
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
चालढकल किंवा Procrastination म्हणजे काय? हे फक्त काही बाबतीतच का घडतं? असा प्रश्न तुम्हाला, विशेषत महिला वर्गाला पडला असेलच. मी रोजचं काम व्यवस्थित करते, पण काही वेगळी आवराआवर वगैरे असेल तर माझं कायम ‘नंतर’ असतं, असं स्वतला बजावून ते काम नंतरसाठी ठेवलं जातं आणि जेव्हा अटीतटीची वेळ येते तेव्हा ते काम उरकलं जातं. मात्र हा उरक ताण आणि मनस्तापसुद्धा घेऊन येऊ शकतो.
नववर्षाच्या तुम्हा वाचकांना हार्दिक शुभेच्छा! नवं वर्ष सुरू होऊन आता आठवडा झालेला आहे. सरत्या वर्षाला मोठय़ा जल्लोषात निरोप देत आपण सर्वांनी या नवीन वर्षाचे स्वागतही अगदी जोमात केले आहे. घरच्यां सोबत मित्रपरिवारासह धमाल, मस्ती आणि मोबाइलवर त्याचे फोटो, रील्स बनवत ते क्षण कायमचे आपल्या जवळ जपूनही ठेवलेले आहेत. या अशा ‘हॅप्पी मेमरीज’ आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देऊन जात असतात. खरंय ना!
नवीन वर्षाची चाहूल तशीही डिसेंबर सुरू झाल्यापासून चालू होते. वर्षातला हा शेवटचा महिना हॅपनिंगच असतो. गुलाबी थंडी, नाताळची लगबग आणि लहान मुलांना आवडणारा ‘पोट सांता’. तू आता चांगला वागलास/वागलीस की, सांता तुला मस्त गिफ्ट देणार, असं आधीच आईने सांगितलं असल्याने लहान मुलंही शहाणी होऊन जातात. गिफ्ट मिळण्याच्या आशेने मी ‘गुड बॉय/गुड गर्ल’ होणार असा त्यांच्याकडून छोटेखानी संकल्प केला जातो. मग गिफ्ट (जे आई-वडील नकळत त्यांच्या उशाखाली ठेवतात) मिळालं की, मुलांना जो काय आनंद होतो तो काय वर्णावा!
ही अशीच बालपणी संकल्प करण्याची सवय जी लागते ती मोठेपणीही ‘नवीन वर्षाचा संकल्प’ म्हणून रुजते, हो ना! हे वाचतानासुद्धा आपल्यापैकी कित्येकांना अशाच काही स्वतशी केलेल्या संकल्पांची आठवण झाली असेलच (आणि तडीस न गेलेल्या संकल्पांचीही!).
आपण कित्येकदा संकल्प करतो म्हणजे नक्की काय करतो आणि कशाला करायला हवेत? असे प्रश्न मला माझ्या सत्रांमध्ये बऱयाचदा विचारले जातात. कारण केलेला संकल्प किंवा ठरवलेली अमुक एक गोष्ट ही बऱयाच जणांना कायम ठेवता येत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर व्यायाम करणं असो, स्वतकडे लक्ष देणं असो किंवा मग स्वयंशिस्त असो, सुरुवातीला दोन-तीन दिवस, फार फार तर आठवडाभर हा उत्साह असतो. नंतर कुठेतरी माशी शिंकते आणि ‘आता उद्या नक्की करेन’ या स्वतच स्वतला दिलेल्या दिलाशाने त्या संकल्पाचे तीन-तेरा कधी वाजतात ते कळतही नाही.
असं का होतं? या प्रश्नाला एकच उत्तर येतं ते म्हणजे ‘चालढकल करण्याची सवय’ (मी इथे मुद्दामहून वृत्तीचा उल्लेख टाळलेला आहे). ही चालढकल करण्याची सवय फक्त संकल्पांबाबतीतच नाही, तर दैनंदिन जीवनातही आपल्यापैकी अनेकांना असते.
चालढकल किंवा Procrastination म्हणजे काय? हे फक्त काही बाबतीतच का घडतं? असा प्रश्न तुम्हाला विशेषत महिलावर्गाला पडला असेलच. मी रोजचं काम व्यवस्थित करते, पण काही वेगळी आवराआवर वगैरे असेल तर माझं कायम ‘नंतर’ असतं, असं स्वतला बजावून ते काम नंतरसाठी ठेवलं जातं आणि जेव्हा अटीतटीची वेळ येते तेव्हा ते काम उरकलं जातं. मात्र हा उरक ताण आणि मनस्तापसुद्धा घेऊन येऊ शकतो.
