मिश्र संस्कृती आनंद आणि भीती!

378

>> द्वारकानाथ संझगिरी

माझ्या नातीच्या वाढदिवसासाठी आम्ही सहकुटुंब ऑस्ट्रेलियात ऍडलेडला आलो. वाढदिवस हे निमित्त, एकत्र येणे हा उद्देश. खरं तर पाश्चिमात्य संस्कृतीत वाढदिवस साजरा करणं आणि तो हिंदुस्थानात साजरा करणं यात फारसा फरक राहिलेला नाही. आपण लहान मुलांचा वाढदिवस साजरा करताना त्याला हिंदुस्थानी संस्कृतीप्रमाणे ओवाळतो आणि पाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे केकही कापतो. जग जवळ येतंय. एका संस्कृतीने दुसऱया संस्कृतीला बाहुपाशात घेणं मला भावतंय. माझ्या मुलाने एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला नातीचा वाढदिवस साजरा करण्याचे कॉन्ट्रक्ट दिले. त्यांनी दोन तासांत डिस्को, ग्लिटर टॅटू, खेळ, खाणं यांसह मस्त साजरा केला. आपल्याकडेही आता असंच करता येतं. वेगळेपण होते माझ्या नातीच्या जमलेल्या मित्र-मैत्रिणीत! एक वेगळाच वंशीय संगम होता. चिनी, व्हिएतनामी, गोरे, कोलंबियन आणि हिंदुस्थानी मुले-मुली संस्कृतीचे कुठलंही ओझं डोक्यावर न घेता एकमेकांत मिसळून गेले होते. त्यांची जीभ इंग्लिश भाषेत रुळल्यामुळे त्यांच्या आनंदात भाषेचीही भिंत नव्हती. मला बरं वाटलं की, माझी नात एका वेगळ्या मिश्र संस्कृतीत वाढतेय. तिथे जोपर्यंत आई-बाप शिकवत नाहीत तोपर्यंत भिन्नतेच्या भिंती उभ्या राहत नाहीत. आपल्या घरात आपली संस्कृती जरूर असावी, पण परदेशात राहताना, घराचा उंबरठा ओलांडल्यावर त्या मातीच्या संस्कृतीशी फटकून वागता येत नाही.

पण त्या मातीतलं काय काय घ्यावं याचंही भान असावं. माझा एक अत्यंत जवळचा मित्र, भाऊच म्हणा, राहायला 1971 च्या सुमारास अमेरिकेत गेला. इथे असताना विनोदी स्वभावाचा, सर्वात मिसळणारा, प्रेमळ… बघता बघता त्या संस्कृतीत इतका मिसळून गेला की, तो आपलं मूळ विसरला. त्याचं मूळ होतं महाराष्ट्रातलं एक छोटं शहर. घरात सात भावंडं होती. वडिलांवरचा भार कमी करण्यासाठी त्या काळातल्या प्रथेप्रमाणे थोरल्या भावाने कुटुंबाची जबाबदारी शिरावर घेतली. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वटवृक्षाची भूमिका करावी लागते, त्यावेळी काही वेळा इतरांवर करडी शिस्त लादण्याचा प्रयत्न करावा लागतो. कारण त्याने आपल्या सुखांना, तारुण्याला एका त्यागभावनेने घराबाहेर काढलेलं असतं. तुटपुंज्या आमदनीत ज्याने मोठी कुटुंबं चालवली आहेत, त्या कुटुंबांना शिस्तीचा किनारा पाळावा लागतोच. त्यात कधी लहान भावांना ओरडा खावा लागतो, कधी एखादी चापटी, पण तोच भाऊ रात्री स्वतःची झोप विसरून धाकटय़ाला खांद्यावर घेऊन थोपटत असतो, आजारपणात त्याची काळजी घेत असतो. माझ्या या मित्राला लहानपणी पोलिओ झाला, त्यावेळी आधाराचे हात त्याच्या मोठय़ा भावाने त्याला दिले. काळ वेगात पुढे गेला. त्या वटवृक्षानंतरच्या भावाला अमेरिकेला जावंसं वाटलं. वटवृक्षाने धडपड करून त्याच्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली. भरत अमेरिकेत स्थिरस्थावर झाल्यानंतर माझा हा जवळचा मित्र त्याचं बोट धरून अमेरिकेत गेला. माझ्या मित्रासाठी ते बोटंही फार महत्त्वाचं होतं. माझा मित्र मग तिथे शिकला, मोठा झाला. एका आलिशान बेटावर सुखावला आणि जो कधी आपलं मूळ विसरेल असं वाटलं नव्हतं, तो मूळ विसरला. ते घट्ट प्रेमाचं नातं विस्मृतीत गेलं. कोऱया पाटीवर नव्या संस्कृतीची अक्षरं उमटली. तो तिथल्या गोऱया मित्रांत रमला. इथे भाऊ-बहिणी, मित्र जीव टाकत राहिले. जे बोट धरून तो गेला होता, ते बोटही त्याने कधीच सोडलं होतं, पण आम्ही सर्व आनंदात होतो, कारण तो आनंदात आहे. ही आपल्या नसानसांत शिरलेली संस्कृती आहे.

