…ती यशोगाथा मोईनऐवजी अश्विनने लिहायला हवी होती!

27

>> द्वारकानाथ संझगिरी

इंग्लंडने एजेस बाऊलवर हिंदुस्थानला 60 धावांनी हरवून मॅच आणि मालिका जिंकली.

लॉर्डस्वर भळभळणारी पराभवाची जखम नॉटिंगहॅमला भरली. तिने खपली धरली असं वाटलं. साउद्म्पटनच्या ‘एजेस बाऊल’वर ती खपली निघाली. कोहली-रहाणेची भागीदारी इंग्लंडमधल्या टपोऱ्या गुलाबासारखी फुलत असताना त्या गुलाबाबरोबरचे काटे दिसत नव्हते. एका वळलेल्या, उसळलेल्या चेंडूने कोहलीची कठोर तपश्चर्या भंग केली. कोहलीच्या बचावाची झेड सिक्युरिटी त्या चेंडूने भेदली आणि त्या गुलाबाच्या पाकळय़ा गळल्या. काटे फक्त दिसायला लागले. पुन्हा एकदा सिद्ध झाले की कोहली हा हिंदुस्थानी फलंदाजीचा श्वास आहे. तो कोंडला की हिंदुस्थानी संघ गुदमरतो. दमदार खेळी करणारा रहाणेसुद्धा नंतर हिंदुस्थानी संघात प्राण फुंकू शकला नाही. मोईन अलीच्या ऑफस्पीनपुढे पुन्हा एकदा हिंदुस्थानी फलंदाजीने नांगी टाकली.

खरं तर जी यशोगाथा मोईनच्या चेंडूने लिहिली ती अश्विनने लिहायला हवी होती, पण तो चेंडूच्या वेगाच्या बाबतीत फसला. तब्बल 35 षटकांत तो एकच बळी घेऊ शकला. मोईनने हिंदुस्थानी संघाचा एक्का सर केला आणि पुढचे हात हसत हसत सर झाले.

हिंदुस्थानने सकाळी इंग्लिश शेपूट चटकन कापलं. करनला शेपूट म्हणणे म्हणजे हत्तीच्या सुळाला दात म्हणण्यासारखं आहे. त्यामुळे हिंदुस्थानपुढे आव्हान 245 धावांचं होतं. चौथ्या डावात एवढा पाठलाग करून हिंदुस्थानी संघ इंग्लंडमध्ये कधीच जिंकलेला नाही. 200 धावांचा पाठलाग करून हिंदुस्थानबाहेर आपण ऑस्ट्रेलियात ऍडलेडला जिंकलो. त्याला 16 वर्षे झाली. पण माझा या गोष्टीवर विश्वास आहे की नवा इतिहास कधीही लिहिला जाऊ शकतो. तो हिंदुस्थानी फलंदाजांना बॅटने लिहायचा होता आणि मला पेनने तुमच्या पुढे ठेवायचा होता.

सुरुवात नेहमीप्रमाणे झाली. म्हणजे राहुलचा किल्ला चटकन ढासळला. पुढे खेळायचा चेंडू तो मागे खेळला. बॅकफूटवर खेळताना तो चेंडू खाली राहिला. पुजारा-धवन गेल्यावर मैदानावरच्या हिंदुस्थानी पाठीराख्यांमध्येच काय, प्रेसबॉक्समधल्या पत्रकारांत नैराश्य पसरलं. धवन ज्या पद्धतीने बाद होतो ते पाहिल्यावर वाटतं की अख्खी बॅट घेऊन कशाला खेळतोय? नाही तरी बॅटच्या कडेने खेळायचं असतं.

पाठलाग करताना भागीदाऱ्या महत्त्वाच्या असतात आणि अत्यंत संयमाने, शांतपणे आणि मांजराच्या पायाने विराट कोहली आणि रहाणेमधली भागीदारी मूळ धरायला लागली. यावेळी फक्त स्विंग-सीमशी सामना नव्हता. तो मोईन अलीच्या स्पीनशीही होता. गोलंदाजांचे बूटमार्कस्, त्यामुळे तयार झालेला स्पॉट मोईनला खुणावत होता. रहाणे-कोहलीने इंचइंचाने टार्गेटकडे जाण्याचा प्रयत्न सुरू केला. यार्डायार्डाने जायचा विचार करायची ती वेळच नव्हती. कोहली या मालिकेत धावांच्या राशीवर उभा आहे. रहाणे सध्या दुष्काळग्रस्त झालाय. पण दोघांचे पाय व्यवस्थित हलत होते. मोईनला खेळताना ते चेंडूला पुढे चेंडूपर्यंत जाऊन भिडत किंवा बॅकफूटवर स्विंग खेळताना ऑफस्टंपचं भान त्यांनी कधीच सोडलं नाही. एकेरी दुहेरी धावांवर त्यांनी भर दिला. स्क्वेअर ऑन द ऑफसाइड त्यांनी अत्यंत हलक्या हाताने चेंडू ढकलून एकेरी धावा स्ट्रॉबेरी पिलिंगला गेल्यावर स्ट्रॉबेरी वेचावी तशा वेचल्या. मार्गक्रमण करताना एकदोनदा प्राण कंठाशी आले. कोहली तर जवळपास दोनदा पॅव्हेलियनला हात लावून आला. न ठेच लागता मोईनला खेळणं थोडं कठीण होतं. पण या खेळपट्टीवर रशीदचा लेगस्पीन अचानक मित्र बनून कोहली-रहाणेच्या मदतीला आला. फटक्यांचा गडगडाट न होता आधी धावसंख्या आणि मग दोघांची भागीदारी चोरपावलाने शंभरी भागीदारी झाली. पराभवाचा अंधार दूर झाल्याची भावना व्हायला लागली. दूरवर सूर्यकिरण दिसले आणि सूर्याला अचानक ग्रहण लागले. मोईनने एक उत्कृष्ट चेंडू तयार केला. त्याच्या हातून झाला म्हणूया आणि ग्लोव्हजला स्पर्श करून झेल थेट फॉरवर्ड शॉर्टलेगला उडला.

कोहली गेला म्हणजे जनगणमन नाही. हे दाखवायची जबाबदारी कष्टाने अर्धशतक मिळवलेल्या रहाणेवर आली. रिषभ पंतने त्याच्या बॅटच्या स्वभावाला साजेसा आक्रमक पवित्रा घेतला. त्याने कुंथावं ही अपेक्षा नव्हती, पण आक्रमकता म्हणजे बेदरकारपणा नाही हे तो शिकला नसेल तर त्याची चूक आहे.

पहिल्या डावात कोहली गेल्यावर पुजारा शेलारमामा झाला होता. रहाणेला ही भूमिका जमली नाही. अर्थात या खेळपट्टीवर विकेट घेणारा चेंडू कुठल्याही क्षणी झडप घालू शकेल असं वाटत होतं. हार्दिक पंडय़ाने लहाणपणी शाळेत कित्ता गिरवलाय की नाही माहीत नाही, पण स्लीपमध्ये कसं झेलबाद व्हायचं याचा कित्ता त्याने या दौऱ्यावर गिरवलाय. रहाणेवर भस्कन वळणाऱ्या चेंडूने झडप घातली. अश्विनने जे चेंडूने गमावलं ते बॅटनं कमावण्याचा प्रयत्न करीत होता. तो पहिल्या डावात रिव्हर्स स्वीप न मारता केला असता तर जास्त बरं झालं असतं.

आपली प्रतिक्रिया द्या