आता चालढकल का होते? याचा आढावा घ्यायचा झाला तर काही कारणं आपल्याला सापडतील. एकदा का ती कारणं समजली की, या सवयीवर काम करणं सोपं होऊन जाईल.
‘चालढकल म्हणजे आळशीपणा नव्हे’ हे सर्वात आधी समजून घ्यायला हवं. ‘काम करायचं तर ते व्यवस्थितच, 100 टक्के व्हायला हवं, नाहीतर माझा उपयोग काय?’ हा अतार्किक विचार सुप्त मनात केव्हातरी दडी मारतो आणि तिथेच जळूप्रमाणे मनाला चिकटून राहतो आणि एकदा का हा विचार तिथे पक्का चिकटला की, तो आपल्याबरोबर असंख्य तसेच विचार गोळा करायला सुरुवात करतो. आपल्या मनात असलेले आत्मविश्वास, स्वत्व हे गुण तो शोषून त्या जागी थोडा ताण, अस्वस्थता, चिंता या नकारात्मक भावना निर्माण करतो.या भावना काही वेळापुरत्या असतात, पण त्रासदायक ठरतात. त्या टाळण्यासाठी ती व्यक्ती मग ते काम ‘पुढे बघू’ असं म्हणत त्या वेळी टाळते. मग ‘इतक्या वेळाने हे काम करतोय, पण नाही जमलं तर/नाही करता आलं तर’, ‘काही चूक झाली तर’ या अतिविचारांच्या पात ती व्यक्ती अडकत जाते आणि मग सरतेशेवटी ते काम पुढे पुढे जात राहतं. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे त्या कामामधला किंवा संकल्पांबाबतीतला उत्साह संपून जाणं.
मग हे जर टाळायचं असेल तर काय करायला हवं? तर संकल्प किंवा ठरवलेली गोष्ट तडीस न्यायची असेल तर SMART पद्धतीचा अवलंब करावा. म्हणजेच…
S (Specific) – – कुठलंही करायचं काम हे नक्की कशा प्रकारे करायचे आहे याचा आराखडा आधी निश्चित करावा. उदा. मी व्यायाम करणार असेन तर नक्की कुठल्या प्रकारचा आणि कशासाठी, हे निश्चित करावे.
M (Measurable) – आता आराखडय़ानुसार सुरूवात करताना त्या कामाचे अंदाजे ठोकताळेही मनाशी ठरवावेत. म्हणजेच व्यायाम करण्याचा मला कसा आणि कितपत फायदा होईल, मी कोणत्या प्रकारचा व्यायाम केल्याने मला शारीरिक तसेच मानसिक फायदा होईल हेही ठरवावे.
A (Attainable) – ठरवलेलं काम हे आवाक्यातील आहे का? हेही मनाशी पक्के ठरवावे. जसे की; व्यायामाला सुरूवात केल्यावर कशा प्रकारे आणि किती वेळ दिल्यास मला फायदा मिळू शकेल हे तपासावे. कारण शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देताना ज्या काही पद्धती अमलात आणल्या जातात (जिम, योगसाधना) त्या करताना नियोजनाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे संकल्प मध्येच सुटण्याचे किंवा चालढकल होण्याचे प्रकार होतात.
R (Relevant) – आपण ज्या कामाचा विचार करतोय ते माझ्या ठरवलेल्या गोष्टीशी निगडित आहे का? हे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, ठरवलेला व्यायाम हा माझ्या स्वास्थ्यासाठी पुरेसा आहे का? हे समजणे महत्त्वाचे असते.
T (Time based) – प्रत्येक कामासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी. तरच ते काम योग्य पद्धतीने आपण सुरू करू शकतो.
चला! आपणही ही पद्धत अजमावून बघू या का? जमणार नाही असं तर होणार नाहीच. जमेल… नक्कीच जमेल! फक्त प्रयत्न आणि सातत्य हवे. एकदा `SMART`‘ली ट्राय करून बघताय ना!
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)
z [email protected]




























































