वाचावे असे काही – एका गावाचे चरित्र

<<< धीरज कुलकर्णी >>>

विसाव्या शतकातील मराठी साहित्यात एक महत्त्वाचे नाव म्हणजे जयवंत दळवी. प्रामुख्याने नाटककार, कादंबरीकार म्हणून परिचित असणाऱ्या दळवींनी इतर साहित्य प्रकारसुद्धा लीलया हाताळले. स्त्रिया, सामान्य माणूस हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू. नाट्यासंबंधी लिहिताना दळवी उत्कटतेने लिहीत. त्यामुळे त्यांची तन्मयता वाचकांपर्यंत पोहोचत असे. युसिस या अमेरिकन संस्थेत ते काम करत असताना अनेक मराठी लेखकांकडून त्यांनी परकीय साहित्याचा अनुवाद करून घेतला. आजही हे अनुवाद प्रसिद्ध आहेत.

दळवींच्या चक्र, महानंदा, अथांग या प्रसिद्ध कादंबऱ्यावर सिनेमा, नाटक इत्यादी निघाले. ‘परममित्र’ या व्यक्तिचित्रणातून त्यांनी आपल्या अनेक सुहृदांबद्दल आत्मियतेने लिहून ठेवले आहे. 1965च्या सुमारास दळवींनी लिहिलेले ‘सारे प्रवासी घडीचे’ हे पुस्तक आजही वाचक आवडीने वाचतात. त्या काळी कथा, कादंबरीची असलेली चौकट मोडून प्रथम पुरुषी निवेदनातून दळवींनी या कादंबरीत एक गाव, त्यातील नमुनेदार लोक, तिथले वेगवेगळे प्रसंग आणि एकंदरीतच एक मोठा काळ उभा केला आहे. अशा प्रकारचे लेखन यापूर्वी मराठीत प्रसिद्ध झाले नसल्याने समीक्षक व वाचक दोहोंनी त्याचे भरभरून स्वागत केले आणि आजही या कादंबरीला मोठी मागणी आहे.

‘सारे प्रवासी घडीचे’ 1964ला प्रथम प्रकाशित झाली. त्यानंतर तिच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. मराठीत या प्रकारचा हा एक अनोखा प्रयोग होता. काल्पनिक पात्रे, स्थळ, प्रथम पुरुषी निवेदनातून उलगडणारे एका गावाचे चरित्र असा या कादंबरीचा घाट. या कादंबरीतील सर्व पात्रे, घटना, प्रसंग इतके जिवंत, हुबेहूब वठले की, लोकांना ते खरे वाटू लागले. हेच या कादंबरीचे खरे यश.
नायकाचे नाव, गावाचे नाव कादंबरीत दिलेले नाही. ‘आपू’ या टोपणनावाने सर्वजण नायकाला ओळखतात. आपू अनेक वर्षांनी मुंबईहून एकटाच आपल्या गावी बोटीने आला आहे. गावात पाऊल ठेवताच अनेक आठवणींचे मोहोळ त्याच्या मनात उठते. बालपणापासून गाव सोडेपर्यंत सगळे लोक व त्यांचे किस्से आठवू लागतात. त्याचीच ही कथा म्हणजे ‘सारे प्रवासी घडीचे’.

आपू आपल्या वडिलोपार्जित घरात प्रवेश करतो. घराच्या दुःस्थितीमुळे त्याला दुःख होते. एकेकाळी हा वाडा म्हणजे गावाचा आधार होता. आपूचे वडील हे गावाचे प्रमुख. गावातील सर्व गोष्टी या त्यांच्या सल्ल्यानेच होत. त्यामुळे वाड्यात सतत लोकांचा राबता असे. साधारण स्वातंत्र्य चळवळ ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ या कादंबरीत रंगवला आहे. गाव अठरापगड जातींच्या लोकांचे. त्यामुळे त्या काळात गावात असलेली जातपात, त्यानुसार होणाऱ्या घटना या आनुषंगिक पद्धतीने आल्या आहेत. मात्र कुठेही लेखकाचा उद्देश त्याबद्दल द्वेषात्मक लिहिणे असा नाही. स्वातंत्र्य चळवळ जोरात असताना देशात अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळही जोर धरत होती. कोकणातील या आडगावी त्याचे पडसाद कसकसे उमटले ते लेखकाने दाखवले आहे.

गावातील नमुनेदार व्यक्ती या अनेक प्रसंगांतून हशा निर्माण करतात. दादूल्या घरगडी, अमृते मास्तर, बागाईतकर मास्तर, केशा चांभार, भिवा अशा अनेक ठळक व्यक्तिरेखा आपल्याला पुस्तकांशी बांधून ठेवतात. आपू लहान असताना शाळेत जायचा प्रसंग, आईने मारून मुटकून शाळेत पाठवणे, आजीने पाठीशी घालणे, पण इथे आजी पाठीशी का घालते, तर हा शाळेत गेल्यावर तिला चोरून विड्या कोण आणून देणार?

