लेख – कुटुंब ही सामाजिक संरक्षण व्यवस्था

>> डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी

आज 15 मे जागतिक कुटुंब दिन. अर्थात, सध्याच्या जगात कुटुंबव्यवस्था टिकवणे हेच मोठे आव्हान आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कुटुंबातील संवाद कमी झाला आहे. मात्र सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘घर में रहो, सेफ रहो’ असा नारा सरकारने दिला आहे. साहजिकच घराबाहेर पडायला पूर्ण मज्जाव आहे. या परिस्थितीने आपल्याला आपल्या कुटुंबाशी जवळीक साधण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. दुरावलेला, तुटू पाहणारा कौटुंबिक सुसंवादाचा धागा पुन्हा घट्ट होऊ पाहतो आहे. ही नक्कीच कौटुंबिक आणि सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे.

जसा थेंबाथेंबाने समुद्र बनतो, कणाकणाने पर्वत बनतो तसा स्त्री-पुरुषांच्या शक्ती-युक्तीने संसाराचा गाडा सुरळीत चालतो. संपूर्ण कुटुंबाचा उद्धारही होतो. कुठल्याही घरात कुटुंबाची काळजी घेणारी, कुटुंब सुरळीत चालवणारी ही स्त्रीच असते. तिने प्राप्त परिस्थितीला केव्हाही सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. स्त्री हे जेव्हा हसतमुखाने आणि कर्तव्य समजून करते तेव्हा तिला तितकाच मानही मिळाला पाहिजे. अनेकदा तो मिळतो, अनेकदा तो मिळत नाही. घरातील सर्व व्यक्ती एकमेकांना समजून घेत कुटुंब सांभाळतात. तेव्हा ते घर खऱया अर्थाने ‘स्वीट होम’ होतं. कारण घर म्हणजे फक्त वीटा-सिमेंटचे बांधकाम नसतं, ते असतं आपलेपणाचे केंद्रस्थान. घर माणसांचं असतं. माणसांनी बनलेल्या कुटुंबाचं असतं.

माणसांना घरं हवी असतात
घरांना माणसे हवी असतात
घरांची फक्त एकच अट असते
त्यांचं घरपण टिकविण्यासाठी
माणूसपण जिवंत असावं लागतं

खरं तर आपल्याला जन्मल्यापासून स्वत:चं घर असतं. ज्या कुटुंबात आपण जन्म घेतो त्या कुटुंबाची वेगळी ओळख करून घ्यावी लागत नाही. ‘कुटुंब’ ही एखादी संकल्पना नव्हे, तर ती समाजातील संरक्षक व्यवस्था आहे. शतकानुशतके ती अबाधित राहिली आहे. तरीही आपण जागतिक कुटुंब दिन का साजरा का करीत आहोत? जागतिक कुटुंब दिन साजरा करण्याची गरज का निर्माण झाली आहे? आदी अनेक प्रश्न सध्याच्या वातावरणात निर्माण झाले आहेत.

माझ्या मते कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व ठसविण्यासाठी आणि ते टिकविण्यासाठी या विशिष्ट दिवसाचे आयोजन झालं असावं. मूरडॉक या मानव वंशशास्त्रज्ञाच्या मते आपापल्या स्वभाव वैशिष्टय़ांसह एका छताखाली राहणाऱया आणि आर्थिक सहकार्याची भावना असणाऱयांचा समूह म्हणजे कुटुंब! जगात सर्वत्र हेच कुटुंबाचे सर्वसधारण चित्र आहे. मात्र गेल्या काही दशकांत त्याला थोडे थोडे कंगोरे पडत आहेत. आजही एका छताखाली राहणारीच कुटुंब व्यवस्था अनेक ठिकाणी आहे, परंतु प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणूस आंतरिक धाग्याने एकमेकांशी संलग्न असतो का, हा प्रश्न आहेच. व्यक्तिस्वातंत्र्याच्या टोकदार कल्पनेमुळे अलीकडे कुटुंबात जितके घटक तितके कोन निर्माण झालेले दिसतात.

