स्विंगचे ’मोहोळ’ थंडावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी    

परवा सुधाकर अधिकारी गेला आणि नंतर महाराष्ट्राचे सदानंद मोहोळ. एक आघाडीचा फलंदाज. दुसरा, नवा चेंडू टाकणारा मध्यमगती स्विंग गोलंदाज. दोघंही साधारण एकाच काळात खेळले. देवाला वर व्हेटरन क्रिकेटचा सामना खेळविण्यात रस आहे की काय? मोहोळ मध्यमगतीने नवा चेंडू स्विंग करत. आणि चेंडू जुना झाला की कट करत. बोर्डे म्हणतात, ‘आज  भुवनेश्वर कुमार स्विंग करतो तसा सदानंद स्विंग करायचा. फक्त सदानंदचा वेग कमी होता. मोहिंदर अमरनाथ किंवा बलविंदर संधू एवढा.’ महाराष्ट्राचा माजी वेगवान गोलंदाज अन्वर शेख म्हणतो, ‘जुना चेंडू तो भन्नाट कट करायचा. विशेषतः त्याचा आऊट कटर. लेग स्टंपवर पडून ऑफ स्टंपच्या बाहेर जायचा. अक्षरशः लेगब्रेकसारखा.’ चंदू बोर्डे सांगत होते, ‘त्या काळात आम्ही बरेच सामने मॅटिंग विकेटवर खेळत असू. त्याच्या कटर्समुळे सदानंदची गोलंदाजी खेळणं भल्याभल्यांना कठीण जायचं.’ महाराष्ट्राच्या संघात त्याचं स्थान किती वरचं असावं? बोर्डे म्हणतात, ‘संघ काढताना कर्णधार म्हणून माझं नावं पहिलं असायचं आणि मग सदानंदच.’

सदानंद हा सुखवस्तू कुटुंबातला. त्यांचा जन्म वसईचा. त्यांच्या मालकीची थिएटर्स आहेत. त्यांचे वडील, एकेकाळी  काँग्रेसमधील खूप मोठी हस्ती. त्यांचे बंधू अशोक मोहोळ खासदार होते. त्यांचं शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये झालं. नंतर कॉलेज एसपी. त्यांनी पुणे विद्यापीठाला रोहिंग्टन बारिया ही राष्ट्रीय स्तरावरची ट्रॉफी जिंकून दिली होती, स्वतःच्या  गोलंदाजीच्या जिवावर! त्यानंतर पुन्हा पुणे विद्यापीठ कधीही ट्रॉफी जिंकले नाही. पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्यांनी 45 सामन्यांत 21.32 सरासरीने 165 बळी घेतले. 9 वेळा एका डावात 5 आणि दोनदा सामन्यात 10 बळी. अत्यंत दर्जेदार असा हा परफॉर्मन्स. 1966, 67 साली ते तुफान फॉर्ममध्ये होते. त्यांनी 8 सामन्यांत 19.2 च्या सरासरीने 43 बळी घेतले होते. त्यामुळे त्यांची 1967 च्या इंग्लंड दौऱयावर निवड झाली. इंग्लंडचे हवामान, तिथल्या विकेट्स त्यांच्यासाठी नंदनवन ठरायला हव्या होत्या. तीन कसोटीच्या मालिकेत त्यांना तिसऱया कसोटीत संधी जवळ जवळ मिळाली होती. मॅचच्या आदल्या दिवशी उपकर्णधार बोर्डेनी त्यांना सांगितलं, ‘तू उद्या खेळतोय’ बोर्डे सांगत होते, ‘त्या उत्साहाच्या भरात तो नेटमध्ये प्रॅक्टिस करायला गेला. नेहमीपेक्षा जास्त वेगात त्याने गोलंदाजी टाकली. तो सराव करून आला, तेव्हा तो घामाने भिजलेला. बरं त्यानंतर स्वेटर घालायला हवा, तो त्याने घातला नाही. त्यामुळे मग पाठ दुखावली. त्याची संधी हुकली. आम्ही चार फिरकी गोलंदाज घेऊन खेळलो. तुमचे मुंबईचे खेळाडू संधी मिळाली की चढून बसतात. आमच्या खेळाडूंना ते जमलं नाही.’ त्यानंतर सदानंद मोहोळ यांच्याकडे संधीने पुन्हा ढुंकून पाहिलं नाही. त्या 60 च्या दशकात वेगवान आणि मध्यमगती गोलंदाजांवर अन्याय झाला. रमाकांत देसाई, वसंत रांजणे, मोहोळ, वगैरे.  त्या 1967 च्या इंग्लिश दौऱयावर फक्त दोन वेगवान गोलंदाज हिंदुस्थानी  संघात होते.

एक सुब्रतो गुहा दुसरे मोहोळ. आजच्या पिढीचा यावर विश्वास बसणं कठीण आहे. कर्णधार पतौडीने कधी मध्यमगती गोलंदाजांवर विश्वासच टाकला नाही. कधी स्वतः नवा चेंडू वापरला कधी, वाडेकर, पुंदरनला दिला. त्यामुळे वेगवान गोलंदाज हे माळरानावर उगवलेले फूल राहिले, संघाच्या बगीच्यात त्याला क्वचित जागा मिळाली. 1971 साली त्यांची रणजी कारकीर्द संपली. त्यांच्या दुर्दैवाने त्यांचा एक मुलगा मेंटली चॅलेंज्ड होता. आयुष्यभर ते दुःख उरात ठेवून त्यांनी मुलाला फुलासारखा सांभाळला. जवळपास आयुष्य त्याच्यावर पेंद्रित केलं, पण त्यांच्याशी बोलताना कधी जाणवलं नाही. काही महिन्यांपूर्वी, पुण्यात बोर्डे यांच्या सत्काराला ते मला भेटले होते. थोडय़ा गप्पा झाल्या. ते जायच्या आदल्या दिवशी मी मिलिंद गुंजाळ याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात होतो. त्यावेळी अन्वर शेखचा सत्कार झाला. तेव्हा  मोहोळांची आठवण आलीच. मुंबईला येताना सुधाकर गेल्याची बातमी आली, त्यातून सावरायच्या आत मोहोळ यांना काळ आपल्यातून घेऊन गेला.