
>> अभय मोकाशी
ख्राईस्टचर्च येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काही तासांत न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैसिंडा केट लॉरेल अर्डरन यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आणि त्या हल्ल्याबाबत स्वतःची आणि देशाची काय भूमिका त्यांनी जनतेसमोर मांडली. आपली लोकप्रियता वाढविण्यासाठी त्या नागरिकांच्या भावना भडकवू शकल्या असत्या, मात्र त्यांनी तसे न करता शांती आणि सद्भावनेचा संदेश देशाला दिला. न्यूझीलंड विविधता, दया आणि सद्भावनेचे प्रतीक आहे म्हणून त्यावर हल्ला झाला अशी भूमिका पंतप्रधान अर्डनर यांनी मांडली. ही मूल्ये अशा हल्ल्याने नष्ट होणार नाहीत असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. एकंदरीतच अर्डनर यांनी आपला राजधर्म नीट पाळला आहे.
संकटसमयी एखादी व्यक्ती कशी वागते यावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कळते. व्यवस्थापन असो अथवा राजकारण, संकटसमयी भावनात्मक न होता, सदसद्विवेक बुद्धीचा वापर करून योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे असते. राजकारणात अनेकदा संकटसमयी पक्षाचा आणि राजकीय स्वार्थाला प्राधान्य देत नेते निर्णय घेतात. मुत्सद्दी नेता यापलीकडे जातो. आपल्या वागण्याचा दूरगामी परिणाम काय होईल याचा विचार करतो.
आज जगभरात द्वेषाचे राजकारण पसरले आहे आणि याला खतपाणी घालण्यात विविध देशांचे नेते अग्रेसर आहेत. त्यामुळे अनेक देशांत हिंसा वाढत आहे. महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांचे विचार मागे पडू लागले आहेत आणि जॉर्ज बुश, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्यांचे विचार पसरत आहेत. महात्मा गांधी लोकांच्या मनातून द्वेष काढून टाकण्यासाठी लढले, पण द्वेषानेच त्यांचा बळी घेतला. तेच मार्टिन ल्युथर किंग यांच्याबाबतीत घडले. मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांनी वर्णद्वेषाविरुद्ध यशस्वी लढा दिला. हेच मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेत करून दाखविले. आपल्या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी असा लढा जातीभेदाच्या विरोधात दिला आणि समाजात जातींमुळे होणारा अन्याय आणि द्वेष नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
आज अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकेत वर्णद्वेष डोके वर काढू लागला आहे. वर्णद्वेषातून तेथे बंदूक विक्रीवर निर्बंधांची मागणी होत आहे, पण होणाऱया हिंसक घटनांचा निषेध निवडणुकांवर नजर असलेल्या ट्रम्प यांच्याकडून होताना दिसत नाही. तसेच अमेरिकेत बंदुकीचा वापर करून अनेकांचे जीव घेण्यात आले आहे, विविध क्षेत्रांतून बंदुका निर्मात्यांच्या दबावाला बळी पडून ट्रम्प यांनी बंदुकीच्या विक्रीवर बंदी आणली नाही.
ट्रम्प यांनी वेळोवेळी स्थलांतरित लोकांवर टीका केली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये स्थलांतरितांबद्दल द्वेष पसरत आहे. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या 9/11च्या हल्ल्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी म्हटले होते की, अमेरिका 9/11च्या दोषींना शोधून काढेल आणि शिक्षा करेल.
जुलै 2011मध्ये नॉर्वे येथे झालेल्या गोऱया वर्चस्ववादाच्या विचारवादी व्यक्तीकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर नॉर्वेचे पंतप्रधान जेन्स स्टोलटंबर्ग यांनी विधान केले होते की, त्यांच्या देशाला कोणीही भयभीत करू शकणार नाही.
या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड येथे 16 मार्च रोजी ख्राईस्टचर्च येथे मशिदींवर झालेल्या हल्ल्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैसिंडा केट लॉरेल अर्डरन यांनी घेतलेली भूमिका उल्लेखनीय आहे. साधारणतः अशा परिस्थितीत पंतप्रधान अथवा राष्ट्राध्यक्ष काय भूमिका घेतात यावर देशाचे जनमत अवलंबून असते तर दुसरीकडे जनमत लक्षात घेऊनच राष्ट्रीय नेते वक्तव्य करतात आणि देशहिताचा किंवा जनहिताचा विचार करत नाहीत.
