
>> आरती देवगावकर
दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागल्यानंतर माणूस एका जागी स्थिर झाला आणि जसजसा उक्रांत होत गेला तसे खाण्यात बदल होत गेले. गेली हजारो वर्षे घडत असलेल्या या बदलांचा परिपाक म्हणजे आजची वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती. सध्याची खाद्यसंस्कृती अनेक अंगांनी बदलत आहे. ’खाणं’ हा तर महत्त्वाचा मुद्दा परंतु म्हणून त्यातील अनुषांगिक बदल नजरेआड करता येत नाहीत. हे बदल वेगळ्या दृष्टिकोनातून टिपणारे हे सदर.
आपण सारे प्राथमिक शाळेतच शिकलो आहोत की, मनुष्याच्या मूलभूत गरजा तीन आहेत ः अन्न, वस्त्र् आणि निवारा. हे खरे आहे, मात्र यातील वस्त्र ही गरज केवळ माणसाने स्वतःसाठी हळूहळू विकसित करत नेलेली आहे. अन्न आणि निवारा या सर्वच सजीवांच्या मूलभूत गरजा आहेत. त्यात प्रकार वेगवेगळे असतील, पण गरज सर्वांची सारखीच. तूर्तास आपण यातील मानवाच्या अन्न या गरजेबद्दल बोलू.
मानव जेव्हा आदिम अवस्थेत होता तेव्हाही त्याला जगण्यासाठी अन्नाची गरज होतीच. सुरुवातीला तो जंगलात, गुहेत राहताना कंदमुळे, फळे यांवर आपले पोट भरत असे. पुढे जेव्हा दगडाने, शस्त्राने एखाद्या प्राण्याला मारता येते हे त्याला समजले, तेव्हा त्याने शिकार करायला सुरुवात केली. कच्चे मांस खाणाऱ्या त्या आदिमानवाला त्या अन्नाला चव कशी आणावी याचे ज्ञान नव्हते. खरे तर याला आपले अन्न म्हणतात याचेदेखील ज्ञान त्याला नव्हते. कारण पृथ्वीचा इतिहास काहीशे कोटी वर्षांपूर्वीचा असला तरी माणसाची उत्पत्ती खूप नंतरची आहे आणि सगळ्या गोष्टींना, वस्तूंना नावे देणे आदींसाठी लागणारी भाषा जेमतेम 8-10 हजार वर्षांपूर्वी निर्माण झाली. तिच्यासाठी लिपी तर आणखीनच उशिरा शोधली गेली. म्हणजे एकुणातच आदिमानवाला त्या अन्नपदार्थांना नावे देणे त्या काळी शक्य नव्हते, मात्र काही तरी आपल्या पोटात गेले की, आपल्याला बरे वाटते, ताकद येते हे त्यांना आदिम प्रेरणांनी समजले होते.
जंगलात फिरताना वन्य पशू काय खातात याचे ते निरीक्षण करत. त्यानुसार आपण काय खाऊ शकतो हे त्यांच्या लक्षात येई. तसेच दिसलेल्या प्रत्येक कंदमुळाचा, फळाचा ते आस्वाद घेत. चव आवडली नाही, काही त्रास झाला तर परत खात नसत, पण हे आवडणे, न आवडणे त्यांना शब्दांत मांडता येत नव्हते. कालौघात अनुभवाच्या जोरावर कोणत्या वृक्षाची फळे, पाने खाऊ शकतो, कोणती झाडे विषारी आहेत, कशाचा काय फायदा होतो, कशाने कोणता त्रास होतो या गोष्टी त्यांना समजू लागल्या. हे ज्ञान त्यांनी आपल्या वारसांकडेही सुपूर्द केले.
जेव्हा अन्नसाठा कमी होता तेव्हा त्यांनी मुंग्यांपासून वाघापर्यंत सगळ्या प्राण्यांना आपले भक्ष्य बनवले. या कच्च्या मांसाला चव आणण्याचे ज्ञान त्याला फारच उशिरा झाले. तेही अपघाताने. नवनवीन गोष्टी खाऊन बघताना कधीतरी मिरची, मसाल्याच्या पदार्थांचे वृक्ष, समुद्राच्या पाण्याचा खारटपणा अशांसारख्या गोष्टी त्याला सापडल्या. या पदार्थांचा वापर करून आपण जे खातो ते अधिक चांगले बनवता येईल असे त्याला वाटले असेल. या सगळ्या पदार्थांचा वापर नेमका कधी सुरू झाला हे सांगता येत नसले तरी आगीचा शोध लागल्यानंतर हे झाले असावे हे नक्की. कारण तेव्हाच त्यांना मांस या आगीने भाजल्यावर खमंग लागते हे उमजले होते. त्याला चव आणण्याची रीत त्यानंतरच समजली असणार. मग आपल्या उपयोगासाठी त्याने पशुपालन चालू केले.
दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागल्यावर माणूस एका जागी स्थिर झाला. आयुष्याला स्थिरता आल्यावर त्याला चवीचे चोचले सुचले असणार. तसेही माणूस जसजसा उक्रांत होत गेला तसतसे त्याच्या खाण्यात बदल होत गेले हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. माणसाने निर्माण केलेली संस्कृतीच त्याला उक्रांतीच्या पुढच्या टप्प्यावर घेऊन जाते, या दिशेने गेली कित्येक वर्षे संशोधन सुरू आहे. या मताला पुष्टी देणारा एक पेपर स्कॉटलंड येथील सेंट ऍण्ड्रय़ूज विद्यापीठातील डॉ. लालँड यांनी ‘नेचररिह्यूज जेनेटिक्स’च्या 2010 च्या एका अंकात प्रकाशित केला होता. (आता तर हे संशोधन अधिक पुढच्या टप्प्यावर गेले आहे.) खाण्यापिण्याच्या पद्धतींमधून माणसाची जनुकीय रचनादेखील बदलली आहे. अर्थात हे त्याने आधी जाणीवपूर्वक केले नव्हते तर आपल्या पुढच्या पिढय़ा सुदृढ व्हाव्यात आणि व्यवस्थित जगाव्यात यासाठी ते आपोआपच होत गेले. आता संशोधनातून ते समोर येते आहे इतकेच. आईच्या दुधावरून इतर अन्न खायला सुरुवात केल्यानंतर ते अन्न पचवण्याची ताकद माणसात येण्यासाठी काही हजार वर्षे जावी लागली. त्या काळात असणारे बालमृत्यूंचे प्रमाण माणसाने इतर प्राण्यांचे दूध प्यायला सुरुवात केल्यावर लक्षणीयरीत्या घटले.
अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होणारे, त्या त्या वातावरणाला साजेसे अन्न खाणे ही माणसाची मूळ प्रवृत्ती होती. कालांतराने त्यात कसकसे बदल होत गेले हे आपण नंतर पाहू. तोवर मस्त खा, स्वस्थ राहा!
(लेखिका अनुवादक आणि समतोल या दिवाळी अंकाच्या संपादक आहेत.)
[email protected]





























































