मुद्रा : जगन्मान्य महाराणी

>> अनिल साखरे

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नुकतेच निधन झाले. ब्रिटिश साम्राज्याचा डामडौल, दरारा सगळय़ा जगाने पाहिला. याचे कारण जनतेच्या मनात स्मरणात राहील असे कार्य. राणी एलिझाबेथ यांनी सात दशके हा कार्यभार सांभाळला. ब्रिटिश साम्राज्याची गादी समर्थपणे सांभाळली. यामुळेच जगभरातून त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला जात आहे.

21 एप्रिल 1926 या शुभ दिवशी राजमुहूर्तावर लंडन येथे जन्म झालेल्या राणी एलिझाबेथ यांनी ब्रिटनची सम्राज्ञी म्हणून जवळपास सात दशके ब्रिटन आणि जगभरातील इतर नागरिकांच्या मनावर राज्य केले. 1936 साली त्यांचे काका किंग एडवर्ड यांनी राजीनामा दिल्यामुळे एलिझाबेथ यांचे वडील सहावे जॉर्ज हे राज्यपदावर विराजमान झाले. हे घराणे एवढे कर्तृत्ववान की, अर्ध्यापेक्षा जास्त जगावर ब्रिटिशांचा झेंडा फडकत होता आणि असे म्हटले जात होते की, ब्रिटिशांच्या साम्राज्यावरून आपल्या सूर्यनारायणाला मावळतीला जावे असे वाटत नाही. पुढे दुसऱया महायुद्धानंतर आपल्या पित्याच्या निधनानंतर राणी एलिझाबेथ यांचा 27 व्या वर्षी 2 जून 1953 ला इंग्लंडमधील वेस्टमिन्स्टर या राजपरिवाराच्या खासगी चर्चमध्ये राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि प्रथमच हा संपूर्ण सोहळा दूरचित्रवाणीद्वारे प्रसारित करून जगभरातील नागरिकांना दाखवण्यात आला.

इंग्लंडच्या सम्राज्ञी पदाबरोबरच राणी एलिझाबेथ या ब्रिटिशांनी राज्य केलेल्या जवळपास 56 देशांच्या राष्ट्रकुल संघटनेच्या अध्यक्षा होत्या, त्यासोबतच राष्ट्रकुल देशांतील 14 देश असे आहेत, ज्यांच्या प्रमुखपदी ब्रिटनची राणी म्हणून आजपर्यंत त्यांचे स्थान अबाधित आहे, राष्ट्रकुल संघटना कार्यरत राहण्यासाठी राणीने प्रचंड मेहनत घेतली आणि राणीचा स्नेह, प्रेम आणि आदरापोटी आज हे सगळे देश स्वतंत्र असले तरी त्यांनी राष्ट्रकुल संघटनेचे सदस्यत्व टिकवून ठेवले आहे,

आपल्या सत्तर वर्षांच्या ब्रिटिश सम्राज्ञी पदाच्या कारकीर्दीमध्ये, महाराणीने इंग्लंडच्या जवळपास 15 पंतप्रधानांची कारकीर्द बघितली. त्यामध्ये दुसऱया महायुद्धातील जगज्जेते आणि विजयी नेते विन्स्टन चर्चिलपासून ‘खंबीर आणि कणखर स्वभावाच्या, महिलांमधील पुरुष’ असे जिचे वर्णन केले जाते, त्या मार्गारेट थॅचर, ते मागील आठवडय़ामध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतलेल्या लिझ ट्रस यांचा समावेश आहे, पण यापैकी कुठल्याही पंतप्रधानाला त्यांनी आपल्या डोईजड होऊ दिले नाही. दुसऱया महायुद्धानंतर आजपर्यंतच्या आपल्या कारकीर्दीमध्ये जगभरातील आणि इंग्लंडमधील अनेक चढउतार बघितले. दुसऱया महायुद्धानंतर जगाची फेरमांडणी, आशिया, आफ्रिका खंडांमधून स्वतंत्र झालेले अनेक देश, अमेरिका- रशिया शीतयुद्ध, बलाढय़ रशियाचे विघटन, मध्य आशियातील तेल संघर्ष, युरोपियन युनियनची स्थापना, ब्रिटनच्या नाकर्तेपणामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी चाललेले ब्रेक्झिटचे राजकारण, त्यामुळे ब्रिटनमधील जवळपास तीन पंतप्रधानांना द्यावे लागलेले राजीनामे, जगभरात झालेले वेगवेगळे संघर्ष, राजकीय-सामाजिक-आर्थिक -सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये होणारी वेगवेगळी स्थित्यंतरे या सगळ्यांच्या राणी एलिझाबेथ या जिवंत साक्षीदार होत्या.

