गुंतवणुकीचे शास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

अनेक यूटय़ूब व्हिडीओज्, इन्स्टाग्रामवरील रील्स, मेसेजेस, फायनान्स शोज अशा अनेक माध्यमांतून आपल्याला गुंतवणुकीचे ज्ञान मिळते. कुणाचे ऐकायचे हेच कळत नाही. काय खरे आणि काय खोटे हेही कळायला मार्ग नसतो. श्रीमंत होण्याच्या पर्यायात कधी नुकसानही मोठे होते. अशा वेळी गुंतवणुकीचे शास्त्र समजून घेणे व आपल्या सारासार बुद्धीचा विचार करून गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे.

माझ्या गुंतवणुकीमधून सर्वात जास्त परतावा मिळाला पाहिजे ही अपेक्षा आपण जेव्हा करतो तेव्हा अप्रत्यक्षरीत्या आपण काय स्वीकारतो हे समजून घेणे हेदेखील महत्त्वाचे आहे. आपल्या देशाचा रेपो रेट ‘सेफ रेट’ म्हणून मानला जातो. हा साधारण पाच ते सहा टक्के असतो. आपल्या देशात अगदी आठ टक्क्यांपर्यंतदेखील सुरक्षित गुंतवणुकीचे व्याजदर आहेत. गुंतवणूकदारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, आठ टक्क्यांपेक्षा जेव्हा आपण गुंतवणुकीकडून जास्त परतावा अपेक्षित करतो तेव्हा आपण गुंतवलेल्या मुद्दलाची जोखीम सुरू होते. जेवढा जास्त परतावा तेवढी जास्त जोखीम.

खरे तर गुंतवणूक म्हणजे मानसशास्रीय व्यवस्थापन आहे. आपला स्वभाव आणि आपल्या सवयीनुसार आपल्यासाठी कुठली गुंतवणूक योग्य आहे हेदेखील ठरते. गुंतवणूक करताना कुठले ध्येय साकारण्यासाठी आपण गुंतवणूक करणार आहोत? ते ध्येय किती अंतरावर आहे? या सर्व गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात.

– जेव्हा आपल्या गरजा किंवा आपले ध्येय जर नजीकच्या काळातले असेल तर शक्यतो आपली गुंतवणूक सुरक्षित गुंतवणुकीमध्ये व्हायला हवी. यामध्ये बँक, म्युच्युअल फंड, डेट फंड, सरकारी बॉण्ड, आर्बिट्राज फंड अशा प्रकारच्या गुंतवणूक प्रकारामध्ये शेअर मार्केटची जोखीम नसते. या प्रकारात फक्त इंटरेस्ट रिस्क, लिक्विडीटी रिस्क आणि क्रेडिट रिस्क अशा प्रकारची डेट प्रॉडक्टमधील जोखीम राहते. म्हणून व्याजाच्या पाठी न लागता आपले मुद्दल सुरक्षित राहणे गरजेचे आहे हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.

– लांब पल्ल्याच्या ध्येयासाठी आपण जोखीम असलेल्या गुंतवणुकीचा विचार करू शकतो. यामध्ये म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आदींचा समावेश होतो. संपत्ती निर्मितीसाठी या योजना आपल्या गुंतवणूक विभागात असणे गरजेचे आहे, पण लांब पल्ल्याच्या ध्येयासाठी सर्वच पैसे जोखिमीमध्ये न टाकता काही भाग सुरक्षित गुंतवणुकीमध्ये गुंतवायला हवा. यात विम्याच्या पारंपरिक पॉलिसी, पीपीएफ, पोस्टाची जीवन सुकन्या योजना अशा प्रकारच्या योजनांचा समावेश असणे गरजेचे आहे

– प्रॉपर्टी, आर्ट, सोने यांमध्येही आवश्यकतेनुसार गुंतवणूक करता येते. ज्यांचे उत्पन्न खूप जास्त आहे व मुबलक पैसा आहे अशा व्यक्ती दुसऱयांच्या व्यवसायात पैसे गुंतवून भागीदार होतात.
ज्या गुंतवणुकीमध्ये खूपच जास्त नफा असतो त्यामध्ये मुद्दलाची जोखीम खूपच वाढते. त्यामुळे यात एवढेच पैसे गुंतवा की, ते गेले तरी त्याचे दुःख आपल्याला होणार नाही. यात फ्युचर, ऑप्शन, क्रिप्टोकरन्सी अशा प्रकारच्या गुंतवणुका मोडतात.

– या सर्व गुंतवणुका करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, आपल्या आर्थिक इमारतीचा पाया मजबूत करणे. आपले उत्पन्न आपल्यानंतर कुटुंबाला मिळण्यासाठी योग्य किमतीचा टर्म विमा व बचतीचा विमा यांचा मिलाप करून सुरक्षा प्रदान करणे अत्यंत गरजेचे आहे. याचबरोबर वैद्यकीय खर्चाचे ओझे आपल्या डोक्यावर येऊ नये म्हणून बेस मेडिक्लेम पॉलिसी व टॉप अप मेडिक्लेम
पॉलिसी काढणे अनिर्वाय आहे.