वापरात असलं तरी त्या काळात नवलाई होती. जुन्या आठवणींना उजाळा देणारी बरीच गाणी हिंदी चित्रपटात आहेत. उदाहरणार्थ ‘बंदिनी’ (1963) ‘ओ जानेवाले हो सके तो लौट के आना’, ‘सुजाता’ (1959) ‘बचपन के दिन भी क्या दिन थे’, ‘देवर’ (1966) ‘आया है मुझे फिर याद वो जालीम’ हमराही (1963) ‘वो दिन याद करो’, दूर गगन की छांव मे (1964) ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’ आणि बरसात की एक रात (1960) मधील ‘जिंदगी भर नाही भुलेगी वो बरसात की रात’ या एकाही गाण्यात पूर्वदृश्य नाही. मागे वळून पाहताना असे वाटते की कदाचित ह्या सर्व गाण्यात पूर्वदृश्याचा समावेश केला असता तर ती अधिक प्रभावी झाली असती. असो, आज आपण आढावा घेऊया काही निवडक हिंदी गाण्यांचा ज्यांच्या चित्रीकरणात फ्लॅशबॅक किंवा पूर्वदृश्ये आहेत.
‘शोला और शबनम’ (1961) या संगीतप्रधान चित्रपटातील ‘जीत ही लेंगे बाजी हम तुम’ हे लता-रफीचे कर्णमधुर युगल गीत. नायक धर्मेंद्र व नायिका तरला मेहता (दीना पाठकची धाकटी बहीण) यांची लहाणपणी ताटातूट झालेली असते. पुढे प्रतिकूल परिस्थितीत त्यांची भेट व ओळख या गाण्यातून होते आणि जुन्या आठवणींचा ओघ वाहू लागतो. ती पूर्वदृश्य गाण्यामध्ये आपल्याला दिसतात. एकप्रकारचा आत्मविश्वास या गाण्यात दिसतो. पैफी आझमीच्या गीतांना साज चढविला आहे संगीतकार खय्यामनी. संजोग (1960) यातील राजेंद्र कृष्ण-मदनमोहन आणि लताजींच्या सहयोगातून निर्मित ‘वो भुली दास्तान’ कदाचित फ्लॅशबॅक तंत्रातील सर्वात लोकप्रिय गाणे. अनिता गुहांवर चित्रित या गाण्यातून तिच्या पूर्वायुष्यातील अनेक कडूगोड प्र्रसंग दिसतात. सोबत गोड चिमुकली डेजी इराणीसुद्धा आहे. संतूरच्या सुरेल सुरांतून प्रारंभ आणि मधल्या संगीतात मनोहारी सिंग यांचे सॅक्सोपह्नचे पिसेस या गाण्याला एक करुण किनार प्रदान करतात. तीव्र आवेग आहे या गाण्यात. आठवणीतले हे गाणे अनेक वर्षे ‘विविध भारती’वर नेहमी प्रसारित होत असे. विशेष म्हणजे याच चित्रपटातील मुकेशनी गायलेले ‘भुली हुयी यादे’ हे दुसरे अतिशय लोकप्रिय गीत आहे. मधुमती (1958) पुनर्जन्मावर आधारित दिलीप कुमार – वैजयंतीमाला यांच्या भूमिका असलेला आणि पूर्वीच्या ‘महल’ (1949) चित्रपटाशी साम्य असलेला अतिशय गाजलेला गीत-संगीतप्रधान चित्रपट. शैलेंद्र-सलील चौधरी-रफी या त्रयीचा ‘टुटे हुए ख्वाबो ने’ गाण्यातून दिलीप कुमार आपल्या प्रेयसीचा शोध घेताना दाखविला आहे. निराश आणि अगतिक प्रकृतीच्या गाण्यामध्ये या दोघांचे काही आनंदी क्षण दिसतात. ‘छोटी बहेन’ (1959). रेहमान-बलराज साहनी-श्यामा व नंदा यांच्या भूमिका असलेला या चित्रपटात मुकेश यांनी गायलेले ‘जाऊ कहा बतायें दिल’ हे गाणे. मुख्य म्हणजे गाण्यामध्ये फ्लॅशबॅकबरोबर भाऊ रेहमान आणि श्यामा- नंदा या नणंद-भावजयीचे संवादही आहेत. लग्नानंतर रेहमान-नंदा या भावा-बहिणीचे संबंध कसे तुटतात हे दाखविले आहे. गाण्यामध्ये रेहमानला जुन्या गोड-कडू आठवणींचा पुनःप्रत्यय येतो. ‘दिल एक मंदिर’ (1963) एक गंभीर आणि चटका लावून जाणारा मीनाकुमारी, ‘ज्युबिली कुमार’ राजेंद्र कुमार आणि राजकुमार यांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेला चित्रपट. सर्वच गाणी श्रवणीय आणि गाजलेली. पूर्वाश्रमीचा प्रियकर राजेंद्रकुमार हा डॉक्टर आहे आणि त्याला