
>> डॉ. अविनाश भोंडवे
‘योग’ ही हिंदुस्थानने जगाला दिलेली एक अमूल्य देणगीच आहे. योगशास्त्र हे एक प्राचीन हिंदुस्थानी शास्त्र आहे. योग म्हणजे जीव आणि ईश्वर यांचा संयोग. पतंजली ऋषीने योगशास्त्र सूत्रांच्या 195 रूपाने मांडले आहे. त्यातील योगाची व्याख्या सांगते, ‘योगः चित्तवृत्ती निरोधः’ अर्थात चित्तवृत्तींना निर्विकार करणे म्हणजे योग!
गेली पाच वर्षे 21 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ जगभरात मोठय़ा दिमाखाने साजरा केला जातो. हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (युनो) 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेल्या अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया या बडय़ा पाच देशांसह एकुणातल्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला त्वरित पाठिंबा दिला. या प्रस्तावावर सांगोपांग चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर 21 जून 2015 रोजी पहिला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ अखिल विश्वात साजरा झाला.
‘योग’ ही हिंदुस्थानने जगाला दिलेली एक अमूल्य देणगीच आहे. योगशास्त्र हे एक प्राचीन हिंदुस्थानी शास्त्र आहे. योग म्हणजे जीव आणि ईश्वर यांचा संयोग. पतंजली ऋषीने योगशास्त्र सूत्रांच्या 195 रूपाने मांडले आहे. त्यातील योगाची व्याख्या सांगते, ‘योगः चित्तवृत्ती निरोधः’ अर्थात चित्तवृत्तींना निर्विकार करणे म्हणजे योग!
आपल्या मनात जागेपणी आणि झोपेतही अनेक लहरी उठत असतात. मन सतत इतस्ततः भरकटत असते. कोणताही तरंग नसलेल्या एखाद्या शांत जलाशयाप्रमाणे मन निर्विकार करणे म्हणजे योग. मन निर्विकार करण्यासाठी पतंजलींनी अनेक पायऱया आणि साधने वर्णिली आहेत. या शास्त्रानुसार योग ही एक जीवन पद्धती आहे.
योग आणि योगासने
‘‘मी योगा करतो/करते’’ असे सांगणे हा आजच्या तथाकथित उच्चभ्रू समाजाचा मानबिंदू झालाय, पण यापैकी बहुतेक जण हे काही योगासने त्यांच्या दृष्टीने जमेल तेवढी करतात आणि त्याला ‘योगा’ म्हणतात. मात्र योग म्हणजे केवळ योगासने नाहीत. योगासने ही योगमय जीवनाची केवळ एक पूर्वतयारी असते.
योग म्हणजेच अष्टांगयोग. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी याची आठ अंगे आहेत आणि असणे हा केवळ त्यातील एक अंगभाग आहे.
हिंदुस्थानात सुरू झालेली योगपरंपरा आता जगभरातील अनेक देशांत पसरली आहे. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता योगशास्त्रातला शारीरिक आसनांचा भागच जास्त पसरला आहे. योगशास्त्र शिकवणारी असंख्य केंद्रे आणि त्यातील योग प्रशिक्षकांकडून वेगवेगळा योग सर्वत्र शिकवला जातो. हे प्रकार-उपप्रकार काही असले तरी योगशास्त्राद्वारे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि आत्मिक उन्नती साधायची असते हे लक्षात ठेवायला हवे.
अनेकदा योगाचरण करणाऱया तथाकथित प्रसिद्ध व्यक्तींकडून योग हा व्यायाम प्रकार असल्याचे दाखवले जाते. योगामुळे हृदयविकार, मधुमेह अशा व्याधी बऱया होतात असेही ठासून सांगितले जाते. याचा मथितार्थ ध्यानात न घेणाऱया रुग्णांकडून औषधे आणि शारीरिक व्यायाम बंद करून फक्त योगासने करण्याचा प्रमाद घडतो. कालांतराने ते आजार हाताबाहेर जाऊन रुग्णावर गंभीर प्रसंग कोसळतो. त्यामुळे एक लक्षात घ्यायला हवे की, योग म्हणजे फक्त व्यायाम नाही. योगशास्त्राचा उद्देश शरीर आणि मन सशक्त करणे हा असतो.
व्यायाम आणि योगासने
योगासने हा व्यायाम जरी मानला तरी प्रचलित व्यायाम, खेळ आणि शारीरिक कष्टांपेक्षा ती वेगळी असतात. नेहमीच्या व्यायामाचे दोन मुख्य प्रकार असतात. पहिला म्हणजे ऍरोबिक व्यायाम. यात भरभर चालणे, जॉगिंग, धावणे, पोहणे, सायकलिंग असे व्यायाम येतात. यामध्ये हातापायांची वेगवान हालचाल केली जाते. त्यामुळे हृदयाचे स्पंदन आणि श्वासोच्छ्वास वेगाने होतात. यामध्ये हृदय तसेच फुप्फुसांना अधिक काम करावे लागते.
दुसरा व्यायाम प्रकार म्हणजे ऍनेरोबिक व्यायाम. म्हणजे जिममधील वजने उचलणे, जोर, बैठका इत्यादी. या व्यायामात हृदयाकड़ून हातापायाच्या मांसपेशींना अधिक रक्त पुरवून त्यांना सशक्त केले जाते.