परदेशात गेल्यावर हिंदुस्थानी माणसाने फक्त आपल्या संस्कृतीला कवटाळून बसावं असं मला मुळीचं वाटत नाही. तसं करायचं असेल तर मग जायचं कशाला तिथे? फक्त पैसे कमवायला? त्या तिथल्या संस्कृतीत मिसळायलाच हवं. फक्त मूळ विसरू नये. संस्कृतीची देवाणघेवाण होते तेव्हा जग जवळ येतं. परवा ऍडलेडमधला एक बस ड्रायव्हर माझ्या मुलाला म्हणाला, ‘‘तुझ्या मुलीला इंग्लिशप्रमाणे तुमची भाषाही शिकव. मला हेवा वाटतो, तुम्हाला किती वेगवेगळ्या भाषा येतात! आम्ही फक्त इंग्लिश बोलतो.’’ माझ्या डोक्यात अगदी कालचं उदाहरण ताजं आहे. ऍडलेडच्या एका शॉपिंग सेंटरच्या प्ले एरियात मी आणि नात बसलो होतो. तिच्या पसरलेल्या पायावरून तिच्या वयाचा एक चिनी मुलगा गेला. त्याची आई त्याला लगेच ओरडली. त्याला ‘‘सॉरी’’ म्हणायला लावलं. मला कल्पना नव्हती की, पाय ओलांडून न जाण्याची पद्धत चिनी संस्कृतीतही आहे. कुठली संस्कृती कुठे झिरपत जाते ते कधी कधी कळत नाही.

तर या माझ्या मित्राच्या बाबतीत अमेरिकन संस्कृती इतकी नसानसांत शिरली की, आयुष्याची एकतीस वर्षे काढलेल्या घरात त्याला पंधरा मिनिटंसुद्धा बसायची इच्छा राहिली नाही. एवढंच नव्हे तर त्याने एका त्यातल्या त्यात जवळच्या भावंडाला सांगितलं, ‘‘त्या वटवृक्षाने माझी माफी मागितली पाहिजे. तो लहानपणी मला ओरडलाय. त्याने मला मारलंय.’’ हे ऐकल्यावर मला धक्का बसला. ही टिपिकल आधुनिक गोरी वृत्ती. मध्ययुगात स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी आफ्रिकन लोकांवर, वसाहतीतल्या जनतेवर, जिथे गेले तिथल्या नेटिव्हांवर अनन्वित अत्याचार केले. त्या अपराधीपणाचं दुःख त्यांना आता होतात आणि ते माफी मागत सुटले आहेत. अमेरिकन मंडळींनी अणुबॉम्बसाठी जपानची मागितली. परवा ब्रिटिश पंतप्रधानांनी जालियनवाला बागेसाठी खेद व्यक्त केला. याच धर्तीवर तो माझा मित्र सांगतोय, ‘‘माझ्या भावाने माझी माफी मागितली पाहिजे.’’

माझ्या नातीला ऑस्ट्रेलियाच्या मिश्र संस्कृतीत मिसळताना पाहताना मला जेवढा आनंद होतो, तेवढी भीतीही वाटते. इथल्या लहान मुलांमध्ये आईवडील रागावल्यावर ‘पोलिसां’कडे जायची धमकी द्यायची हिंमत असते. ‘‘माझ्यावर तुम्ही अन्याय करताय’’ असं बेधडकपणे आपल्या आईवडिलांना सांगू शकतात. सुखापेक्षा दुःख, कौतुकापेक्षा टीका, प्रेमापेक्षा राग जास्त लक्षात राहतो. त्यामुळे कधी कधी भीतीही वाटते, कधी मित्राने केलेले वक्तव्य माझ्या रक्ताने माझ्यासाठी किंवा आईवडिलांसाठी केलं तर… मी कोलमडेन. नाही, माझं रक्त इतकं पातळं नसावं!

– [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या