शाळेत आपू मित्रांबरोबर रमतो. बदली होऊन आलेले एक शिक्षक हे आपूला काही कारणावरून त्रास देतात. वडिलांना हे कळताच ते लोकल बोर्डाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून केशा चांभाराला उभे करतात. त्याला हर प्रकारे निवडूनही आणतात आणि मास्तरांची शाळेतून हकालपट्टी करवतात. केशा मात्र या प्रकारात भलताच वैतागून जातो. त्याला नको असलेले परीटघडीच्या कपड्यांचे ओझे सहन करावे लागते. या घटनेनंतर आसपासच्या गावांमध्ये या गावाचा अस्पृश्यता निर्मूलन करणारे गाव म्हणून गवगवा होतो आणि बाहेरील गावातील काही लोक सामुदायिक भोजनाचा कार्यक्रम आखतात. या प्रकाराला सगळ्याच गावकऱ्यांचा विरोध असतो. त्यामुळे वरच्या जातीतल्या काही लोकांना अस्पृश्य म्हणून जेवणाला बोलावले जाते आणि तो कार्यक्रम कसाबसा पार पडतो.

वामनदाजी आणि त्यांची पत्नी हे शेजारी कुटुंब सतत भांडणात मग्न. न्हानू कांबळी हा शेजारी फक्त नावाचा शेतकरी. त्याच्या शेतात कधी काही पिकले नाही. नुसते गावभर भटकणे आणि गावच्या जिवावर जगणे हाच दिनक्रम. कोकणात त्या काळी मनोरंजनाचे एकमेव साधन म्हणजे दशावतारी मंडळी. हे दशावतारी खेळ गावोगावी करणारा गावातील कलाकार म्हणजे जिवा. आसपासच्या गावात अगदी फेमस. गावातूनच बाबू गुरव दशावतारी नाटक करायचे मनावर घेतो आणि जिवा व बाबू यांच्यात जणू द्वंद्व सुरू होते. अर्थात पूर्वीचा कसलाच अनुभव नसल्याने बाबू गुरवाचे नाटक आपटते आणि सगळाच प्रसंग हा गावकऱयांसाठी मनोरंजनाचा विषय होऊन बसतो.

गावात माणसे थोडीफार व्यसनी. लफडेबाजही. तातू लंगडा असल्याने त्याचे लग्न झाले नाही. म्हणून तो भाविणीच्या नादी लागला. तर त्यातून मंदिरात त्याची झालेली भांडणे मजा आणतात. तर एका मनुष्याने बाई ठेवलेली. ती एकदा त्याच्या डोक्याला अमृतांजन चोळताना कुणीतरी पाहते व त्या दिवसापासून गावभर त्याचे टोपणनाव अमृतांजन होते. बाकी टोपणनाव देण्यात गाव पटाईत. झाडांवर, प्राण्यांवर अकारण प्रेम करणारा तात्या रेडकर मान डोलवत बोलायचा म्हणून त्याचे नाव ‘नाय नाय भाऊ’ पडले. बोकडांच्या झुंजी रोखायला म्हणून गेला, तर बोकडाने यालाच उडवला. त्या दुखण्यातच गरीबाचा अंत झाला.

पेस्तावच्या गुत्यावर नियमित ये-जा करणारी माणसे आपूच्या वडिलांना पाहताच तोंड लपवायची. पेस्ताव तसा अश्राप जीव. कुणाच्या अध्यातमध्यात नसणारा. आपण गांधीजींची दाढी केलीय अशी बोंबा मारणारा विश्राम न्हावी विनाकारण दारूबंदीच्या चळवळीत पेस्तावचे दुकान पेटवून देतो, पण पेस्ताव त्याला काही न बोलता पुन्हा दुकान चालू करतो. आपूला गावातील या सर्व घटना आठवतात. आता गावात काही शिल्लक नाही. बहुतेक घरे बंदच आहेत. गावची कळा गेली आणि गावपणही गेले.

कादंबरीच्या अखेरीस आपू दुःखी आहे, निराश आहे. गावात आता राहण्याजोगे काही नसल्याने त्याला नाईलाजाने मुंबईस परत जावे लागणार. लेखकाला यादृष्टीने हे आठवते की, हा सगळा घडीभराचा खेळ होता. काळाच्या या अनंत प्रवासात हे सारे फक्त घडीचे प्रवासी होते. कालचे दृश्य आज बदलते. कालच्यासारखा आज नाही. बदल हा सृष्टीचाच स्थायिभाव. मात्र कोकणातील या संथ जीवनगतीच्या खेड्यात हे बदल लक्षात यायला काळ उलटून जावा लागला.

पराकोटीचे दारिद्र्य, दुष्काळ, अज्ञान, अंधश्रद्धा, जातपात यामुळे गावात प्रगतीची गंगा कधी आलीच नाही. कादंबरीचा काळ लक्षात घेतला तर खेड्यातून शहराकडे रोजगारासाठी स्थलांतर हे या काळात दिसते. त्यामुळे खेडी ओस पडू लागली. याच काळात गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र दिला होता. खेड्यात ग्रामोद्योगावर आधारित असलेली अर्थव्यवस्था हाच पूर्वापारपासून भारताचा आर्थिक कणा होता. मात्र यांत्रिकीकरण, आधुनिकीकरणाचा झपाटा खेड्यांना सोसला नाही. जातीभेद, अस्पृश्यता यांना कंटाळून दलितांनी शहराचा रस्ता धरला. तिथे किमान त्यांना गावाचा जाच कमी होता.

आजही पाहिले तर चित्र वेगळे नाही. जागतिकीकरणाच्या रेट्याने शहरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. मात्र खेड्याकडची परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. शहरातून रस्त्यावर तुडुंब वाहणारी गर्दी आणि दुसरीकडे खेड्यात घरांवर लागलेली कुलुपे हे चित्र बदलण्यात गेल्या पंचाहत्तर वर्षांत आपण यशस्वी झालो का, हा खरा स्वतला विचारायचा प्रश्न आहे.

[email protected]