
>> अरुणा सरनाईक
आपल्याकडे साजऱ्या होणाऱ्या सणांमागे एक चिरंतन विचार आहे. दिवाळीही त्याला अपवाद नाही. या निमित्ताने मनामनाची नाती जोडली जावीत, असा उद्देश असतो. दिवाळीच्या दिवसांत दीपोत्सवाला खूप महत्त्व आहे. दीपोत्सव म्हणजे अंधकाराला दूर करणे. मग तो अंधकार अज्ञानाचा असेल, भीतीचा असेल किंवा ताण-तणावाचाही असू शकेल. तो नष्ट करणे हे आपले कर्तव्य आहे आणि हाच संदेश दीपोत्सव करत असतो. त्यामुळे दिवाळी हा भावोत्सव आहे आणि त्याची उत्कटता आपण समजून घेतली पाहिजे.
दिवाळी ही पाच दिवसांची मानली जाते, परंतु वसुबारस हाही दिवस दिवाळीचाच मानला जातो. कारण कृषीप्रधान असणाऱया हिंदुस्थानात दिवाळी हा शेतकऱयांचा प्रमुख सण आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. मुळातच हिंदुस्थानी समाज निसर्गप्रेमी. निसर्गाने आपल्याला दिले त्याचे अंशत: ऋण फेडायचे आणि कायम त्याच्या ऋणातच राहायचे. कारण काही ऋण, काही देणी न फेडता त्यातच राहण्यात मजा आहे, सुख-समाधान आहे. दिवाळी येते ती बहुधा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात. या वेळी शेतकऱयांची खरीप पीके घरी येण्याची वेळ. अर्थात घर धान्याने व खिसे पैशांनी भरलेले असतात आणि मनदेखील आनंदाने भरलेले असते. बळीराजा सुखावलेला असतो. अशा वेळी येणारा दिवाळी सण त्यांच्या आणि शहरवासीयांच्या मनात आनंदाचे शिंपण करतो.
दिवाळीच्या सणाची सुरुवात वसुबारस या दिवसापासून होते. या दिवशी गाईवासरांची पूजा केली जाते. तिन्हीसांजेला ही पूजा करतात. यानिमित्ताने आपल्या जनावरांविषयीच्या सद्भावना, कृतज्ञता व्यक्त केली जाते. या प्रसंगावरील लोकगीते विशेषत्वाने रचली गेलेली आहेत. ती अशी, ‘दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या! लक्ष्मण कोणाचा? रामरायाचा! राम कोणाचा? तुम्हा आमचा, सर्वांचा’ अशी नानाविध गाणी या सणाला बिलगून आहेत. त्यातील अर्थाचा फारसा विचार न करता केवळ त्यामागील भाव समजून घ्यावा. याच दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते. मुलांचे किल्ले तयार व्हायला लागतात. नागपूरकडे दिवाळीत किल्ले स्पर्धा असते. यामध्ये मुलांच्या बरोबरीने पालकांचादेखील मोठय़ा संख्येने सहभाग असतो. त्यानिमित्ताने मुलांचा मातीशी संबंध येतो आणि त्यांची नाळ सणावाराशी नव्याने जोडली जाते. इतिहासाची ओळख होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती होते. बऱयाच ठिकाणी ती माहिती मुलांना देऊन त्यानुरूप किल्ले बनवितात.