आपण सहजपणे त्रिकोणी कुटुंब, चौकोनी कुटुंब असं म्हणतो. त्यामध्ये आपल्याला तीन माणसे, चार माणसे असे अभिप्रेत असते. पण जितकी माणसं तितके कोन असलेली नवी कुटुंबव्यवस्था आपल्याला सर्रास पहावयास मिळत आहे. पुण्या-मुंबईतच नव्हे जवळ जवळ सर्वच ठिकाणी हे चित्र पाहायला मिळते. कुटुंबाला हे असे कोन का पडत असावेत? कारण कुटुंबातील प्रत्येक माणूस काळाच्या ओघात स्वत: एक स्वतंत्र घटक बनत चालला आहे. मुलं थोडी मोठी झाली की प्रत्येकाकडे घराची किल्ली असते. ती वस्तुत: सोयीसाठी दिलेली असते. पण ती नकळतपणे स्वातंत्र्याचा एक भाग बनून जाते. घरात प्रवेश केल्यावर जो तो आपापल्या रूममध्ये जातो. तिथे त्याच्या सेवेला कॉम्पुटर, टीव्ही, होम थिएटर असतात. त्यामुळे तिथं त्याचं स्वतंत्र जग बनलेलं असतं. शिवाय आता प्रत्येकाजवळ स्वतंत्र मोबाईल आहे. त्यावरून अनेकांशी संवाद साधला जातो. मात्र घरातल्या घरात किती संवाद होतो हा संशोधनाचा विषय आहे. अनेक घरांमध्ये जेवणाची ताटं घेऊन टीव्हीपुढे बसायची पद्धत आहे. मात्र सारं लक्ष टीव्हीच्या फ्रेमकडे असल्याने कुटुंबे असंवादी बनत चालली आहेत. फार तर टीव्हीवरील कार्यक्रमावर शेरेबाजी होते, परंतु कौटुंबिक चर्चा किंवा संवाद होत नाही. ज्या संवादामध्ये अवघड विषय सोपे करण्याची ताकद आहे अशा संवादास आपण मुकतो. म्हणजे आपणच आपले आयुष्य जटील करत आहोत.
माणूस जेव्हा आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसे जोडत जातो, त्यांच्याशी नाती गुंफत जातो त्यावेळेस नकळतच त्याचे स्वत:चे कुटुंब निर्माण होते. कुटुंब आणि त्या कुटुंबाचे स्वास्थ्य परस्परांमधील अतूट प्रेम, दृढ विश्वास, आपलेपणा आणि जिव्हाळा याच्या भरभक्कम पायावरच अवलंबून असते.

सध्याच्या ‘घरात बसा आणि सुरक्षित रहा’ या परिस्थितीने आपल्याला आपल्या कुटुंबाशी जवळीका साधण्याची एक सुसंधी उपलब्ध करून दिली आहे. एरव्ही ऑफिसच्या निमित्ताने छोटय़ा मुलांना त्यांचा हरवलेला बाबा आणि आई, त्यांचे प्रेम, सहवास साथ-सोबत सध्या मिळत आहे. मध्यंतरीच्या काळातला हा एक दुरावलेला, तुटू पाहणारा कौटुंबिक सुसंवादाचा धागा पुन्हा एकदा घट्ट होऊ पाहत आहे. अर्थात, सध्याच्या कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे अनेक हजारो लोक कुटुंबापासून दूर वेगवेगळय़ा भागांत अडकून पडले आहे. त्यांच्यासाठी मात्र हे लॉक डाऊन म्हणजे एक भावनिक शिक्षा आहे. कारण त्यांचे कुटुंब दुसरीकडे आणि ते दुसरीकडे अशी स्थिती आहे. म्हणजे कोरोनामुळे कुटुंबे जवळ आली आणि कुटुंबे लांबही गेली अशा परस्परविरोधी गोष्टी घडवल्या आहेत. अर्थात, या दुराव्यातही कौटुंबिक जिव्हाळा, प्रेम टिकून आहे. हे हिंदुस्थानी कुटुंबव्यवस्थेचे वैशिष्टय़ म्हटले पाहिजे.

नोकरी, उद्योगासाठी कुटुंबप्रमुख किंवा कुटुंबातील कर्ती व्यक्ती कुटुंबापासून लांब राहते, हा विरह सहन करते त्यामागेही कुटुंबाचे सुख, कल्याण करणे हाच हेतू असतो. भावनेपेक्षा कर्तव्य श्रे‰ असते हे खरेच, पण ते करीत असलेल्या अनेकांची घुसमट होत असते हेदेखील खरे. सध्याच्या लॉक डाऊनमध्ये शेकडो किलोमीटर जमेल तसे किंवा पायपीट करीत आपल्या गावाकडे निघालेली मंडळी हा कौटुंबिक प्रेमाचाच एक भाग आहे. कुटुंबातील माणसांविषयी असलेल्या अनामिक ओढीनेच ही पायपीट अनेकांनी केली. ही ओढ म्हणजे आपल्याकडील कुटुंब एकत्र ठेवणारी विणच आहे. जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने ती आणखी घट्ट करण्याचा संकल्प करूया!

आपली प्रतिक्रिया द्या