राणी एलिझाबेथ यांची तल्लख बुद्धिमत्ता, विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणा वेगवेगळ्या राष्ट्रांचे प्रतिनिधी, अध्यक्ष किंवा इतर सभासंमेलनांमधून नागरिकांना वेळोवेळी अनुभवण्यास मिळाला. त्याशिवाय राणीच्या जीवनकालातील महत्त्वाच्या घटना म्हणजे 20 नोव्हेंबर 1947 रोजी ग्रीक राजपुत्र फिलिप माऊंटबॅटन यांच्याशी त्यांचा झालेला विवाह आणि जवळपास 73 वर्षे राणीने सुखाचा संसार केला. त्यांना एकूण तीन मुले आणि एक मुलगी. त्यामध्ये सर्वात ज्येष्ठ म्हणजे आताचे राजे म्हणून घोषित झालेले प्रिन्स चार्ल्स तृतीय हे आहेत. त्यासोबतच राणीच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना म्हणजे 1953 आणि 1977 साली आपल्या कारकीर्दीला पंचवीस वर्षे झाल्यानंतर त्यांनी केलेला सर्व राष्ट्रकुल देशांचा जवळपास साठ हजार किलोमीटरचा दौरा, त्यासोबतच ब्रिटनमध्ये साजरा झालेला आठवडाभराचा दिमाखदार सोहळा, 1981 साली प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना यांचा ब्रिटन आणि अखिल जगताने पाहिलेला शाही विवाह सोहळा. 1991 साली अमेरिकेच्या संसदेतील भाषण देणाऱया त्या पहिला राजघराण्यातील महिला होत्या.

पुढे 2002 मध्ये राणीच्या सुवर्ण महोत्सवी कारकीर्दीनिमित्त आठवडाभर ब्रिटनमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर राष्ट्रीय सोहळा संपन्न करण्यात आला. 2011 साली आपला नातू राजपुत्र विल्यम आणि केट मिडल्टन यांच्या विवाह सोहळ्यास राणीने अनुमती देऊन उपस्थिती लावली. जानेवारी 2020 मध्ये त्यांचे दुसरे नातू हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांनी आपला भाऊ प्रिन्स विल्यम याच्याशी झालेल्या मतभेदांमुळे राजघराणे सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये राणीचे पती फिलिप यांचे वयाच्या 99 वर्षी निधन झाले. 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांच्या राणीपदास 70 वर्षे पूर्ण झाली.
ब्रिटिश महाराणीचे जीवन म्हणजे परंपरावादी, वसाहतवादी, साम्राज्यवादी मानसिकता असलेले नेते आणि नव स्वातंत्र्यामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता मानणारी जनता या दोघांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलाय. ब्रिटिश परंपरेनुसार त्या देशाच्या प्रत्येक पंतप्रधानाला दर आठवडय़ाला राणीला भेटून देशामध्ये सध्या काय चालू आहे याबाबत राजकीय चर्चा होत असत, पण यासंदर्भात अधोरेखित करावी अशी गोष्ट म्हणजे आजपर्यंत एकदाही महाराणीकडून किंवा इंग्लंडच्या पंतप्रधानाकडून या चर्चा, संवादाबद्दल जाहीररीत्या माध्यमांकडे बातम्यांचा विषय केला नाही. ही ब्रिटिशांची खासीयत म्हणायची.

तसे बघितले तर युरोपमधील स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, डच इत्यादी अनेक देशांनी वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि राज्य केले, परंतु इंग्लंडच्या महाराणीला जो सन्मान जगभरामध्ये प्राप्त झाला, त्याच्या तसूभरही सन्मान वरील देशांच्या राज्यकर्त्यांना त्यांच्या वसाहतीमध्येही प्राप्त झाला नाही ही पण लक्षात घ्यावी अशीच गोष्ट आणि म्हणूनच ब्रिटिश साम्राज्याचे स्पर्धक असलेल्या फ्रान्समधील आयफेल टॉवर आणि राजपथावरील श्वास एलिजे ऐलिझे कमानीवरील दिवे मालवून फ्रेंचांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, तर बीबीसीच्या वृत्त निवेदकाच्या गालावरून राणीच्या निधनाची बातमी सांगताना अश्रू ओघळले नसते. त्याचवेळी डॉलरचा छनछनाट करणाऱया अमेरिकन खेळाडूंनाही आपले सामने थांबवून राणीला श्रद्धांजली वाहण्याचे उपचार करावे असे वाटले नसते.

शतकानुशतकामध्ये एखाद्याच व्यक्तिमत्त्वाला जगभरातून इतका मानसन्मान प्राप्त होतो. राणी एलिझाबेथ द्वितीय या त्यापैकीच एक. 1953 साली झालेल्या आपल्या राज्याभिषेकापासून 21 व्या शतकाच्या पूर्वार्धावर इंग्लंडच्या महाराणीने आपल्या कार्यकर्तृत्वाने अमीट जीवनाची छाप उमटवली. जगभरातील सर्व नागरिकांच्या सन्मानास पात्र ठरलेल्या अशा या महाराणीला विनम्र अभिवादन!

[email protected]