वेधक – कोकणातील पहिला गणपती

>> अभय मिरजकर

महाराष्ट्रात निसर्गरम्य परिसर म्हणजे कोकण म्हटला जातो. याच कोकणात गणपतीचे पहिले पाऊल पडले ते आंजर्ले या गावी. ज्यामुळे येथील कडय़ावरचा गणपती प्रसिद्ध झाला आहे. एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून ते विकसित झाले आहे.
महाराष्ट्रातील कोकण म्हणजे देवभूमी म्हटले जाते. नारळ, सुपारी, आंबा, काजूची झाडे असा मनमोहक निसर्गरम्य परिसर, अथांग समुद्र, स्वच्छ समुद्रकिनारे यामुळे पर्यटनासाठी सर्वात प्रथम पसंती असते ती कोकणलाच. रत्नागिरी जिह्यातील दापोलीपासून जवळच असलेले निसर्गरम्य परिसर असणारे गणपतीचे मंदिर म्हणजे आंजर्ले येथील कडय़ावरचा गणपती होय.

कोकणात गणपतीचे पहिले पाऊल पडले ते हे ठिकाण असेही सांगितले जाते. डोंगर माथ्याच्या कडेवर गणपतीचे पहिले पाऊल पडले आणि दुसरे पाऊल मंदिरात पडले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे कडय़ावरचा गणपती हे मंदिरास नाव पडले आहे. गणपतीचे पाऊल असेच अधिकतर या ठिकाणास म्हटले जाते. हे मंदिर हे 12 व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. मंदिरातील उजव्या सोंडेची काळ्या पाषाणातील मूर्ती लक्षवेधी आहे. येथील गणपती जागृत देवस्थान आहे असे म्हणतात. श्री गणेशाची सुबक आणि देखणी मूर्ती आहे. सुमारे साडेतीन ते चार फुटांची ही मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धीसिद्धीच्या मूर्ती पण आहेत.

पूर्वी हे गणपती मंदिर समुद्राच्या काठावर होते. समुद्राच्या पाण्यात मंदिर गेले नंतर ते टेकडीवर बांधण्यात आले असेही सांगितले जाते. दापोलीच्या जवळचे प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक म्हणजे आंजर्ले बीच, जवळपास दोन किलोमीटरचा पांढऱया वाळूचा समुद्रकिनारा या ठिकाणी पाहण्यास मिळतो.

येथे दरवर्षी कासव महोत्सव पण भरवला जातो. मंदिराच्या परिसरातून समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. मंदिरातून आजूबाजूच्या नारळ आणि सुपारीच्या झाडांचे विहंगम दृश्य दिसते. जवळचा सुवर्णदुर्ग किल्ला, अरबी समुद्र आणि आजूबाजूच्या टेकडय़ादेखील मंदिरातून पाहता येतात. मंदिरासमोर एक तलाव आहे जिथे पर्यटक मोठय़ा प्रमाणात माशांना आणि कासवांना खायला घालण्यासाठी येतात. मोठय़ा प्रमाणात कासव येथे पाहण्यास मिळतात.