ख्राईस्टचर्च येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काही तासांत न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैसिंडा केट लॉरेल अर्डरन यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आणि त्या हल्ल्याबाबत स्वतःची आणि देशाची काय भूमिका त्यांनी जनतेसमोर मांडली. आपली लोकप्रियता वाढविण्यासाठी आणि मतांचे राजकारण करण्यासाठी त्या नागरिकांच्या भावना भडकावून समाजात द्वेष पसरवू शकल्या असत्या, मात्र त्यांनी तसे न करता शांती आणि सद्भावनेचा संदेश देशाला दिला. अवघ्या 38 वर्षीय जैसिंडा अर्डनर यांनी त्यांच्या भाषणातून त्यांची वैचारिक परिपक्वता आणि मुत्सद्दीपणा दाखविला.
मशिदींवरील हल्ल्यात मारले गेलेले अधिकांश लोक स्थलांतरित होते किंवा त्यांचे पालक स्थलांतरित होते. असे असूनदेखील अर्डनर यांनी मारले गेलेले लोक म्हणजे आपण आहोत आणि मारेकरी आपला नाही, असे विधान केले.
न्यूझीलंडमध्ये टोकाची भूमिका घेणाऱयांना स्थान नाही असे त्या म्हणाल्या. ‘मृतांमधील अनेक जणांनी येथे जन्म घेतला नाही, पण ते न्यूझीलंडमध्ये स्वेच्छेने आले; कारण त्यांना येथे सुरक्षित वाटले आणि येथे त्यांना आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचे पालन करता येते’, असेही अर्डनर म्हणाल्या. न्यूझीलंड विविधता, दया आणि सद्भावनेचे प्रतीक आहे म्हणून त्यावर हल्ला झाला अशी भूमिका पंतप्रधान अर्डनर यांनी मांडली. ‘आपली ही मूल्ये अशा हल्ल्याने नष्ट होणार नाहीत’ असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांचे जगभर कौतुक केले जात आहे. दुबईचे राज्यकर्ते शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतुम यांनी दुबईच्या प्रसिद्ध ‘बुर्ज-अल-खलिफा’वर अर्डनर यांचे छायाचित्र प्रतिबिंबित करून त्यांचे कौतुक केले.
हल्ल्यानंतर तीन दिवसांत अर्डनर यांनी दोनदा देशाला उद्देशून भाषण केले आणि दोनदा पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सामोऱया गेल्या. असे करण्यासाठीदेखील राजकीय सामर्थ्य लागते. राष्ट्रीय नेत्याने पत्रकारांना सामोरे न जाणे म्हणजे विद्यार्थ्याने परीक्षेला न बसता आपण हुशार असल्याच्या बढाया करण्यासारखे आहे. इतकेच नाही तर, हल्ला करणाऱया अतिरेक्याचे आपण नावदेखील घेणार नाही अशी घोषणा त्यांनी केली. हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या नातेवाईकांना अर्डनर भेटल्या, त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना न्यूझीलंडमध्ये सुरक्षिततेचे आश्वासन दिले. अर्डनर यांनी तातडीने देशात बंदुका आणि तत्सम हत्यारांवर बंदी आणणारा वटहुकूम काढला आणि लवकरच त्यासंबंधी कायदा आणणार असल्याचे घोषित केले. हे सर्व करत असताना अर्डनर यांनी विरोधी पक्षांना विश्वासात घेतले आणि त्या पक्षांच्या नेत्यांना आपल्याबरोबर क्राईस्टचर्च येथे नेले.
एकंदरीतच अर्डनर यांनी आपला राजधर्म नीट पाळला आहे. हे करत असताना त्यांनी आपले घरदेखील उत्तमरीत्या सांभाळले आहे. मुलीला त्या संयुक्त राष्ट्राच्या सभागृहात घेऊन गेल्या होत्या. साहजिकच सर्वांचे लक्ष त्यांच्या भाषणाबरोबर त्यांच्या कन्येकडे देखील होते. जगातील अनेक नेत्यांना न्यूझीलंडच्या तरुण महिला पंतप्रधान जैसिंडा केट लॉरेल अर्डनर यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
चौकट
ख्राईस्ट चर्च येथील मशिदींवरील अतिरेकी हल्ल्याअगोदर शांततेत न्यूझीलंडचा जगात दुसरा नंबर होता. त्या देशात 200 जमाती आहेत आणि 160 भाषा बोलल्या जातात. अशा या विविधतापूर्ण देशातील जनतेने पण आपले वेगळेपण जगासमोर मांडले. मशिदीवरील हल्ल्यानंतर एका मुस्लिम महिलेने आपल्याला हिजाब बांधून बाहेर पडण्यास भीती वाटते असे ट्विट केल्यावर पाच कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातील लाखो महिला हिजाब बांधून रस्त्यावर आल्या. राष्ट्रीय एकात्मतेचे हे एक उत्तम प्रतीक आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
– [email protected]
























