मीनाकुमारीच्या नवऱयाला, राजकुमाराला जीवघेण्या आजारातून वाचवायचे असते. शंकर-जयकिशनने राग किर्वाणीत बसवलेल्या ‘याद ना जाये बीते दिनो की’ या गाण्याची सुरुवात ऑर्गनच्या धीरगंभीर सुरांनी होते. भावनांचा व आठवणींचा कल्लोळ असलेल हे गाणं रात्रीच्या नीरव शांततेत ऐकणं एक वेगळा अनुभव आहे. ‘धर्मपुत्र’ (1962) मधील अशा भोसलेनी गायलेले ‘मै जब भी अकेली होती होती हूँ’ हे साहिर-एन. दत्ता जोडीचं गाणं म्हणजे शांत स्वरांचा उत्सवच जणू. मंद तेवणाऱया उद्बत्तीचा सुगंध आसमंत भारून टाकतो तसं हे गाणं आपल्याभोवती रुंजी घालतं. आपण एका उदास संध्याकाळी गॅलरीत बसून सूर्यास्त न्याहाळीत असताना जुन्या आठवणींचा एक चित्रपट आपल्या डोळ्यापुढून सरकत असतो. अशीच काहीशी परिस्थिती हुस्न बानोची आहे. हुस्न बानोला आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकर रेहमानबरोबरचे नाजूक क्षण आठवतात जे साहिरनी आपल्या चपखल शब्दात टिपलेले आहेत.
‘नई उमर की नयी फसल’ (1966) हा तत्कालीन देशांतर्गत सामाजिक आणि राजकीय विषयावर आधारित चित्रपट आला होता. रोशननी संगीतबद्ध केलेले कवी गोपालदास ‘नीरज’ यांचे रफीच्या आवाजातले ‘कारवा गुजर गया, गुबार देखते रहे’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. प्रस्थापनेतून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा कशा भंग होतात, त्यातून उद्भवणाऱया, नैराश्याचे, चित्रण या गाण्यातील पूर्वदृश्यातून पुढे येते. 1966 चा ‘दिल दिया दर्द लिया’ हा एमिली ब्रॉन्टेच्या ‘वूदेरिंग हाईट्स’ या कादंबरीवर आधारित आणि दिलीप कुमार व वहिदा रहमानच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट. मध्य प्रदेशातले मांडू इथल्या जहाज महाल इथे चित्रित झालेले आणि राग झिंझोटीवर बेतलेले ‘फिर तेरी कहानी याद आई’ हे संथ सुरेख फ्लॅशबॅक असलेले गाणे. शास्त्र्ााrय संगीत ही नौशाद यांची जमेची बाजू. ती या गाण्यात पुरेपूर उतरली आहे. ‘चाचाचा’ (1966) कमी चर्चित इकबाल कुरेशी (ओपी नय्यरचे सहकारी) संगीत दिग्दर्शित हा चित्रपट. यात अभिनेता चंद्रशेखरवर चित्रित आणि गोपालदास ‘नीरज’लिखित ‘वो हम न थे वो तुम न थी’ हे फ्लॅशबॅक असलेले गाणे. एक वेगळ्या भूमिकेत असलेली हेलन हे गाणे रेडिओवर ऐकते. शायर मखदूम मोईनुद्दीनचे ‘इक चमेली के मंडवे तले’ हे या चित्रपटातले दुसरे गाजलेले गाणे. ‘मेरे मेहबूब’ (1963) मधील श्रेष्ठ गजलकार शकील बदायुनी-संगीतकार नौशाद आणि गायक रफी यांच्या भावपूर्ण गायकीतील अजरामर शीर्षक गीत. फ्लॅशबॅक प्रकारातले सर्वश्रेष्ठ गीतांपैकी एक मानलं तर वावगं होणार नाही. गीताचे शब्द आणि पूर्वदृश्य एकमेकाना पूरक ठरतात. गाण्यातील पूर्वदृश्य नायक-नायिकांची प्रेमकहाणी समर्पकपणे दर्शवितात. आज आपण बघितलेल्या या दहा फ्लॅशबॅक अर्थात पूर्वदृश्ये असलेल्या गाण्यातून रफींची अशा प्रकारच्या गाण्यावरील हुकूमत ठळकपणे दिसते . तसेच पूर्वदृश्ये मुख्यत्वे अंतरा आणि मुखडामधील संगीतामध्ये येतात. कदाचित पडद्यावरील कलाकारांना थोडा आराम मिळावा हा त्यामागील एक उद्देश असावा. अर्थात कथेच्या अनुषंगाने मागील घटनांचा संदर्भ जोडणे हा मुख्य भाग आहे.
n [email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत)





























