या तुलनेत योगासनांमध्ये हातापायातील मांसपेशींना ठराविक स्थितीत ठेवले जाते. त्यातून पाठ, पोट, पाठीच्या कण्यातील मणके यांना वळवून दाब, ताण ओढ दिली जाते. मात्र यात इतर व्यायाम प्रकारांप्रमाणे श्वासोच्छ्वास वेगाने न करता सावकाश, दीर्घ आणि निःशब्दपणे करणे अपेक्षित असते. स्थिर अवस्थेत, दबून ठेवलेले हातपाय हे योगासनांचे वैशिष्टय़ असते. यामध्ये या अवयवांकडून अधिक रक्त हृदय, यकृत, फुप्फुस यांच्याकडे वळते. म्हणजे खेळ, शारीरिक कष्ट, व्यायाम यांच्या तुलनेत योगासनामध्ये फुप्फुस तसेच हृदयावर कमीत कमी ताण देऊन शरीरातील महत्त्वाच्या अवयवांकडे रक्त वळवले जाते.
आरोग्य आणि योगासने
सर्वांगीण आरोग्य प्राप्त करण्यासाठी योगासनांचे महत्त्व अपरंपार आहे. आसन स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करीत असता शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना अधिक रक्त पुरवले गेल्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ सहज उत्सर्जित होतात. साहजिकच श्वासावाटे घेतलेली हवा, आहारातील अन्न-पाणी शरीरासाठी अधिक चांगले वापरले जाते. फुप्फुस, पोट, आतडी ही अंतर्गतदृष्टय़ा साफ होण्यामुळे शरीराच्या महत्त्वाच्या आणि अत्यावश्यक क्रिया उत्तम पद्धतीने होतात. खेळ, शारीरिक कष्ट, व्यायाम यांमध्ये मुख्यतः हातपाय आणि महत्त्वाच्या सांध्यांचा जोरकस वापर केला जातो. याउलट योगासनातील पवित्र्यात फुप्फुसे, पोट, आतडे, कणा यांना विशिष्ट काम दिले जाते.
स्नायूंच्या इतर व्यायाम प्रकारात शरीरातली मज्जासंस्थेमधील ‘सिम्पॅथॅटिक प्रणाली’ अतिरिक्त कार्य पार पाडते. त्यामुळे हृदयक्रिया, रक्तदाब, श्वसन, तपमान आणि घाम वाढतो. याउलट योगासने, प्राणायाम हा मज्जासंस्थेतील ‘पॅरासिम्पॅथॅटिक प्रणाली’शी संबंधित आहे. ही प्रणाली हृदय, फुप्फुसे, आतडी, मूत्रसंस्था, जननसंस्था यांच्याशी निगडित असते. त्यामुळे शरीर स्थिर आणि शांत होते. त्यातून शरीराचे शिथिलीकरण (रिलॅक्सेशन) होते.
योगासने आणि रिलॅक्सेशन- मन स्थिर करण्यासाठी मेडिटेशन किंवा ध्यानधारणा केली जाते. यात शरीर शिथिल करावे लागते. ते योगासनांतून सहजरीत्या साध्य होते. योगासनांचे मनःस्वास्थ्यातील आणि मानसोपचारातील महत्त्व त्यामुळेच आहे.
योगासनांचे आरोग्याला फायदे
1) परिपूर्ण तंदुरुस्ती म्हणजेच ऑलराऊंड फिटनेस
2) वजनवाढीवर नियंत्रण- योगासनांनी वजनवाढ टाळता येते. योगासनांना योगशास्त्रातील आहार-विहारांची योग्य जोड दिल्यास व्यक्ती सडपातळ बनू शकते.
3) ताणतणावाचे नियंत्रण.
4) मानसिक स्थैर्य, क्रोध नियंत्रण आणि शांत मन.
5) मनाची सजगता (अवेअरनेस) वाढते.
6) परस्पर नातेसंबंधात सुधारणा.
7) मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक ऊर्जा वाढते.
8) शरीराचा लवचिकपणा वाढतो, शारीरिक ठेवण आणि बांधा सुधारतो.
9) आत्मविश्वास वाढतो आणि स्व-प्रतिमा उजळते.
10) प्रतिकारशक्तीत सुधारणा होते.
योगाबाबत वरवरच्या भपकेदार कल्पना बदलून खऱया योगाभ्यासाची जगाला ओळख करून देणे आज गरजेचे आहे. आजच्या यांत्रिक आणि बैठय़ा जीवनशैलीमुळे सर्वसामान्य माणसांचे जीवन अनेक विकारांनी पीडित होत आहे. हे विकारत्रस्त जीवन योगशास्त्राद्वारे परिपूर्ण आरोग्याने उजळून टाकावे आणि वैश्विक सामंजस्य आणि शांतता (पीस ऍण्ड हार्मनी) साऱया जगात नांदावी हीच ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यामागील खरी संकल्पना आहे.





























