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवसाला धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात. धन हा शब्द समृद्धीशी, धनाशी जोडला जातो. या दिवशीदेखील लक्ष्मीचीच पूजा केली जाते. हा दिवस व्यापारी वर्गात खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यांचे वर्षभराचे वहीखाते ते या दिवशी पूजतात. देवांचे वैद्य अश्विनीकुमार यांची पण पूजा केली जाते. यमदीपदान या नावामागे एक अत्यंत सुंदर रूपक आहे. एक कन्या विवाह होऊन सासरी येते. तेव्हा तिला कळते की, लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिच्या पतीचा सर्पदशांने मृत्यू होणार आहे. सुरुवातीला घाबरलेली ती पत्नी मोठय़ा विचारपूर्वक निर्णय घेते. सासूला विश्वासात घेते आणि तयारीला लागते. सगळे घर स्वच्छ करते. जागोजागी मातीचे तेलदिवे लावते. घरातील कोपऱयाकोपऱयात धनराशी ठेवते. सोन्या-चांदीने चमकणारे जडजवाहीर ठेवते. घरात, अंगणात दिव्यांचा लखलखाट करते. सारे घर, अंगण प्रकाशाने भरून जाते. रात्रीचा अंधकार दूर होतो. जणू वाटू लागते प्रसन्न दिवस आहे. अशा सर्व मंगलमय वातावरणात ती देवाची आराधना आपल्या कुटुंबासमवेत करू लागते. जसजसा दिवस कलू लागतो आणि अंधार दाटून येतो, रात्र होते यमराज सर्पाच्या रूपाने येतात. अंगणातील दिवे, धनाचा, दागदागिन्यांचा लखलखाट पाहून यमराजाचे डोळे दिपून जातात. त्यांना हा प्रकाश पाहून वाटू लागते की, अजून रात्र व्हायची आहे. म्हणून ते रात्र होण्याची वाट पाहत कोपऱयातील धनाच्या राशीवर बसून राहतात, पण रात्र होतच नाही. होते ती पहाट. सकाळ होताच यमराजाला कन्येचे चातुर्य उमगते. ते खूश होऊन तिला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद देऊन निघून जातात. कथा आजच्या काळात अतिरंजीत वाटेल, पण यातूनच आपली संस्कृती घडत आलेली आहे. आजच्या युगाला ही कथा कपोलकल्पित वाटेल, पण त्यामागील तिचा भाव, तिची श्रद्धा आणि चातुर्य लक्षात घेण्यासारखे आहे. कठीण प्रसंगी न डगमगता त्यातून मार्ग काढणे आणि जीवन सुरळीत चालावे हे शिकण्यासारखे आहे. सणवार आपले गुरू, शिक्षक, मार्गदर्शक असतात. आपल्याही नकळत संकटातून बाहेर पडण्याचे कितीतरी मार्ग त्यात सापडतील. यमाने तिच्या पतीचे प्राण नेले नाहीत, त्याला जीवदान दिले, याच कृतज्ञेतून मग तिने दीपदान केले आणि आपली श्रद्धा, कृतज्ञता अर्पण केली. तिच्या या कृतीचे स्मरण म्हणून या दिवशी यमराजाला दीपदान केले जाते. यमाची दिशा दक्षिण म्हणून दक्षिण दिशेला दिवा लावला जातो. आता मनात असा विचार येतो की, खरंच का ही कथा घडलेली असेल का? तुमच्याही मनात हा प्रश्न असेल, पण मला असं वाटतं की, देव भोळा असतो. तो संकट देतो, पण त्याचंही निवारण कसं करायचं याविषयीचं मार्गदर्शनही तो आपल्या मनात बसून करत असतो. फक्त त्याची भाषा आपल्याला समजायला अवघड असावी. आता यमराजाला तिची हुशारी समजली नसेल का? दिवस आणि रात्र यातील फरक कळला नसेल का? पण देव आपली परीक्षा घेतो. या जगात जगायचं असेल तर प्रसंगी देवालासुद्धा बनवावं लागत आणि तोसुद्धा बनल्याचं नाटक करतो, बनल्याचा आभास निमार्ण करतो व आपली परीक्षा घेतो. अर्थात हा सारा भावनिष्ठपणा आहे. विज्ञानाच्या कसोटीवर विचार करू जाता त्यातील भाव आणि गोडवा कमी होतो.
दिवा लावणे याचा अर्थ अंधकार नाहीसा करणे. मग तो अंधकार अज्ञानाचा, भीतीचा किंवा मानसिक तणावाचा असो, तो दूर करणं गरजेचं आहे. दिवाळी याच अर्थानं प्रकाशाची उधळण करणारी, तेजोमय अशी आहे. आज जगभरात सर्वत्र हा दिव्यांचा सण मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जातो. आप्तजनांच्या सहवासानं हा आनंद द्विगुणित केला जातो. या दिवशी धातूंच्या वस्तूंची खरेदी विशेषत्वानं केली जाते. त्यातही तांब्याच्या धातूला अधिक प्राधान्य दिलं जातं. सोनं, चांदीची खरेदी केली जाते. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी दिवे लावणं हा महत्त्वाचा भाग आहे. अर्थात दिव्यांचाच सण असल्यामुळे दिव्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहेच आहे.



























































