
यकृताचा कर्करोग हा जगभरात आढळणाऱया कर्करोग प्रकारांपैकी सहाव्या क्रमांकाचा कर्करोग आहे. 2018 मध्ये यकृताच्या कर्करोगाची 8,41,080 इतक्या नवीन प्रकरणांची नोंद झाली असून जागतिक स्तरावर कर्करोगाशी संबंधित मृत्यूचे हे चौथे प्रमुख कारण ठरले आहे. पूर्व आशिया आणि आफ्रिकेमध्ये यकृत कर्करोगापैकी हेपैटोसेलुलर कार्सिनोमाचे सर्वाधिक प्रमाण आणि मृत्यूचे कारण आढळून आले आहे. युरोप आणि अमेरिकेतही यकृत कर्करोगामुळे मृत्यू होणाऱया घटनांमध्ये वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
यकृत कर्करोगाच्या वाढत्या प्रकरणांना वेळीच प्रतिबंध न केल्यास 2030 पर्यंत यकृत कर्करोग हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
जोखमीचे घटक
यकृताच्या कर्करोगाला ‘हिपॅटायटिस बी’ किंवा ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूचा दीर्घकाळापर्यंत संसर्ग हा जोखमीचा घटक आहे. याशिवाय, वय, सिरोसिस, जास्त मद्यपान, लठ्ठपणा, टाइप-2 मधुमेह आदींमुळेही या कर्करोगाचा धोका वाढतो. रक्त किंवा शारीरिक द्रवपदार्थांद्वारे, व्हायरल हेपेटायटिस एका व्यक्तीकडून दुसऱया व्यक्तीमध्ये प्रसारित होऊ शकतो. शारीरिक दुखापत किंवा आघात किंवा टॅटू काढण्याची प्रक्रिया किंवा लैंगिक संपर्क यामुळे प्रसार होऊ शकतो. आईला ‘हिपॅटायटिस बी’ असल्यास न जन्मलेल्या बाळाला किंवा मुलाला विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. बाळाला लसीकरण केल्याने हे टाळता येऊ शकते
‘हिपॅटायटिस बी’ विषाणू संसर्ग
आशिया आणि आफ्रिकेतील यकृत कर्करोगाच्या साठ टक्क्यांमध्ये ‘हिपॅटायटिस बी’चा वाटा आहे. ‘हिपॅटायटिस बी’मुळे सिरोसिस नसला तरी यकृत कर्करोगाचा धोका वाढतो. उपचार न केलेल्या ‘हिपॅटायटिस बी’च्या जवळपास 20 टक्के रुग्णांमध्ये यकृताच्या सिरोसिस (यकृताला व्रण पडणे) वाढतो.
‘हिपॅटायटिस सी’ विषाणू संसर्ग
उत्तर अमेरिका, युरोप आणि जपानमधील यकृत कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये ‘क्रॉनिक हिपॅटायटिस सी’ विषाणू संसर्ग हा सर्वसामान्यपणे आढळून येणारा यकृताचा विकार आहे. ‘डायरेक्ट-ऑक्टिंग अँटिव्हायरल’ (डीएए) थेरपीने एचसीव्ही संसर्ग धोका कमी झाला आहे. तरीही सिरोसिस असलेल्या रुग्णांना यकृत कर्करोग होण्याचा सतत धोका असते.
मद्यपान
अतिप्रमाणात मद्यपान केल्याने यकृताचा रोग, सिरोसिस आणि यकृत कर्करोगाचा धोका निर्माण होतो. सध्या वाढत्या मद्यपानामुळे सिरोसिस होण्याची संख्या वाढत आहे. मद्यपान न करणाऱयाच्या तुलनेत मद्यपान करणाऱया व्यक्तींना एचबीव्ही आणि एचसीसीचा धोका अधिक असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.
नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (NASH)
सिरोसिसचा आणखी एक सामान्य घटक म्हणजे NASH, जो मधुमेह तसेच लठ्ठपणा असलेल्या रुग्णांमध्ये यकृत कर्करोगाच्या संसर्गास कारणीभूत ठरतो. लठ्ठपणाच्या वाढत्या व्याप्तीमुळे, नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस हे जगातील बहुतेक प्रदेशांमध्ये सिरोसिसचे सर्वात मोठे कारण ठरले आहे. 2010 पासून, नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिसमुळे एचसीसीचे प्रमाण वेगाने वाढले आहे.
यकृताच्या कर्करोगाला कसा प्रतिबंध कराल?
‘हिपॅटायटिस बी’ लस घेणे
‘क्रॉनिक हिपॅटायटिस बी’ संसर्गासाठी उपचार घेणे
‘अफलाटॉक्सिन-1’ चे एक्सपोजर कमी करणे
यकृताचा कर्करोग लवकर ओळखणे अनेकदा कठीण होते. कारण शेवटच्या टप्प्यात येईपर्यंत लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे धोका असलेल्या लोकांसाठी तज्ञाचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.
डॉ. विक्रम राऊत
(यकृत प्रत्यारोपण, एचपीबी सर्जरी विभागाचे संचालक, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई)