मुद्दा – आपण मराठी भाषेचे तारणहार की…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दत्तप्रसाद रा. शिरोडकर

जसजसे जागतिकीकरण होत आहे, तसतसे केवळ मराठीच नव्हे, तर जगातील सर्वच स्थानिक भाषांचे किंवा मराठी मातृभाषेचे ध्रुवीकरण होत आहे. भाषा जरी संपर्काचे माध्यम असली तरी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत स्थानिक किंवा मातृभाषा अभावानेच वापरल्या अथवा बोलल्या जातात, परंतु आपण आपल्या भाषेच्या बाबतीत बोलण्यापासून लिहिण्यापर्यंत ठाम असू तरच आपल्या भाषेचा प्रसार आणि प्रचार होईल. अर्थशास्त्रीय भाषेत बोलायचे झाले तर मागणी तसा पुरवठा. जर आपणच आपल्या मातृभाषेत बोललो नाही अथवा ती वापरली नाही. मग इतर भाषीय का बरे आपल्या मराठी भाषेविषयी आस्था दाखवतील हे साधे सरळ गणित आहे.

इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, आयात करण्यात येणाऱया मशीन किंवा तत्सम वस्तू, खेळणी यावर बारकाईने पाहिल्यास चिनी भाषेतच सूचना आणि मार्गदर्शक फलक होते. चीन मशीन उत्पादकाला का बरे असे वाटले नाही की, त्यांची भाषा चीनबाहेर वाचली जाणार नाही. तरीही त्यांनी त्यांच्या देशाची भाषा वापरली का? चीनला जागतिक बाजारपेठेत टिकायचे नाही? टिकायचे आहे. तरीही चीन आपल्या भाषेबाबत किंवा मोबाइलमधील विविध ऍपबाबत आजही जगाला हाच संदेश देत आहे की, भाषेचा अडसर हा तुमच्यासाठी आहे, आमच्याकरिता नव्हे. त्यामुळे भाषेची अडचण आली तर ती समस्या तुम्हीच सोडवा. मग तुम्ही भाषांतर करणारे ऍप वापरा किंवा अन्य काहीही वापरा.

भाषा कुठलीही असली तरी जागतिकीकरणामुळे त्याच्यावर लगेच असा काही परिणाम होईल असे उपरोक्त उदाहरणावरून तरी वाटत नाही. मग आपल्याला मराठी भाषेची पताका जगात फडकवायची असेल तर आपण सर्व व्यवहार मराठीतच करायला नको का? ज्या मराठी भाषेला 2 हजार 500 वर्षांचा इतिहास आहे,9व्या शतकापासून मराठीचा वापर आहे, देवांची भाषा संस्कृतपासून प्राकृत महाराष्ट्री बोलीपासून सुरुवात झाली, पैठणमधील सातवाहन साम्राज्याने मराठीचा प्रशासनात वापर केला. मग अशा समृद्ध मराठी भाषेबद्दल असलेला ‘न्यून’ सोडून देऊन खुल्या दिलाने मराठीचा जळी-स्थळी वापर करावयास नको का? उगाच मराठी संवर्धन करा म्हणून आक्रोश करण्याचा काय उपयोग आहे? जागतिकीकरणात मराठी भाषेचे आपण तारणहार होणार की मारणहार हे आपणच ठरवायचे आहे. दरवर्षी सभा आणि संमेलन घेऊन मराठी भाषा दिन साजरा करावाच, परंतु उरलेल्या प्रत्येक दिवशी जिथे मिळेल तिथे मराठी भाषेचा वापर केलाच पाहिजे.